तिने जपला पर्यावरणाचा ध्यास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2021   
Total Views |

news s  _1  H x




निसर्गाविषयीचे प्रेम आणि पर्यावरण वाचविण्याची धडपड यातून त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करणार्‍या रूपाली शाईवाले यांच्याविषयी आपण जाणून घेऊया.



निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या वाडा या छोट्याशा गावात रूपाली यांचे बालपण गेले. तिथे बहुसंख्य वनवासी लोकांची वस्ती असून शाळेत जातानाही शेतातून जावे लागत असे. त्यामुळे त्यांना शेतीविषयी थोडीफार माहितीही मिळत होती. शहरात लोकल बंद पडल्यावर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मिळते, तशीच सुट्टी गावात शेततळ्यात पाणी साचल्यावर त्यांनाही मिळत असे.
 
 
 
 
बालपणच निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळे त्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम होतेच. त्यामुळे करिअर करताना निसर्गावरच काहीतरी करायचे हे लहान असतानाच त्यांनी ठरविले होते. रूपाली यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. त्या घराच्या अंगणात खूप फुलझाडे लावत असत, तसेच त्यांनी शेतात जाऊन भातलावणीही केली होती. दरम्यान, दहावीनंतर रूपाली यांनी विज्ञान शाखेची निवड केली. रूपाली यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण वाड्यातच झाले. रूपाली यांचे पदवीचे शिक्षण कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयात झाले.
 
 
पदवीसाठी त्यांनी ‘बॉटनी बायोटेक्नोलॉजी’ हा विषय घेतला होता. पदव्युत्तर शिक्षण घेताना ‘एनव्हायर्नमेंटल डेव्हलपमेंट’मध्ये पर्यावरणीय विकास याचा दीड वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. ‘एनएनईईआरआय’ या संस्थेतून नागपूरला ‘वेस्ट वॉटर डिव्हिजन’मधून त्यांनी इंटर्नशीप केली. जमिनीच्या भूगर्भात पाण्याची पातळी कशी खाली जाते, त्यासाठी काय केले पाहिजे, यावर रूपाली यांचा प्रकल्प होता. हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप झाल्यानंतर रूपाली यांचे लग्न झाले. त्यामुळे काही काळ त्या अभ्यास व कामापासून दुरावल्या. लग्नानंतर २००० साली रूपाली डोंबिवलीत आल्या. रूपाली यांनी हळूहळू शाळेमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
 
 
हे काम सुरू असतानाच रूपाली ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या संपर्कात आल्या. रूपाली यांना ‘पर्यावरण दक्षता मंच’चे काम आपल्याच जवळपास सुरू आहे, हे जाणवले. मग त्यांनी ‘पर्यावरण दक्षता मंच’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रूपाली यांनी 98 साली पर्यावरणीय दृष्टीने अभ्यासक्रम स्वीकारला होता. त्यावेळी पर्यावरणाचे महत्त्व फारसे कोणाला नव्हते. त्यांना पर्यावरणाचा अभ्यास हा महाविद्यालयात जाऊन करायचा विषय आहे का? असेही अनेक जण म्हणत असत. पण, रूपाली यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही.
 
 
रूपाली यांचा मूळ उद्देश स्थानिक पातळीवर ज्या समस्या भेडसावतात, त्यावर कसा तोडगा काढता येईल, हाच होता. झाडे अशी लावली की मरतात, कचर्‍याची समस्या, अशा साध्या समस्या सोडविण्यास सुरुवात केली. प्लास्टिक पिशव्या मिळत असतानाही रूपाली मात्र कापडी पिशव्यांचा वापर करीत असत. थोडासा अभ्यास केल्यामुळे भविष्यात या गोष्टी त्रासदायक ठरणार हे त्यांना समजले होते. पण, लोक त्यांना वेड्यात काढत असत. या गोष्टी मिळतात, तरी कशाला कापडी पिशव्या वापरते, असा त्यांच्याविषयी लोक विचार करत.
 
 
‘पर्यावरण दक्षता मंडळा’चे मुख्य उद्देश पर्यावरण शिक्षण, जागृती आणि शोध आहे. त्यांचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ हा विद्यार्थी आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून निसर्गाविषयीही कविता होती, धडा आहे. ते विषय घेऊन त्या इयत्तेसाठी पर्यावरण शिक्षण हा विषय घेऊन मंच अभ्यासक्रम बनवितो व त्या शाळेशी संपर्क साधतो. ही ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करा, असे त्यांना सूचविले जाते. आठवड्याची ३० मिनिटांची ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ घेतली जाते. पर्यावरण शिक्षण शालेय विद्यार्थ्यांना दिले जाते. तर महाविद्यालयीन तरुणांमध्ये कृतिशीलता महत्त्वाची असते. त्यामुळे मंचाकडून त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमातून जागृती केली जाते.
 
 
कडोंमपाच्या सहकार्याने गेल्या सात वर्षांपासून २४ विसर्जन स्थळांजवळ निर्माल्याचे संकलन केले जाते. निर्माल्य खतप्रकल्पाला जाते का हेसुद्धा काम पाहिले जाते. ‘पर्यावरण दक्षता मंच’ हा नेहमी स्थानिक पातळीवर सोबत येणार्‍या संस्थांना बरोबर घेऊन आपला प्रकल्प त्यांच्यावर सोपवून नवे काम हाती घेतो. कारण संस्था एखाद्या प्रकल्पात अडकून राहिली तर ते काम पुढे जाते. पण, संस्थेचा विकास होत नाही. ते काम स्थानिक पातळीवर सोपवून आपण दुसरा प्रकल्प हाती घ्यायचे काम ‘पर्यावरण दक्षता मंच’ करीत असतो. पर्यावरणाशी संबंधित निसर्ग भटकंती कार्यक्रम घेतला जातो. तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा अभ्यास केला जातो. या परिसरात एवढी संपदा आहे हे लक्षात आल्यावर विद्यार्थीदेखील त्याकडे वळतात. सण-समारंभ साजरे केले जातात.
 
 
वटपौर्णिमा, रक्षाबंधन, गणपती, दिवाळी, होळी या सणांच्या मार्फत पर्यावरण कसे पोहोचल व ते सण पर्यावरणपूरक कसे साजरे करू शकतात, याविषयी जनजागृती केली जाते. वडाची उगविलेली झाडे ‘रेस्क्यू’ करून दहा लोकांना ती वाढविण्यासाठी दिली होती. डोंबिवलीत ‘नंदनवन बाग स्पर्धा’ ही नुकतीच घेतली होती. घरगुती बाग असलेल्या लोकांसाठी ही स्पर्धा होती. होळी सणाच्या निमित्ताने वृक्षतोड होते. ऑक्सिजन कमी होतो, हे विद्यार्थ्यांना सांगितले जाते. निसर्गात आढळणार्‍या फुले आणि पानांपासून रंग कसे बनावायचे हे शिकविले जाते.
 
 
शेंदरी वनस्पतीच्या बीपासून नारिंगी, हळदीपासून पिवळा, बीटपासून मजेंटा, जांभूळ आणि गोकर्णपासून जांभळा, पालकपासून हिरवा रंग, झेंडूपासून लाल, पिवळा आणि केशरी रंग बनविला जातो. आवळ्यापासून काळा रंग बनवायला शिकविला जातो. कोरडा रंग बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. रासायनिक रंग कसे अपायकारक आहेत हे सांगितले. जेणेकरून ते पर्यावरणपूरक रंग बनविण्यास प्रेरित होतील. ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या माध्यमातून रूपाली या विद्यार्थ्यांना आणि युवा पिढीला ‘निसर्गाकडे चला’असा जणूकाही संदेशच देत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@