'या' पक्ष्याने केला श्रीलंका ते कझाकिस्तानपर्यंत ६,५०० किमी प्रवास
10-May-2021
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) - हेगलिन गल पक्ष्याने श्रीलंकेपासून कझाकिस्तानपर्यंत स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. या स्थलांतरादरम्यान त्याने सुमारे ६,५०० किमीचे अंतर कापले आहे. श्रीलंकेतील शास्त्रज्ञांनी या पक्ष्यावर लावलेल्या सॅटेलाईट ट्रान्समीटरमुळे ही माहिती समोर आली आहे.
हिवाळ्यामध्ये दक्षिण आशियात स्थलांतर केलेल्या पक्ष्यांनी आता पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यास सुरुवात केली. या स्थलांतरादरम्यान त्यांच्याकडून होणारा हजारो किलोमीटरचा प्रवास उलगडत आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी रिंगिग आणि सॅटेलाईट टॅगिंगसारखे उपक्रम राबवले जातात. यामध्ये पक्ष्यांच्या पायात लोखंडी गोलाकार रिंग किंवा रंगीत फ्लॅग लावले जातात, तर सॅटेलाईट लोकेशनच्या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाचे ठिकाणे सांगणारे ट्रान्समीटर त्याच्या शरीरावर बसविण्यात येते. हेगलिन गल पक्ष्याचा हजारो किलोमीटरचा प्रवास समोर आला आहे. उत्तर रशियामध्ये हे पक्षी प्रजनन करुन हिवाळ्यामध्ये दक्षिण-पश्चिम आशिया, भारतीय उपखंड, पूर्व आशिया आणि पूर्व आफ्रिका येथे स्थलांतर करतात.
श्रीलंकेतील मन्नार येथे हिवाळी स्थलांतर केलेल्या हेगलिन पक्ष्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी एका मादी हेगलिन पक्ष्याच्या शरीरावर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवण्यात आले. 'श्रीलंका मायग्रेशन ट्रॅकिंग प्रोग्राम'च्या माध्यमातून 'चायनिज अॅकॅडमी आॅफ सायन्सेस'च्या सहकार्याने 'श्रीलंका फील्ड ऑर्निथॉलॉजिकल ग्रुप'ने एप्रिल महिन्यामध्ये या पक्ष्याला सॅटलाईट ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर ४ मे रोजी या पक्ष्याचे लोकेशन उत्तर कझाकिस्तानमध्ये असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला या मादी हेगलिन पक्ष्याला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून सोडल्यानंतर तिने उत्तरेच्या दिशेने उड्डाण केले. त्यानंतर तिने भारताच्या दिशेन उड्डाण केले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरुन उड्डाण करुन तिने भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली. त्यानंतर ती सरळ उत्तरेकडे उडत गेली. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा तिने ओलांडली. १ मे रोजी अफगाणिस्तानामधून उझबेकिस्तानकडे पूर्व तुर्कमेनिस्तानमार्गे तिने उड्डाण केले आणि त्याच रात्री ती कझाकिस्तानच्या दिशेने मार्गस्थ झाली. २ मे रोजी तिने कझाकिस्तानच्या बायकोनूर शहरातीस कोस्तानेय प्रदेशातील कुशमुरुन गावामध्ये प्रवेश केला. याठिकाणी रात्र घालवल्यानंतर ३ मे रोजी कुशमुरून येथून निघून ती दुपारपर्यंत उत्तर कझाकस्तानच्या प्रदेशात पोहोचली.