फिलिपिन्सचा ‘तो’ बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2021   
Total Views |

Philippines_1  
 
 
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिथे संचारबंदी होती. पोलिसांचा रस्त्यावर बंदोबस्त होता. पण कोरोनामुळे काम नाही, धंदा नाही. त्यामुळे अर्थाजन ठप्प. घरी खायला अन्न नाही. आजारी असेल तर औषध घ्यायची सोय नाही. काही ठिकाणी तर पाणी आणि शौचालय घरापासून दूर. इतक्यात पोलिसांना एक व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसली. त्यांनी त्याला थांबवले. कोरोना संचारबंदी असताना बाहेर पडला म्हणून त्याला १०० उठाबशा काढायला लावल्या. तो थकलेला होता, दु:खी, अस्वस्थ होता. तो करूण स्वरात दिनवाणेपणे म्हणत होता, “माझ्या घरी प्यायला पाणी नाही. मी पाणी आणायला बाहेर निघालो.” पण त्यांनी त्याला उठाबशा काढायला सांगितल्या. त्याने कशाबशा उठाबशा पूर्ण केल्या. आपण पोलिसांनी दिलेला दंड पार पाडू शकलो. आता पाणी आणायला जाऊ शकतो. या विचारात त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. हलकेसे स्मित त्याच्या ओठावर आले. तो मनाशीच हसला. पण नेमके हे पोलिसांनी पाहिले. त्यांना तो त्यांचा अपमान वाटला. न झालेल्या अपमानाची अद्दल घडवण्यासाठी पोलीस पुन्हा पुढे आले. दरडावून त्याला सांगू लागले, “तुला अजून २०० उठाबशांची शिक्षा. या २०० उठाबशा काढल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही.” तहानेने व्याकुळ झालेला तो माणूस हताश झाला. घरी पाण्यासाठी तळमळत असलेले त्याचे कुटुंब त्याच्या डोळ्यासमोर आले. पाणी घरी न्यायलाच हवे. ही शिक्षा संपवून आपण पाणी घेऊन जाऊ. या विचाराने त्याने उठाबशा काढायला सुरुवात केली. एक-दोन-तीन म्हणत त्याने २०० उठाबशा अक्षरश: मरत मरत काढल्या. त्याच्या अंगात त्राण उरले नाही. पोलिसांची माफी मागून तो भेलकांडत पाणी आणायला गेला आणि तसाच पाणी घेऊन घरी गेला. त्याला काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागले आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जास्तीच्या श्रमामुळे त्याचा मृत्यू झाला.
 
 
 
पोलिसांच्या भीतीने त्याने मरत रडत ३०० उठाबशा काढल्या. त्याच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या. वाचकहो, ही घटना आहे फिलिपिन्स देशाची. याच आठवड्यातली. आताही रस्त्यावर येणाऱ्या आणि बळी जाणाऱ्या त्या व्यक्तीबाबत विचार करून डोळ्यांत अश्रू येतात. कोरोना आहे म्हणून माणसाचे जगणे तर थांबत नाही ना? संचारबंदी करून लोकांना त्यांच्याच घरात डांबून ठेवाल, पण घरात डांबले म्हणून शरीराची भूक आणि तहान पूर्ण होत नाही ना? तर असो. या व्यक्तीच्या मृत्यूने सगळा फिलिपिन्स नव्हे तर जगभरातील सगळी संवेदनशील माणसं कळवळली, हादरली. फिलिपिन्स हा देश तसा बौद्ध धर्मीयबहुल. या देशावर सोळाव्या शतकात स्पेनचे परराज्य होते. मात्र, काही दशकांमध्ये स्पेनच्या साहित्यिकाने पारतंत्र्यावर कादंबरी लिहिली. जनजागृती झाली, स्पेनविरोधात प्रचंड जनमत एकवटले. मग, स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या पाश्चात्य दुनियेतल्या स्पेनने या लेखकाला मृत्युदंडाचे शासन दिले. त्यामुळे पारतंत्र्य विरोधातली चळवळ बुजली. पुढे अठराव्या शतकाच्या मध्यात अमेरिका आणि स्पेनमध्ये युद्ध झाले. त्यात स्पेनने माघार घेतली. त्यावेळी फिलिपिन्सवर अमेरिकेने दावा ठोकला. आठव्या शतकातच फिलिपिन्स तसा बौद्धबहुल झाला होता. असा या फिलिपिन्सचा इतिहास. पारतंत्र्याचे अनेक अंगार झेलत फिलिपिन्स आज स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, माणुसकी वगैरे संवेदना फिलिपिन्स जपत आला आहे. मात्र, कोरोना काळात हे सगळे गडप झाले.
 
 
 
जगभरात कोरोनाचे थैमान आहे. त्यानुसार तेथील सरकारने नियमही लादले आहेत. जसे सौदी अरेबियामध्ये विशिष्ट नियम आहे. तिथे मुस्लीम भाविक ‘अल मस्जिद अल नवावी’ आणि ‘मस्लीज अल हराम’ या त्यांच्या दोन पवित्र स्थळांना श्रद्धेने भेट देत असतात. तिथे ते उमरा (त्यांचे श्रद्धा कर्म) करण्यासाठी जातात. सौदी सरकारने नियम बनवले. त्यानुसार कोरोनाविरोधातल्या दोन्ही लस घेतल्या. श्रद्धाळूंना आता सौदीच्या पवित्रस्थळी येण्यासाठी परवानगी आहे. बाकीच्यांना प्रवेश निषिद्ध आहे. हेच वातावरण जगभर आहे. प्रत्येक खंडात, प्रत्येक देशात कोरोनाचे नियम जनतेच्या दैनंदिन जीवनावर बंधनच आहेत. संचारबंदीमुळे, ‘लॉकडाऊन’मुळे कोरोना संपतो का? संपला का? ‘ब्रेक द चेन’ हे मान्य आहे. पण ‘चेन ब्रेकिंग’मध्ये माणसाच्या मानवी मूल्यांवर, अधिकारांवर गदा येते, त्यांचे काय?
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@