आधुनिक तंत्रज्ञानाने भारलेले एकविसावे शतक

    03-Apr-2021
Total Views |

tech_1  H x W:


येत्या काळात ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’ अन् ‘बायो टेक्नोलॉजी’ यांच्या संयोगामुळे फार मोठी उलथापालथ जागतिक स्तरावर अपेक्षित आहे. हे तंत्रज्ञान आतापर्यंत माणसाच्या बाह्यांगापर्यंतच मर्यादित होते.पण, आता या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्र संयोग झाल्यामुळे ते आपल्या शरीराच्या आतपर्यंत पोहोचले आहे. खोलपर्यंत शोध घेत ते जीवनाचा हिस्सा बनणार आहे.



मागचे शतक संपले अन् नवे शतक सुरू झाले, तेव्हा अनेक तज्ज्ञांनी, तंत्रज्ञांनी ‘मिशन २०२०’ या घोषवाक्याखाली बरीच स्वप्ने रंगविली होती. आराखडे तयार झाले.शिक्षण, आरोग्य, आधुनिक दळणवळण, शेती, पर्यावरण, आर्थिक स्थैर्य, जागतिक शांतता, ‘ग्लोबल वार्मिंग’ अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रासाठी उद्दिष्ट रेखांकित केली होती. पण, दुर्दैवाने हेच २०२०वर्ष जगासाठी वेगळ्या अर्थाने ‘माईल स्टोन’ ठरले. कोरोना विषाणूच्या हाहाकाराने माजलेला धुमाकूळ वर्ष उलटून गेले तरी संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर, नवीन अनुभवाच्या पायावर आपण जर पुढील दोन-तीन दशकांचा किंबहुना, एकूणच भविष्यकालीन एकविसाव्या शतकाचा विचार केला तर काय चित्र दिसेल? रॉकेटगतीपेक्षाही जास्त वेगाने घोडदौड करणारे आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आपल्याला कुठे, कोणत्या दिशेने घेऊ जाणार? हा विषय या घडीला महत्त्वाचा ठरतो. इतिहासाचे तज्ज्ञ, जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील प्राध्यापक युवल नोवा हरारी यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. एकविसाव्या शतकसाथीचे त्यांचे विविध क्षेत्रातील निष्कर्ष चिंतनीय आहेत, अभ्यासपूर्ण आहेत.


येत्या काळात ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’ अन् ‘बायो टेक्नोलॉजी’ यांच्या संयोगामुळे फार मोठी उलथापालथ जागतिक स्तरावर अपेक्षित आहे. हे तंत्रज्ञान आतापर्यंत माणसाच्या बाह्यांगापर्यंतच मर्यादित होते.पण, आता या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्र संयोग झाल्यामुळे ते आपल्या शरीराच्या आतपर्यंत पोहोचले आहे. खोलपर्यंत शोध घेत ते जीवनाचा हिस्सा बनणार आहे.आपली बुद्धी, इंद्रिये, मन, विचारशक्ती, आपल्या भावना, संवेदना हे सगळे समजून घेऊन त्यावर अधिराज्य गाजविण्याचा, ताबा मिळविण्याचा प्रयत्न आहे. ‘इन्फोटेक’, ‘बायोटेक’ हे तंत्रज्ञान आपल्या शरीरातील आतल्या जगात शिरकाव करून, नवजीवन निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. त्यात बर्‍याच प्रमाणात यशदेखील मिळते आहे. कारण, यांच्या मदतीला अत्याधुनिक अति जलदगतीने काम करणारे संगणकदेखील आहेत! येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय), ‘बिग डेटा विश्लेषण’, ‘अल्गोरिदम’, ‘जेनेटिक इंजिनिअरिंग’, ‘मशीन लर्निंग’, ‘रोबोटिक्स’, ‘नॅनोटेक्नोलॉजी’, हे कळीचे, महत्त्वाचे विषय ठरतील या नवोदय क्रांतीच्या दृष्टीने. एकविसावे शतक या संकल्पनांच्या, तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले असेल.


हा बदल सहजासहजी झालेला नाही. ‘स्टीम इंजीन’, ‘इलेक्ट्रिसिटी’, ‘वायरलेस कम्युनिकेशन’, संगणक अशी एकापाठोपाठ झालेली वैज्ञानिक क्रांती आपण अनुभवलेली आहे. काही उदाहरणे देऊन हे सिद्ध करता येईल. आधी आपल्याकडे गल्लोगल्ली टायपिंगचे क्लासेस असायचे. तरुण-तरुणी नोकरी मिळेल म्हणून ‘टायपिंग’, ‘स्टेनो’ शिकायचे.आता ‘टाईपरायटर’ बाद झाले. सारे जण संगणकावर, मोबाईलवर टायपिंग शिकले.विशेष म्हणजे, हे शिकणेदेखील ज्याच्या त्याच्या वकुबीप्रमाणे, सोयीप्रमाणे आहे.प्रत्येकाची टाईप करण्याची पद्धत, गती वेगवेगळी असते. पूर्वी पोस्ट खात्याला संलग्न असे तार खाते होते. तातडीचे निरोप, सूचना तारेने दिल्या जायच्या. मृत्यूची बातमी तारेने यायची. त्यामुळे तारवाला आला की धडकी बसायची! आता हे ‘टेलिग्राफ डिपार्टमेंट’च बंद झाले. मोबाईल आल्याने ‘लॅण्ड लाईन’ फोनचे महत्त्व कमी झाले. सगळी देवाणघेवाण ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘मेसेजिंग’, ‘ईमेल’ने, ‘इंटरनेट’ने, ‘व्हिडिओ कॉल’ने केली जाते. त्यामुळे पोस्टमनची वाट पाहणे बंद झाले. नव्या पिढीला पोस्टकार्ड, ‘इनलँड लेटर’ हे शब्दही माहिती नसणार. शहरी भागातून, उच्च, मध्यमवर्गीय मंडळींकडून चलनी नोटांची देवाणघेवाण बंद झाली.

‘क्रेडिट’-‘डेबिट’ कार्डच्या सोबतीने ‘पेटीएम’, ‘गुगल-पे’ अशा सुविधा आल्याने जवळ पर्स बाळगण्याची गरज नाही. पैसे चोरीला जाण्याची भीती नाही. आता तर पान ठेलेवाला, चहा टपरीवाला, ऑटो रिक्षाचालक असे सगळेच ‘पेटीएम’, ‘गुगल-पे’ने पैसे स्वीकारतात. हे नवे तंत्रज्ञान आपण सहज स्वीकारले आहे. सुरुवातीला समजायला, वापरायला थोडे अवघड वाटले असेल. पण, सवयीने तेच सोयीचे झाले आहे. या कोरोनाकाळात तर लहान मुलेदेखील पालकांच्या मदतीने ऑनलाईन शिक्षणासाठी तत्पर झाली आहेत. मुलाखती, परीक्षा, सेमिनार, मिटिंग्ज सगळे संगणकाद्वारे आभासी पद्धतीने सुरू आहे. हे तंत्रज्ञान ‘युझर फ्रेंडली’ आहे. आत्मसात करायला, शिकायला सोपे आहे. प्रवासात जवळचा अनोळखी प्रवासी बोलत बोलता मित्र होतो, तसे नवनवे तंत्रमंत्र जगण्याचा भाग म्हणून आपण सहज स्वीकारले आहेत. या वर उल्लेखिलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुढे भविष्यात नेमका काय परिणाम होणार, काय काय, किती, कसे बदलणार हे बघणेदेखील रंजक ठरेल.

मानवी क्षमता या दोन प्रकारच्या-एक शारीरिक अन् दुसरी बौद्धिक. बुद्धी फक्त माणसालाच देवाने दिली हा आपला समज. म्हणजे कोणतीही गोष्ट शिकणे, अभ्यासणे, विश्लेषण करणे, समजणे, त्यावरून अचूक निष्कर्ष काढणे, विचार करणे, संवाद साधणे, भावनांना प्रतिसाद देणे, अशा गोष्टी फक्त माणूसच करू शकतो, ही आपली धारणा.नव्या तंत्रज्ञानाने त्यालाच धक्का दिला. आता ‘बायो सेन्सर्स’, कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘बिग डेटा अ‍ॅनालिसीस’, ‘इन्फोटेक’ यांच्या संयुक्त सहकार्याने ही सगळी कामे संगणकदेखील करू शकतो. विशेष म्हणजे, माणसापेक्षा जास्त वेगाने, अधिक पद्धतशीरपणे अन् अचूक करू शकतो.इथे ‘बायो टेक्नोलॉजी’ अन् ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’, संगणक शास्त्र यांचे समिलन, (खरे तर त्यांचे ‘हॅपी मॅरेज’) महत्त्वाचे ठरते.आता तुमच्या मनातील भावना, संवेदना, विचार, तुमचा स्वभाव, आवडीनिवडी, तुमच्या शरीरातील अवयवांची क्षमता, त्यांचे आरोग्य, त्यातील कार्यप्रणालीतील चढउतार, बिघाड हे सारे रेकॉर्ड करणे, सेन्स करणे, त्याचे विश्लेषण करणे सहज शक्य झाले आहे. आपल्या शरीराची रचना, मेंदूची जडणघडण, मेंदूपासून सर्व अवयवांना जाणार्‍या संदेशाचे वहन, हे सगळे वाटते तितके सोपे नाही. शरीरशास्त्र शिकलेल्यांना यामागच्या गुंतागुंतीची सहज कल्पना येईल.परंतु, माहिती कितीही विशाल, गुंतागुंतीची, असली तरी, वेगवेगळ्या अंगाचे परस्पर संबंध ठरलेले (प्री डीटर्माईंड)सारखे बदलणारे असतील, तरीही अशा किचकट प्रक्रियाचा अभ्यास जलदगती संगणकामुळे सहज शक्य आहे! कारण, आता संगणकाची क्षमता, मेमरी, गती कितीतरी पटीने वाढली आहे.


कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आरोग्य क्षेत्रात फार मोठी क्रांती होणार आहे. ‘एआय’ डॉक्टर्सची सुविधा कुणालाही कुठेही उपलब्ध असेल. तुमच्या हाताला लावलेले घड्याळ किंवा तुमच्या एखाद्या अंगातील, अवयवातील (डोळे, कान) इलेक्ट्रॉनिक चीप तुमच्या शरीरातील, मेंदूतील सर्व चढ-उताराच्या नोंदी सहज करतील. रक्तदाब, हृदयाचा ‘पल्स रेट’, ‘ईसीजी’, रात्रीच्या झोपेची नोंद, रक्तातील साखर अशा महत्त्वाच्या नोंदी करणारी, अंगाचाच भाग असणारी यंत्रेच आता उपलब्ध आहेत. सध्या त्याची किंमत जास्त वाटत असली, तरी आधी महागडा वाटणारा मोबाईल आज ज्याप्रमाणे प्रत्येक लहानथोराच्या, गरीब-श्रीमंतांच्या हातात आहे, त्याप्रमाणे अशी ‘बायोसेन्सर्स’, उपकरणे अनेकांकडे दिसतील. त्यांची किंमत मागणीप्रमाणे कमी होत जाईल.सध्या आपल्याला एखाददुसरा जवळचा डॉक्टर उपलब्ध असतो. पण, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे जगाच्या कानाकोपर्‍यातील कुठल्याही तज्ज्ञाचा सल्ला आपण घेऊ शकतो. जी सुविधा एका मोठ्या शहरातील श्रीमंताला उपलब्ध असेल तीच सुविधा ग्रामीण भागातील दूरदूरच्या गरिबालाही उपलब्ध असेल.


तंत्रज्ञान जातपात, धर्म, पुरुष, स्त्री असे भेद करीत नाही. अनेक गोष्टी पुरुष डॉक्टर्सना सांगण्यात स्त्रियांना संकोच वाटतो. पण, सगळ्या नोंदी शरीरातील सेन्सर्स सांगणार असल्याने, ना भाषेचा प्रश्न, ना लज्जा-संकोचाचा प्रश्न. सध्या जागतिक आरोग्य संघटना नव्या रोगाच्या प्रादुर्भावाची घोषणा करते. वेगवेगळ्या प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ निरनिराळ्या देशात नव्या औषधांची, लसीची निर्मिती करतात. ही सगळी माहिती जगातील लाखो, करोडो डॉक्टर्सपर्यंत वेळेत पोहोचेलच असे नाही. पण, नव्या तंत्रज्ञानामुळे ‘एआय’ डॉक्टर्सना ही माहिती काही क्षणात मिळेल.खरी विश्वासार्ह माहिती मिळेल. एरवी माहिती पसरताना त्यात बरीच भेसळ असते, हे आपण अनुभवतो. अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व ‘एआय’ डॉक्टर प्रतिक्रिया देऊ शकतात.अनुभवाची देवाणघेवाण करू शकतात.‘इंटरनेट’, ‘नेटवर्किंग’च्या माध्यमातून या ‘नेटवर्क कनेक्टिव्हिटी’चे, अद्ययावत सुधारित माहितीच्या देवघेवीचे खूप फायदे आहेत. अर्थात काही तज्ज्ञ मशिनीपेक्षा जास्त उत्तम काम करतात हे खरे. पण, एकूणच गोळाबेरीज केली अन् या व्यवस्थेकडे विस्तारित मोकळ्या दृष्टीने पाहिले, तर तंत्रज्ञान माणसापेक्षा उजवे ठरते, अचूक असते. हलगर्जीपणा, भ्रष्टाचार याला तंत्रज्ञानात वाव नसतो हे महत्त्वाचे.

हे अधिक चांगले समजण्यासाठी आपण ‘ऑटो ड्रायव्हिंग’, स्वयंचलित कारचे उदाहरण घेऊ. आज दरवर्षी रस्ते अपघातात मरणार्‍यांची संख्या किती तरी जास्त आहे. युद्ध, गुन्हेगारी, दहशतवादी हल्ले या सर्वात एकून दरवर्षी जितके मृत्यू होतात, त्यापेक्षा दुप्पट मृत्यू रस्ते अपघाताने होतात! यातले ९० टक्के मृत्यू हे मद्यपान करून गाडी चालवणे, मोबाईलवर बोलणे, लक्ष विचलित होणे, अतिवेगाने गाडी चालवणे, नियम न पाळणे, अशा हलगर्जीमुळे, मानवी चुकांमुळे होतात. मशीन, नवे तंत्रज्ञान अशा चुका करणारच नाही. प्रत्येक गाडीत हे तंत्रज्ञान असल्याने, सर्व गाड्याचे नेटवर्क एकमेकांच्या संपर्कात असल्याने, दुसरा गाडीवाला ‘ओव्हरटेक’ करतोय की, ‘यु टर्न’ घेतोय की, अचानक ब्रेक दाबतोय, हे पहिल्या गाडीला कळेल. मानवी ‘ड्रायव्हिंग’मध्ये आपला दोष नसला तरी दुसर्‍या चालकाच्या चुकीने अपघात होतो.तंत्रज्ञानामुळे हा मानवी हलगर्जीपणा टाळता येईल. अपघातांचे, मृत्यूचे प्रमाण 90 टक्के कमी होईल.

‘पॅटर्न रेकग्निशन’ हे तंत्रज्ञानदेखील येत्या काळात खूप उपयोगी ठरेल. त्याच त्या पद्धतीचे ‘पॅटर्न’ हे तंत्रज्ञान समजून आत्मसात करते. त्याचे विश्लेषण करते.त्याप्रमाणे निर्णय घेते. इथे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ अन् ‘नुरल नेटवर्क’ या दोन क्षेत्रात स्पर्धा असेल. मानवी मेंदूची कार्यपद्धती, विविध मज्जातंतू पेशीमधील परस्पर सहकार्य, त्यांचे आरोग्य यांचा सखोल अभ्यास, अचूक विश्लेषण, या नव्या तंत्रज्ञानामुळे, गतिमान ‘अल्गोरिदम’मुळे शक्य होईल.गुन्हेगारी तपासात, माणसाचा खरे-खोटेपणा तपासताना ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची खूप मदत होईल. हे संगणकाचे, तंत्रज्ञानाचे निष्कर्ष मानवी निष्कर्षापेक्षा अधिक अचूक असतील. तुमच्या चेहर्‍याच्या स्नायूंच्या हालचाली, डोळ्यांच्या हालचाली, हाता-पायाच्या बोटांची कंपने, तुमच्या शरीराच्या घामाचा गंध, विविध ‘एआय’ सेन्सर्सद्वारे नोंदल्या जातील. त्या सर्व माहितीचे एकत्रित अचूक विश्लेषण केले जाईल. हे विश्लेषण करताना वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या अंगाचे स्वतंत्रपणे नवे, तर त्या विविध अंगांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन विश्लेषण केले जाईल. अशा कामात मानवी बुद्धीच्या मर्यादा असतात. अधिकारी दबावाखाली काम करतात. चुकीच्या मार्गाने जातात. एखादा मुद्दा निसटतो. गुन्हा शोधण्यासाठी तोच महत्त्वाचा असतो. तंत्रज्ञान काही विसरणार नाही. भेदभाव करणार नाही. खोटेपणा करणार नाही. माणसासारखे घोळ घालणार नाही. ते अचूक निर्णय घेईल, जलदगतीने निर्णय घेईल.

कलाक्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानामुळे क्रांती घडवून येईल. तुम्हाला हवे तसे, तुमच्या आवडीचे, तुमच्या भावनांशी जुळणारे संगीत निर्माण करता येईल. तुमच्या संवेदना प्रेरित करणारे समगीत, पेंटिंग निर्माण करता येईल.पूर्वी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी सर्व गायक, वादक एकत्र जमत. अनेक तालमी होत. चुका झाल्या तर पूर्ण गाणे पुन्हा रेकॉर्डिंग करावे लागे. आता गायक आपल्या सोयीने स्वतंत्र आपल्या ओळी गाऊन जाईल. अनेक वाद्याचे इफेक्ट्स संगणक निर्माण करेल. कोरसचा परिणाम तंत्राने देत येईल. गायकांची गरज नसेल. चुका दुरुस्त करून वेगवेगळे भाग सलग एकत्र जोडता येतील. ‘लाईव्ह’ कार्यक्रमात ‘नॉईज’ असतो.प्रत्यक्षात प्रक्षेपणात तो ऐकू येत नाही.शास्त्रीय संगीताच्या आधी वाद्ये मिळवण्यात कितीतरी वेळ जातो. ही वाद्ये तंत्रज्ञानामुळे अचूक लावता येतील. कमी वेळात हे काम होईल. शेवटी संगीतात, तीन सप्तकात, एका सप्तकाच्या सात स्वराच्या अंतरातदेखील गणिताचे सूत्र आहे. ‘फ्रिक्वेन्सी’चे गणित संगणक हे श्रुतीचे गणित पटकन समजून काम करेल, ते अचूक असेल. यामुळे निर्मितीच्या क्षेत्रात खर्चाची कितीतरी बचत होईल. साऊंड इंजिनिअरिंग, टेलिव्हिजन इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात संगणक, ‘एआय’ यामुळे सगळ्या पद्धती आरपार बदलतील.

या सर्वांचा परिणाम मनुष्यबळावर होईल हे खरे. त्या त्या क्षेत्रात परंपरेने चालत आलेली निपुणता कमावलेले कलाकार, इतर साहायक यांच्या पोटावर पाय मारल्यासारखे होईल. पण, हे सर्वच क्षेत्रात होईल. प्रत्येकाला या बदलाला सामोरे जावे लागेल. आपल्या कामाचे स्वरूप बदलावे लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायचे, तर नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. उदाहरणार्थ पायलटला रिपेअर, मेंटेनन्स, कम्युनिकेशन, रिसर्च, डेव्हलपमेंट, इनोव्हेशन अशा आव्हानात्मक क्षेत्रांत संधी असेल. कलाकार नवे प्रयोग करून नवनिर्मिती करतील. आपल्या कलेचा वारसा त्यांना जतन करून ठेवता येईल. पूर्वी माणसाबरोबर त्याच्या कलेचा शेवट होत असे. आता त्याच्या कलेचा ठेवा जतन करून ठेवता येईल. खरे तर आता ज्ञानाची खरी कसोटी लागेल. सर्वच क्षेत्रात हे बदल स्वीकारावे लागतील.‘एआय’ डॉक्टर्स आले तर इतर डॉक्टर वेगवेगळे रोग, त्यांची लक्षणे, निवारणाचे उपाय, शस्त्रक्रियेच्या नव्या पद्धती यावर संशोधन करू शकतील. तंत्रज्ञानाच्या मदतीने करावयाचे उपचार यावर ते अभ्यास करतील.हे काम त्यांच्या रुटीन कामापेक्षा जास्त आव्हानात्मक असेल.

हीच अवस्था शिक्षक, प्राध्यापकांचीही असेल. ऑनलाईन शिक्षण, ‘व्हिडिओ लेक्चर्स’, ‘सिमुलेशन’, ‘वेबिनार’, या माध्यमातून मिळणारे शिक्षण वर्गातल्या कंटाळवाण्या लेक्चरपेक्षा जास्त रंजक, समजण्यास सोपे असेल. शब्दाबरोबर चित्रांची, कृतीची साथ असल्याने संकल्पना समजणे सोपे असेल. हे शिक्षण एकांगी नसेल.एकाच प्रश्नाचा वेगवेगळ्या मार्गाने विचार करायला लावणारे, एकापेक्षा अधिक उत्तरे पर्याय शोधायला प्रवृत्त करणारे असेल. आता नव्या पिढीला नेमके काय शिकवायचे, किती अन् कसे, कुठे, शिकवायचे हेही नव्याने ठरवावे लागेल. नुकतीच शाळेत गेलेली मुले २०-२५वर्षांनंतर नव्या तंत्रज्ञांना सामोरे जातील. नव्या नोकर्‍यांना सामोरे जातील. ‘नोकरी’ ही संकल्पनाच तेव्हा बदलली असेल. त्यासाठी कंटाळवाणा, फक्त थिअरीवर आधारलेला जुना-पुराना अभ्यासक्रम कुचकामाचा ठरेल. त्याऐवजी चार ‘सी’वर आधारित शिक्षण द्यावे लागेल.

‘क्रिटिकल थिंकिंग’, ‘कम्युनिकेशन’, ‘कोलॅबोरेशन’, ‘क्रिएटिव्हिटी’ही ती चतुःसूत्री. चौकटी बाहेरचा विचार करायला प्रवृत्त करणे, उत्तम संवाद साधता येणे, मिळून मिसळून, एकमेकांना समजून सहकाराने काम करणे, नावीन्याचा ध्यास घेणे यासाठी मुलांना तयार करावे लागेल. फक्त तांत्रिक बाजू समजणे पुरेसे नाही. एकूणच आयुष्याचा बहुविध अंगाने विचार करणे, जीवनोपयोगी नवनवी कौशल्ये आत्मसात करणे, मुख्य म्हणजे सातत्याने होणारे बदल स्वीकारित त्याप्रमाणे नवनवीन संकल्पना आयुष्यभर शिकत राहणे, (लाईफ लाँग लर्निंग), हे नव्या शिक्षणप्रणालीचे उद्दिष्ट असेल, असायला हवे.त्यामुळे २०२०मध्ये जो आकस्मिक गोंधळ झाला, सर्वांनी अनुभवला, तसे पुढे होणार नाही. उलट नव्या पिढीची सशक्त मानसिकता वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करायला शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्टीने सक्षम असेल. भविष्यात शारीरिक अन् बौद्धिक संरचनाचे तंत्रज्ञानाच्या अवकाशात एकीकरण झालेले आपल्याला दिसेल. त्यासाठीसुद्धा वर उल्लेखिलेले, चर्चिलेले आधुनिक तंत्रज्ञानच कारणीभूत असेल. आपणा सर्वांचे एका वेगळ्या ‘सायबर स्पेस’मध्ये स्थलांतर झाले असेल.

आपले शरीर ही फक्त परमेश्वर निर्मित नैसर्गिक यंत्रणा न राहता, त्यातील ‘इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स’, संगणकाच्या चिप्स, ‘मेमरी डिव्हायसेस’ अशा संमिश्र यंत्रणेचे मिश्रण असेल. आपले एकूणच अस्तित्व म्हणजे एक वेगळे रसायन, कॉकटेल असेल. आपल्याला नव्या विश्वात घेऊन जाणारे, ‘सायबर स्पेस’मध्ये तरंगायला लावणारे कॉकटेल! सध्या ‘किंडर गार्डन’ किंवा पाळणाघरात असणार्‍या आपल्या नातवापुढचे ३०-४०वर्षांनंतरचे जग हे सर्वस्वी भिन्न असेल, कल्पनेपलीकडचे असेल एवढे निश्चित! लेखाच्या प्रारंभी ज्या प्रा. युवल हरारी यांच्या पुस्तकाचा उल्लेख आहे, ते पुस्तक लेखकाने पतीला अर्पण केले आहे. लेखक स्वतः पुरुष आहे! आताच सामाजिक परिवर्तन कोणत्या दिशेने होतेय याची ही फक्त झलक! या सर्व बदलांचा परिणाम आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय जीवनावरदेखील निश्चितच होत राहील. त्यावेळचे आर्थिक जग ही वेगळे असेल. ऊर्जा, पर्यावरण, दहशतवाद, सत्ता स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, वंश, जाती, भेद या सर्व संकल्पनांच्या व्याख्या पुढील काळात बदलत जातील. या बदलासाठी, स्पष्टीकरणासाठी वेगळा प्रबंध लिहावा लागेल. तो छोट्या लेखाचा विषय नाही.

- डॉ. विजय पांढरीपांडे
७६५९०८४५५५