‘झार’ व्लादिमीर पुतीन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2021   
Total Views |

Russia_1  H x W
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आपल्याच कैफेत असतात. रशियाला पूर्वीचे सर्वशक्तिमान स्वरूप प्राप्त करून देणे, हे त्यांचे ध्येय असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी हवे ते करण्याची त्यांची तयारी असते. आता रशियाला शक्तिमान बनविताना स्वत:ला शक्तिमान बनविण्यास ते विसरलेले नाही. अर्थात, पुतीन यांना ‘हुकूमशहा’, ‘क्रूर राज्यकर्ता’, ‘लोकशाहीविरोधी’ अशी अनेक लेबले पाश्चात्य जगताकडून लावली जातात. मात्र, त्याकडे ‘सपशेल’ दुर्लक्ष करून पुतीन आपले काम करीत असतात. कारण, रशियन जनमत आपल्या पाठीशी असल्याचा त्यांचा दावा आणि ठाम विश्वासही आहे. त्यामुळे अन्य जग काय बोलते, याकडे लक्ष न देता पुतीन आपला कारभार करीतच असतात. त्यांच्या एकूणच राजकारणाची धाटणी पाहता ते स्वत:ला रशियाचे झार समजत असावेत, असे वाटते. झार म्हणजे राजा म्हणजेच रशियाचे राज्यकर्ते.
 
तसे वाटण्याचे कारण म्हणजे आता पुढील १५ वर्षे व्लादिमीर पुतीन हेच रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत आणि तसे त्यांनी आपल्याकडे लावली होती तशी आणीबाणी वगैरे न लावता अगदी रितसर घटनेत बदल करून आणि ते संमत करून घेऊन केले आहे. गतवर्षी पुतीन रितसर निवडणुकीत बहुमताने निवडून आले आणि त्यांनी रशियाची घटना बदलली. आता त्यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे आणि त्यांनी नुकतीच २०३६ पर्यंत त्यांनाच पदावर राहता येईल, या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये व्लादिमीर पुतीन पुन्हा निवडून आल्यावर ते २०३६ पर्यंत सत्तेत राहणार आहेत. तसे झाल्यास पुतीन एकूण १५ वर्षे सत्तेमध्ये राहतील आणि दीर्घकाळ रशियाचे सत्ताधीश राहण्याचा जोसेफ स्टालिन यांचा विक्रमही ते मोडतील. रशियन घटनेनुसार यापूर्वी २०१२ आणि २०१८ मध्ये सलग दोनवेळा राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यामुळे त्यांना २०२४ साली पुन्हा निवडणुकीस उभे राहता येणे शक्य नव्हते. मात्र, आता या विधेयकावरील स्वाक्षरीमुळे पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या विधेयकामध्ये त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या मर्जीतील दिमित्री मेदवेदेव यांनादेखील अधिकार बहाल केले आहेत. मेदवेदेव हे २००८ ते २०१२ या कालावधीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते, आता त्यांनादेखील आणखी दोनवेळा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे.
 
एकूणच व्लादिमीर पुतीन यांचा हा प्रकार म्हणजे रशियाचे हुकूमशहा होण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही विरोधकांनी केली आहे. अर्थात, पुतीन यांनी अतिशय नम्रपणे सांगितले आहे की, २०२४ पर्यंतचा कार्यकाळ आपल्यासाठी पुरेसा असून त्यानंतर निवडणूक लढविण्याविषयी सध्या तरी आपला कोणताही विचार नाही. मात्र, पुतीन हे २०२४ साली पुन्हा एकदा निवडणूक लढविणार आणि विजयी होण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे.
 
पुतीन यांचे अशाप्रकारे दीर्घकाळ सत्तेत राहणे हे अनेक अर्थांना महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या चिनी विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात केल्याप्रकरणी चीनला दोषी धरण्यात येत आहे. चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांना हरतऱ्हेने शह देण्यासाठी आता जगातील प्रमुख देश एकत्र येत आहेत. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया यांनी ‘क्वाड’ला दिलेले आक्रमक स्वरूप हे त्याचेच द्योतक आहे. दुसरीकडे चीनला जाहीरपणे काबूत ठेवण्याचे प्रयत्न करणारे डोनाल्ड ट्रम्प जरी सत्तेत नसले तरीही अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानेदेखील चीनविषयक कठोर धोरणाचीच री ओढली आहे. त्यामुळे चीनची कोंडी करण्यात अमेरिकेचे प्राधान्य असल्याचेच सिद्ध झाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये रशिया अगदी शांतपणे परिस्थितीचा आढावा घेत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक अभ्यासक सध्या रशियाला चीनचा दुय्यम भागीदार वगैरे मानत असले तरीदेखील प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. कारण, पोलादी पडद्याआड राहून आपले सामर्थ्य वाढविणे हे रशियाचे खास वैशिष्ट्य. त्यामुळे सध्या जरी अनेकांना चीनचा वरचश्मा दिसत असला तरीदेखील प्रत्यक्षात तसे नाही. पुढील दशकभरात जागतिक राजकारणात अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे पुतीन तोपर्यंत सत्तेत राहिल्यास त्याचा मोठा परिणाम होणार यात कोणतीही शंका नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@