उत्सवी उत्साहमूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2021   
Total Views |
RSS _1  H x W:



कार्यक्रमांचे आयोजन हा आबासाहेबांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यातूनच त्यांनी विविध उपक्रमांमध्ये चैतन्य आणले.
 

 
सा.‘विवेक’ने त्याच्या वाचकांच्या ‘इकोसिस्टीम’मध्ये एक आगळे स्थान निर्माण केले आहे. एखाद्या विचाराच्या प्रसारमाध्यमासमोर एक पेच नेहमी असतो, तो म्हणजे त्या वाचकाच्या आवडीचेच देत राहायचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवायचे की, प्रबोधनाचे प्रवाहदेखील आपल्या लिखाणाच्या माध्यमातून वाचकांमध्ये जोजवायचे.
 
ही प्रक्रिया नक्कीच अवघड आहे. एखाद्या विचारसरणीतून आकाराला आलेल्या वाचकवर्गाला काही नवे पचनी पाडणे इतके सोपे नाही. ‘विवेक’ने ही किमया मात्र लीलया साधली. आबासाहेबांच्या श्रद्धांजलीपर लेखात ही प्रक्रिया उलगडण्याचे एकमेव कारण म्हणजे, आबासाहेब या प्रक्रियेचा एक उत्सवी, उत्साही भाग होते.
 
 
‘विवेक’च्या या बदलत्या आकृतिबंधाच्या काळात जेव्हा जेव्हा ‘विवेक’मध्ये जाणे होई, तेव्हा या प्रक्रियेची जाणीव होत असे. रमेश पतंगे आणि आबासाहेब पटवारी यांच्या दोघांच्या केबिन एकच होत्या. दोघांमध्ये एक पार्टिशन होते. खरं तर दिलीप करंबेळकर, रमेश पतंगे, आबासाहेब पटवारी या तिघांचेही स्वभाव अत्यंत भिन्न; परंतु सा.‘विवेक’ या तिघांनाही जोडणारा महत्त्वाचा घटक होता.
 
 
आबासाहेब पटवारी मुळात राजकीय पिंडाचे. कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्त्वाला जसे लोकांचे वेड असते, तसेच ते आबासाहेबांनाही होते. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहराचे पहिलेे नगराध्यक्ष म्हणून पद भूषविलेले. गावातून उपनगर आणि नंतर एक सांस्कृतिक चळवळींचे शहर म्हणून डोंबिवलीने जो नावलौकिक कमावला, त्यात डोंबिवलीतल्या संस्थाजीवनाचा मोठा भाग आहे आणि या संस्था उभ्या करण्यात आबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता.
 
 
आबासाहेब मुळातच उत्सवी उत्साहमूर्ती. कार्यक्रम करायचा म्हटला की, आबासाहेबांना हुरूप येई. तो कसा करायचा, याबाबतही त्यांच्या सूचना असत. भव्य कार्यक्रमांची तर त्यांना हौसच होती. त्यांच्या सोबत काम करणार्‍या कार्यकर्त्याला एवढा मोठा कार्यक्रम करायचा तर आर्थिक पाठबळ कसे उभे करायचे, असा प्रश्न पडायचा. आबासाहेबांकडे तो मांडला की, त्यांचे एक वाक्य ठरलेले असे.
 
 
“करू रे... तुम्ही कामाला तर लागा.” असे कितीतरी कार्यक्रम डोंबिवलीत ‘विवेक’च्या टीमने अनुभवले. कायर्र्क्रम कितीही मोठा असला तरी त्याची भव्यता आखूडती घेण्यासाठी पैशाचे कारण लागले नाही. कोणी ना कोणी मदत करायला सहज पुढे यायचे आणि त्यांनी केलेल्या मदतीचा फार मोठा गवगवा न करता, कार्यक्रमही पार पडून जायचा.
 
 
मोठ्या उद्योगपतींपासून ते लहानशा मिठाईच्या दुकानदारापर्यंत कुणीही आबासाहेबांना कधीही ‘नाही’ म्हटले नाही. डोंगराएवढे काम आबासाहेबांनी डोंबिवलीसाठी केले. पण, त्याचा गाजावाजा केला नाही. आपल्या कामातून एक चांगले ‘गुडविल’ मात्र निर्माण करून ठेवले होते, ज्यामुळे त्यांनी हात घातलेल्या कुठल्याही प्रकल्पाला मदत करण्यासाठी अनेक अदृश्य हात पुढे येत राहिले.
 
फार काळ पूर्ण वेळ राजकारणात न रमलेल्या आबासाहेबांनी नंतर संस्थाजीवनच आपल्या आयुष्याचे केंद्र मानले. महाराष्ट्रातच नव्हे, तर शेजारच्या राज्यातही अपार कष्ट करून आबासाहेबांनी ‘विवेक’चे वर्गणीदार वाढविले. त्यांचा कष्टाचा प्रभाव इतका होता की, दोन वर्षांपूर्वी भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीचा योग आला, तेव्हा अमित शाहांनी आवर्जून आबासाहेब पटवारींची चौकशी केली. आपल्याला आपल्या संस्थेच्या कामासाठी थोरामोठ्यांशी संवाद ठेवायचा आहे आणि तो वाढवायचा आहे, याविषयी आबासाहेबांची धारणा ठाम होती. यासाठी लागणारे अवांतर वाचन, लिखाण, जनसंपर्क या सगळ्यावर त्यांची पकड होती.
 
राम शेवाळकरांपासून ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांपर्यंत अनेकांशी त्यांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. सा.‘विवेक’च्या वाढीसाठी त्याचा पुरेपूर उपयोग झाला. कल्पकता, त्यातून उपक्रमांची निर्मिती, थोरामोठ्यांना त्यात जोडून घेणे, हे असे अनेक गुण आबासाहेबांपाशी होते. जनसंपर्क आणि त्यासाठी कराव्या लागणार्‍या तंत्रांचा पुरेपूर वापर ही आबासाहेबांची खासियत होती. मधल्या काही काळात आबासाहेब परदेशात होते, तेव्हा ते फेसबुक वापरायला शिकले. लोकांशी जोडलेले राहण्याचा हा त्यांचा या वयातला प्रयत्न अफलातून होता. ‘वेब’माध्यमे लोकांपर्यंत पोहोचायला सोपी आणि सुलभ आहेत, हे त्यांना कळत होते.
 
 
तरुणांशी असलेला त्यांचा संवाद ही तर समजून घेण्याची गोष्ट होती. समोरच्या पिढीचा माणूस एका पुढच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि ती आधी आपण नीट समजून घेतली पाहिजे, असे त्यांचे वागणे असे. तरुणांशी बोलताना त्यांचे म्हणणे ते आधी नीट ऐकून घेत, मगच त्या कलाने त्यांचा संवाद सुरू होई. या सगळ्या व्यापात त्यांना मोलाची साथ होती ती काकूंची. लाडू वळणे हा काकूंचा हातखंडा. घरात आलेल्या प्रत्येकाने त्यांच्या या अगत्याचा अनुभव घेतला आहेे. आबासाहेबांची संग्राहकता आत्मसात करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
@@AUTHORINFO_V1@@