प्रमोद नरहर मुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मनमाड शाखेतून चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. महाराष्ट्र बँकेची मनमाड शाखा आणि प्रमोद मुळे हे जणूकाही एक समीकरणच बनले आहे. मे महिन्यापासून ग्राहकांना निश्चितपणे प्रमोदची उणीव भासेल यात शंकाच नाही. पंचेचाळीस वर्षांपासुन संघ स्वयंसेवक असलेले प्रमोदजी बँके सोबतच सा. विवेकचे सेवायात्री बनून नांदगाव तालुक्यात घराघरात विवेक पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत.
शालेय शिक्षण मनमाड येथे घेऊन १९८२ मध्ये मनमाड महाविद्यालयातून बी.कॉममध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले प्रमोदजी निकालापूर्वीच महाराष्ट्र बँकेच्या सेवेत नाशिक येथे रुजू झाले. पहिली ३-४ वर्ष नाशिक येथे काढल्यानंतर सलग ३६ वर्षे मनमाड शाखेत मुख्य रोखपाल म्हणून कार्यरत होते. एकाच शाखेत एकाच पदावर एवढ्या प्रदीर्घ काळ रहाणे हा विक्रम प्रमोदजींनी प्रस्थापित केला आहे. वास्तविक बघता प्रमोदजींसोबत लागलेले अनेक कर्मचारी बँकेचे शाखाधिकारी बनले, पण संघ कार्यासाठी प्रमोदजींनी पदोन्नती न स्वीकारता, आहे त्याच पदावर काम करण्यात समाधान मानले. संघकार्यासाठी एवढा प्रचंड त्याग करणाऱ्या व्यक्ती विरळ आहेत, त्यात प्रमोद एक आहेत. प्रमोद आपल्या कामात अत्यंत निष्णात, काम कामाची गती प्रचंड असलेला कर्मचारी म्हणून परिचित आहेत. त्यांचे ग्राहकांशी वागणे अत्यंत प्रेमाचे, ३६ वर्षात त्यांनी ग्राहकांशी जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले आहेत. ग्राहकांच्या अडीअडचणीत, सुख दुःखात, सातत्याने मदत करणारा म्हणून प्रमोदजींकडे सर्व खातेदार मोठ्या आशेने बघत असतात. अशी वागणूक राष्ट्रीयीकृत बँकतील कर्मचाऱ्यांकडून मिळणे अत्यंत दुर्मिळ झाले आहे, पण प्रमोदजी मात्र सातत्याने सुहास्य वदनाने, सर्व खातेदारांना सहकार्याची भूमिका बजावत असतो. ग्राहकांची कामे बँकेच्या हिताला बाधा न पोहोचवता, बँकेच्या नियमात राहून, ग्राहकांची मदत करून, त्यांच्या अडचणी सोडविण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. सेवानिवृत्त होताना त्यांची चार महिने एवढी रजा शिल्लक होती. कोवीडचा कालावधी सुरू आहे, तरी देखील जोखीम पत्करून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रमोदजी हे बँकेच्या सेवेत कार्यरत होते. प्रमोदजी ही मनमाड शाखेची असेट मानली जाते. म्हणूनच प्रमोदजींच्या सेवानिवृत्तीनंतर निश्चितपणे बँकेला आणि ग्राहकांना त्याची उणीव व भासल्या खेरीज राहणार नाही. प्रमोद हे गेल्या पंच ४५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशी विनम्र व तत्पर सेवा देणे प्रमोदजींना हे सर्व फक्त आणि फक्त संघ संस्कारामुळेच शक्य झाले.
तृतीय वर्ष संघ शिक्षित असलेले प्रमोद मुळे यांनी आपल्या स्वभावाने व सेवेने अनेक नवनवीन लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात आणले. शहरात साप्ताहिक विवेकच्या विक्रीचा आलेख चढता ठेवण्यात प्रमोद मुळे यांची प्रचंड मेहनत आहे. त्यामुळेच साप्ताहिक विवेक असो की संघ विचाराचे कोणतेही साहित्य असो शहरात त्याला प्रचंड मागणी असते. ५ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मनमाड येथे प्रवासास आले असताना प्रमोद मुळे यांच्या घरी त्यांनी काही काळ वास्तव्य केले. मोहन भागवत यांचे आदरातिथ्य करण्याची संधी प्रमोदजींना मिळाली याबाबत प्रमोद मुळे हे स्वतःला धन्य मानतात. साप्ताहिक विवेक असेल किंवा संघ कार्य असेल सर्वच कामे प्रमोदजी अत्यंत निष्ठेने, मेहनतीने, दीर्घोद्योग पणे करत असतात. साप्ताहिक विवेकचे काम एक व्रत म्हणून गेल्या वीस वर्षांत पासून प्रमोद मुळे यांनी स्वीकारले आहे. त्यामुळेच नांदगाव तालुक्यात विवेकच्या वाचकांचे जाळे ते विणू शकले. प्रमोदजींची बँकेतील सेवा तत्परता बघून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित झालेले, पुढे साप्ताहिक विवेकचे वाचक बनवून संघाचे हितचिंतक झालेल्या, कै. मोहन सोमण यांनी आपला ३५ लाख रुपयांचा राहता बंगला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २०१२ मध्ये दान केला. अयोध्या येथील प्रस्तावित श्रीराम मंदिर निधी संकलना करिता प्रमोद मुळे यांनी दीड महिना रजा घेऊन निधी संकलनाच्या कामात स्वतःला झोकून दिले. भरघोस निधी मिळवून दिला.
मनमाड शहरात गेल्या पंचवीस वर्षांत पासून शहराच्या सांस्कृतिक कार्याचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीचे प्रमोद मुळे हे संस्थापकीय सदस्य आहेत. समितीच्या कार्यात अत्यंत हिरिरीने, उत्साहाने, काम करत असतात. याच बरोबरीने प्रमोद मुळे हे शहरात होणाऱ्या विविध वक्तृत्व, वादविवाद, स्पर्धा, व्याख्याने यांना हमखास हजेरी लावणारा श्रोता म्हणून प्रमोद मुळे यांच्याकडे बघितले जाते. अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. वर्तमानपत्रे, साप्ताहिके, विविध व्यासपीठावरून आपली मते ठामपणे मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रमोद मुळे यांच्याकडे बघितले जाते. अर्थात बँकेची नोकरी सांभाळून एवढा मोठा कामाचा व्याप प्रमोदजी उभा करू शकले यामागची प्रेरणा म्हणजे त्यांच्या पत्नी सौ स्वातीताई या आहेत. स्वातीताईंची भक्कम साथ प्रमोदजींना लाभली आहे. स्वतः स्वातीताई भारतीय योग विद्या धाम नाशिकच्या अध्यापक, योग शिक्षिका आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रसार करण्याचे कार्य करत असतात. प्रमोदजी संघाचे काम करत असल्याने सातत्याने संघ कार्यातील कार्यकर्त्यांचा राबता त्यांच्या घरी असतो, विवेकानंद व्याख्यानमालेच्या वक्त्यांची देखील आपल्या घरी राहण्याची व्यवस्था प्रमोदजी करतात, या सर्वांची उत्तम बडदास्त अत्यंत विनम्रपणे व हसतमुखाने करण्याचे महत्त्वाचे काम स्वातीताई करत असतात. त्यामुळेच प्रमोदजी इतकी वर्ष अखंडपणे सामाजिक काम करू शकले.
एक महत्त्वाचे प्रमोदजींचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत त्यांनी ९५ वेळेला जनकल्याण रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले आहे. दर तीन महिन्यांनी ते जनकल्याण रक्तपेढी नाशिक येथे जातात व रक्तदान करत असतात. प्रमोदजी हे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेचे संचालक म्हणून काम बघत आहेत. शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मनमाड येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूलचा रेल्वे संदर्भातील प्रश्न निर्माण झाल्यावर याच्या सोडवणुकीसाठी करिता प्रमोदजींनी स्वतः प्रयत्न केले. संघ शिक्षा वर्गासाठी नागपूर येथे गेले असताना इंडियन हायस्कूल बद्दलची संघातील वरिष्ठांना देऊन शाळेची कैफियत त्यांच्याकडे मांडली, शाळेचा प्रश्न सोडविण्यासाठी भरीव असे योगदान दिले. सेवानिवृत्तीनंतर प्रमोद मुळे यांचे सर्व उपक्रम असेच नियमित चालू रहावेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम त्यांच्या हातून अधिकाधिक गतीने व्हावे, त्यांना चांगले निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, या आरोग्यमय शुभेच्छा.