मुंबई : अँटीलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हीरनच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील माजी एनकाऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी आणि शिवसेना नेते प्रदीप शर्मा यांनाही एनआयएने घेरले आहे. प्रदीप शर्मा या दोन्ही प्रकरणात तपासात आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. सचिन वाझेने तपास यंत्रणेकडे महत्वाची माहिती पुरवली आहे. वाझेने सांगितले की, प्रदीप शर्मासोबत मी काम केले असून त्याला मी आपला गुरू मानतो.
सचिन वाझेने आपल्या जबाबात म्हटले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया बाहेर विस्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यासाठी प्रदीप शर्मांनी मदत केली होती. पाच मार्च रोजी मनसुख हिरनचा मृतदेह आढळला तेव्हा प्रदीप शर्मा सतत वाझेंच्या संपर्कात होते. 'एनआयए'कडे ठोस पुरावे आहेत. बुधवारी प्रदीप शर्मा यांची सात तास चौकशी झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने शर्मांना विचारलेल्या प्रश्नांवर संतुष्ट नाही. त्यामुळे गुरुवारी दुसऱ्यांदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. २० जिलेटीनच्या काड्या प्रदीप शर्मांनीच ठेवल्याचा आरोप वाझेने केला आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा ?
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा मुंबई पुलिस दलातील सर्वात चर्चिले जाणारे पोलीस अधिकारी होते. आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत शर्मा यांनी एकूण ३१२ एन्काऊंटर केले होते. कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व पालघरमधील नालासोपारा या भागातून त्यांनी निवडणूकही लढवली. शिवसेनेतील वरच्या फळीतील नेतृत्वातही त्यांचे वजन आहे.
शर्मांच्या टीममध्ये होते वाझे आणि विनायक शिंदे
मनसुख हिरन हत्याकांड प्रकरणात अटक सचिन वाझे आणि विनायक शिंदे हे प्रदीप शर्मांच्या तुकडीचे सदस्य राहीले होते. त्यांची टीममध्ये असताना सॉफ्टवेयर अभियंता ख्वाजा यूनुसच्या २००२ प्रकरणात वाझेचे नाव पुढे आले होते. वाझेला या काळात निलंबित करण्यात आले होते. विनायक शिंदे २००६ लखन भैया एन्काऊंटर प्रकरणात शर्मा निर्दोष मुक्त झाले होते.
मुंबई पोलीस दलातील अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना शंभर कोटींचे टार्गेट देण्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. सीबीआयचे पथक गुरुवारी मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमवीर सिंह यांची चौकशी करण्यासाठी पोहोचले होते. कलीनातील डीआरडीओ गेस्ट हाऊसवर बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील आणि अॅड. जयश्री पाटील यांचा जबाबही नोंदविला आहे.