केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट येतेय अशी टांगती तलवार डोक्यावर असतानाच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. व यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर महाराष्ट्राला मुद्दामून लस दिली जात नसल्याचा व अन्य राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जात असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून घडणाऱ्या घटनांप्रमाणेच सुरु असणाऱ्या राजकारणावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केले. याशिवाय जावडेकरांनी राज्यातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्रात २३ लाख डोसेस दिले जात आहेत. आणि दिवसेंदिवस या लसीकरण होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.
कोरोना प्रतिबंधक डोस महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांना पाठविणे, तिथून तहसीलला, तालुक्यांच्या सरकारी, खासगी हॉस्पिटलला पोच करणे हे काम केंद्र सरकारचे नसुन ते राज्य सरकारचे आहे. केंद्र सरकार राज्यांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त कोटा देते, असे जावडेकर म्हणाले. तसेच कोरोना लसीकरणाच्या नियोजनावर भाष्य करताना देखील त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात ५ लाख डोस खराब केल्याचे म्हणाले. राज्य सरकार आपले काम नीट करत नसून दुसऱ्यांना दोष देत आहे, असेदेखील जावडेकर म्हणाले.