राजकीय बदलांची निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2021   
Total Views |

election_1  H x


उद्या घोषित होणारे पाच राज्यांचे निकाल भाजपसह सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण, या निवडणुकीत भाजपला लक्षणीय यश मिळाल्यास भाजपवरचा मतदारांचा विश्वास अधोरेखित होईल, तर विरोधकांचा उरलासुरला आत्मविश्वास डळमळीत होईल, काँग्रेसमध्ये तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयीची नाराजी आणखी गडद होईल.


पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आता उद्या जाहीर होईल. साधारणपणे दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वंच राज्यांचे चित्र स्पष्ट होईल. त्यापूर्वी गुरुवारी आलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये विविध माध्यम-सर्वेक्षण संस्थांनी आपापला अंदाज वर्तविला आहेच. आता त्यावर दोन दिवस चर्चा आणि त्यानंतर सत्तास्थापन होईपर्यंतचे कवित्व सुरू राहणार आहे. तेवढेच आठ-दहा दिवस कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेकडेही सत्तेसाठी कोरोना लाटेत निवडणूक घेणार्‍या मोदी सरकारचा निषेध असो, असे म्हणणार्‍या सर्वांचे दुर्लक्ष होईल. मात्र, या पाच राज्यांचे निकाल भाजपसह सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण, या निवडणुकीत भाजपला लक्षणीय यश मिळाल्यास भाजपवरचा मतदारांचा विश्वास अधोरेखित होईल, तर विरोधकांचा उरलासुरला आत्मविश्वास डळमळीत होईल, काँग्रेसमध्ये तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयीची नाराजी आणखी गडद होईल. त्याच वेळी, भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर अन्य नेहमीच्या आरोपांप्रमाणेच कोरोना संसर्ग पसरविल्याचा आरोप जोरदारपणे केला जाईल. त्याचप्रमाणे पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभेमध्येही भाजप पराभूत झाल्याचेही लगेचच जाहीर केले जाईल.


“जोपर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येत नाही, तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ आला; असे मी म्हणणार नाही,” असे वक्तव्य भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळविल्यानंतर केले होते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवायचीच, या जिद्दीने भाजप मैदानात उतरला होता. अर्थात, बंगाली जनतेचा जनाधार प्राप्त असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींसोबत त्यांचा सामना होता. त्यामुळे भाजपने सर्व राज्यांमधील नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते प्रचारासाठी सुमारे वर्षभर आधीपासूनच पाठविण्यास प्रारंभ केला होता. त्याचप्रमाणे भाजपने ज्या पद्धतीचा प्रचार केला, त्यामुळे ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये आठवडाभर तळ ठोकून राहावे लागले. एकूणच ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्याला लोकसभा निवडणुकीत मिळालेला तडाखा पाहता २०१६ साली अवघे तीन आमदार असलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत शंभरी पार केल्यास, तो एक चमत्कार ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या धोरणांमुळे हिंदू मुस्लीम मतपेढी निर्माण झाली. त्यापैकी हिंदू मतपेढीसह मोठ्या प्रमाणावर मुस्लीम मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी नक्कीच देव पाण्यात ठेवले आहेत. ‘एक्झिट पोल’चा विचार केल्यास, जवळपास प्रत्येक पोलमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अगदी जवळची लढत असेल, असे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपच्या अंतर्गत गोटातील माहितीनुसार, बंगालमध्ये भाजप सत्तेत येईलच, असे सांगितले जात आहे. त्यासाठी एक विशिष्ट आकडादेखील सांगण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे डाव्यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या काँग्रेसला मोठे अपयश पोलमध्ये दाखविण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी अन्य चार राज्यांपेक्षा बंगालकडेच देशाचे लक्ष असणार आहे.


गत विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये सत्ता स्थापन करून भाजपने ईशान्य भारतात विजयी प्रवेश केला होता. त्यापूर्वी भाजपला ईशान्य भारतात यश मिळूच शकत नाही, असा एक समज पसरविण्यात आला होता. मात्र, भाजपने तेथे अत्यंत कौशल्याने सत्ता स्थापन केली आणि पाच वर्षे कारभारही करून दाखविला. अतिशय संवेदनशील राज्य असलेल्या आसाममध्ये सशस्त्र गट कार्यरत होते, त्यांना मोडून काढणे, ‘एनआरसी’ राबविणे, असे अनेक महत्त्वाचे निर्णय आसाममध्ये झाले. सोबतच हिमंता बिस्वा सरमा यांच्यासारखा तगडा नेता असल्याने भाजपने आसामसह ईशान्य भारतात गेल्या काही वर्षांत यश मिळविले आहे. काँग्रेस नेहमीप्रमाणे आसाममध्येही अत्यंत कमकुवत झाली, त्यामुळे ‘एआययुडीएफ’ या धर्मांध पक्षासोबत हातमिळवणी करून आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड या निवडणुकीत त्यांनी केली आहे. आसाममध्ये स्थानिक अस्मितेचा मुद्दा नेहमीच प्रभावी ठरत आला आहे, त्यास योग्यप्रकारे हाताळणे भाजपला जमले आहे. जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल’मध्ये आसामची सत्ता भाजप टिकविणार असल्याचे दिसून आले आहे. आसाममध्ये पुन्हा सत्ता आल्यास ईशान्य भारतावर भाजपची पकड अधिक घट्ट होईल, त्याचे परिणाम दिसून २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत दिसून येतील.


पश्चिम बंगाल आणि आसामपेक्षा अतिशय वेगळे राजकारण आहे ते तामिळनाडूचे. या राज्यात दीर्घकाळपासून द्रमुक आणि अद्रमुक या पक्षांचे सर्वेसर्वा करुणानिधी आणि जयललिता यांचा अंमल होता. या दोघा नेत्यांनी आपापल्या करिष्म्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांना राज्यात प्रवेश मिळू दिला नाही. त्याचप्रमाणे ‘द्रविडी अस्मिता’ हा येथील कळीचा मुद्दा. मात्र, करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय दोन्ही पक्षांनी यावेळी प्रथमच निवडणूक लढविली आहे. भाजप आणि काँग्रेस अनुक्रमे अद्रमुक व द्रमुक यांचे ‘ज्युनिअर पार्टनर’ म्हणून निवडणुकीत उतरले होते. ‘एक्झिट पोल’मध्ये स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या द्रमुकला बहुमत दाखविण्यात आले आहे. करुणानिधी यांच्या पश्चात पक्षावर पकड निर्माण करणार्‍या स्टालिन यांना खरोखर सत्ता मिळाल्यास तामिळनाडूच्या राजकारणात करुणानिधींच्या वारसदाराचा प्रश्न निकाली निघेल, तर दुसरीकडे अद्रमुकमधली अंतर्गत सुंदोपसुंदी उफाळून येईल. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘द्रविडी अस्मिते’चा मुद्दा पुन्हा एकदा जोर पकडेल. द्रमुकच्या साथीने काँग्रेसला किरकोळ लाभ होईल. मात्र, दक्षिण भारतात विस्तार करू पाहणार्‍या भाजपला थोडा अडथळाही निर्माण होईल.


केरळ. भारतातल्या डाव्या पक्षांचा शेवटचा आसरा. बंगालमधून ममतांनी डाव्यांना पिटाळून लावल्यानंतर फक्त केरळमध्ये आता त्यांचे अस्तित्व उरले आहे. बंगालप्रमाणेच केरळमध्ये सत्ता आणणे महत्त्वाचे आहे, हेदेखील अमित शाह यांनी वारंवार सांगितले आहे. बंगालप्रमाणेच राजकीय हिंसाचाराची सवय केरळला आहे. बंगालप्रमाणेच येथेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना डाव्या हिंसेचा सामना करावा लागला आहे. मात्र, अगदी प्रतिकूल परिस्थिती असतानाही भाजप कार्यकर्ते केरळमध्ये कार्यरत आहेत. यावेळी भाजपने मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना रिंगणात उतरवून सर्वांनाच चकित केले होते. सोबतच विद्यमान मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि ‘गोल्ड स्कॅम’चा मुद्दा केवळ भाजपने वर्षभरापासून लावून धरला होता. अर्थात, ‘एक्झिट पोल’ काही भाजपच्या बाजूने नाहीत. उलट यावेळी प्रथमच सत्ताधारी पक्षच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये भाजपला आणखी बरीच मेहनत करावी लागणार, हे स्पष्ट आहे.


पुदुच्चेरी या लहानशा केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीकडे तसे दुर्लक्षच झाले, त्यामुळे ‘नॉन ग्लॅमरस’ निवडणूक असे म्हणावे लागेल. दक्षिणेत काँग्रेसचा हा एकमेव थांबा आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच तेथील काँग्रेसचे सरकार पडले. ‘एक्झिट पोल’मध्ये काँग्रेसचा दक्षिणेतील अखेरचा थांबाही भाजपकडे गेल्याचे चित्र आहे.एकूणच, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडविणारे निकाल रविवारचे असणार आहेत. कारण, बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास किंवा तीन वरून शंभरी जरी भाजपने काढली, तरीही मोदी विरोधात राष्ट्रीय नेतृत्व करण्याच्या आकांक्षांना ममतांना आवरावे लागेल, त्यामुळे काँग्रेसचाही उरलासुरला धीर नाहीसा होईल. त्यामुळे कोरोनाकाळात झालेल्या या निवडणुका राजकीय परिवर्तनासाठी महत्त्वाच्या ठरतील.

@@AUTHORINFO_V1@@