पंढरपूरच्या लेकीची मुंबईत भरारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2021   
Total Views |

Ranjana Borade_1 &nb
 
 
 
महिला सक्षमीकरणाचा वसा उचलत मुंबई ते सांगली, असे समाजशील उपक्रम राबवत आरोग्यक्षेत्रातही कार्यरत असलेल्या रंजना बोराडे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
स्वतंत्रपणे स्वत:ची अद्ययावत लॅबोरेटरी उभी करणे, त्यातल्या सर्वच जबाबदाऱ्या अत्यंत कुशलपणे सांभाळणे, समाजात आदर आणि तेवढाच सन्मान मिळवून लोकांचा विश्वास प्राप्त करणाऱ्या विक्रोळीच्या रंजना बोराडे. सकाळी लवकरच त्यांची लॅब सुरू होते ती रात्री उशिरापर्यंत. इथे व्यवहारापेक्षाही त्यांनी माणुसकी जपलेली आहे. कोरोनाकाळातही रंजना यांनी लॅब सुरू ठेवली. गरजू आणि खरंच ऐपत नसणाऱ्यांची तपासणी विनाशुल्क करावी, हा रंजना यांचा नियम. त्यांच्या समाजशील स्वभावामुळे परिसरातील आयाबायांना काहीही समस्या आली तर त्या हक्काने रंजना यांना सांगतात. महिलांचे बहुतेक प्रश्न हे योग्य समुपदेशन, आरोग्य सुविधा आणि आर्थिक स्वावलंबनाने सुटतील. या विचारांनी त्यांनी महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबन हा उद्देश साध्य करण्यासाठी ‘रेणुका महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था’ निर्माण केली. त्याद्वारे त्यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. या संस्थेद्वारे त्यांनी शासनाची दत्तक वस्ती योजनाही यशस्वीपणे राबवली. त्यांचे सासर सांगल-जतचे. मुंबईतून जतला त्यांचे येणे-जाणे असायचेच. गावातील गृहिणी खरंच कष्टाळू-मेहनती. या महिलांच्या कुटुंबाची आर्थिकता बेताचीच. अज्ञानामुळे किंवा माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न आहेतच. महिलांना घरी करण्यासारखे काम मिळाले तर त्यांच्याही हातात पैसा येईल. त्यांना विविध प्रश्नावर माहिती द्यायला हवी. याच उद्देशाने त्यांनी ‘अवनी हेल्पो फाऊंडेशन’च्या द्वारे जतमध्ये १०० गरजू महिलांचे एकत्रीकरण केले. यात अकुशल महिलांनाही करता येईल, असा रोजगार उपलब्ध करून दिला.
 
रंजना मूळच्या पंढरपूर तालुक्यातील अजनसोड गावच्या. वडील रामचंद्र दुबल आणि आई सीताबाई. उभयतांना सात मुले. त्यापैकी एक रंजना. रामचंद्र हे शेतकरी. मराठा समाजाच्या दुबल दाम्पत्याने मुलांना उच्च संस्कार दिले. मुलांनी शिकावे म्हणून रामचंद्र कर्ज काढत. ते कर्ज शेतीच्या उत्पन्नाने फेडत. मात्र, कधी कधी नव्हे नेहमीच त्या शेतमालातून कर्जाचे व्याजही फिटत नसे. आलेले उत्पन्न कर्ज फेडण्यात जात असल्याने घरात गरिबीच. मात्र, गरिबीचा बाऊ न करता हे कुटुंब स्वाभिमानाने जगले. रंजना यांना वर्षानुवर्ष एकच शाळेचा ड्रेस वापरावा लागला, तसेच पैसे नाहीत म्हणून दहावीपर्यंत त्यांनी कधी पायात चप्पल घातली नाही. नवी कोरी पुस्तकं तर कधी पाहायलाही मिळाली नाहीत. घरात वीज नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात त्यांना रात्री रात्री अभ्यास करावा लागला. मात्र, त्या वर्गात नेहमी पहिल्या दुसऱ्या क्रमांकानेच उत्तीर्ण व्हायच्या. रंजना यांचा दिनक्रम कसा, तर सकाळी ६ वाजता उठायचे. काही असेल तर खायचे, नाहीतर ७ ते दुपारी ११ शाळेत जायचे. शाळा घरापासून दूरच. दुपारी घरी यायचे, आई कसेही करून जेवण बनवायचीच. ते खाऊन पुन्हा शाळेत जायचे. संध्याकाळी घरी यायचे. घरच्या शेतात जायचे. तिथल्या भाज्या खुडायच्या. त्या धुवायच्या. रात्री त्या भाज्यांच्या जुड्या बनवायच्या. तो भाजीपाला रामचंद्र किंवा रंजना यांचा मोठा भाऊ पंढरपूरला नेऊन विकायचे. रंजना यांचा दिवस अभ्यासाव्यतिरिक्त शेतकामात आणि घरच्या पशुधनाचा चारा शोधण्यात जायचा. पशुधनासाठी अन्न शोधणे हे जिकिरीचे काम. ऊन-वारा पावसात शेतात जायचे. कधी शेतात चिखल तर कधी पाणी. त्यात नागाचे, सापाचे दर्शन तर नेहमीच. त्या शेतातून पशूसाठी त्यांना आवडणारा चारा आणायची. पण, रंजना हातात काठी घेऊन जायच्या. सापबीप आडव आले तर संरक्षण म्हणून. हे कष्ट आणि इतक्या कष्टातूनही गरिबीचा शाप. त्यामुळे रंजना यांनी ठरवले की, आपण शिकायचे. दरमाह निश्चित उत्पन्न देणारी छोटीशी नोकरी करायची. दहावीनंतर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीपर्यंत त्या वसतिगृहातून शिकल्या. पुढे विज्ञान शाखेत पदवीधर झाल्या. त्यांच्या मानलेल्या मामांनी सहज सांगितले की, लॅबोरेटरी प्रशिक्षणाचे शिक्षण घे. तिथे आपल्या गावातली कुणी मुलगी शिकलेली नाही, तोपर्यंत रंजना यांचे बंधू चांगल्या कामाला लागले होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. एक वेगळे शिक्षण म्हणून त्यांनी लॅबोरेटरी प्रशिक्षण घेतले. तेव्हाच त्यांचा विवाह तानाजी बोराडे यांच्याशी झाला. तानाजी अगदी खुल्या स्वभावाचे. रंजना लग्नानंतर मुंबईत आल्या. गाव ते मुंबई भरपूर फरक. सुरुवातीला त्या दबून गेल्या.
 
आपण गावातून आलेलो. मुंबईत आपण काहीच करू शकत नाही, असे त्यांना वाटायचे. पण, त्यांच्या पतीने त्यांना हिंमत दिली. ‘लॅबटेक्निशियन’ शिक्षणाचा प्रत्यक्ष सराव व्हावा म्हणून त्यांनी एका ओळखीच्या लॅबमध्ये शब्द टाकला. रंजना यांनी दोन-तीन महिने तिथे काम केले. त्यांच्यात आत्मविश्वास आला. पतीच्या साहाय्याने कर्ज काढून त्यांनी भाड्याची जागा घेतली आणि लॅब सुरू केली. पण, घर आणि लॅब यामध्ये खूप अंतर होते. रंजना या दोन मुलांच्या आई झाल्या होत्या. लॅबला जाताना त्या मुलांना शेजांऱ्याकडे ठेवत. पण, मुलांच्या जडणघडणीच्या वयात त्यांच्यापासून दूर राहायला नको, हा विचार करून रंजना यांनी पुन्हा कर्ज काढले. मोठे घर घेतले. आता घरातच त्यांनी लॅब सुरू केली. त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम केले. रंजना यांना पुढच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी यशस्वी प्रयत्न करायचे आहेत. निदान संपर्कातील महिलांचे थोडेतरी प्रश्न सोडवायचे आहेत. त्या म्हणतात, “ ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ त्याप्रमाणे महिला सशक्तीकरण झाले, तर कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचेही सशक्तीकरण होणार आहे. या कार्यात मला सदैव प्रेरणा देते आणि देत राहणार ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य.”
 
@@AUTHORINFO_V1@@