कोरोनाच्या दुसर्या लाटेने जगभरासह महाराष्ट्रालाही जोरदार तडाखा दिला. परिणामी, पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला असून ऑक्सिजन बेड, व्हेटिंलेटरबरोबरच रक्ताचा तुटवडाही जाणवू लागला आहे. यानिमित्ताने एकूणच रक्तदानाचे महत्त्व आणि त्याविषयीची जागरुकता निर्माण करणारा हा महत्त्वपूर्ण लेख...
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्मरण करून माझ्या मनातील तळमळ व्यक्त करीत आहे. नेताजी स्वातंत्र्यलढ्यात म्हणाले होते, “तुम मुझे खून दो... मैं तुम्हे आझादी दूंगा।” आज भारतमाता आपल्या आजारी गंभीर लेकरांसाठी हीच अपेक्षा ठेवत आहे. सध्या मुंबई, महाराष्ट्रात रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. याचा सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना तीव्र परिणाम जाणवणार आहे. रक्ताची गरज मोठ्या शस्त्रक्रिया, थॅलसेमिया रुग्ण, रक्ताचे कर्करोगी यांना मोठ्या प्रमाणात लागते. सध्या कोरोनाचे संक्रमण तीव्र असल्याने रक्तद्रवदेखील मोठ्या स्वरूपात लागत आहे. सामान्यत: रक्ताची गरज शस्त्रक्रियेमध्ये रक्ताची पातळी सामान्य करण्यामध्ये कामी येते. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचे स्वरूप मोठे असते. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे स्वरूपदेखील मोठे असते, यात रुग्णाला वेळेवर रक्त मिळणे गरजेचे असते. सध्याच्या काळात रक्ताची तरतूद होऊ न शकल्याने काही ठिकाणी शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. याचा परिणाम आजार बळावण्यावर झाला आहे. अनेकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रक्तस्राव लवकर न थांबल्याने रक्ताची गरज भासते. सध्या असेही अनुभव येत आहेत. यात दुर्मीळ रक्तगट असेल तर रक्ताची पूर्तता करणे अत्यंत जटील होऊन जाते. कर्करोगावर उपचार पद्धतीमध्ये ‘केमोथेरेपी’ हा उपचार आहे. या ‘केमोथेरेपी’चे दुष्परिणामदेखील असतात. या ‘केमोथेरेपी’मुळे रक्ताची पातळी घसरते आणि अशा वेळी रुग्णास रक्त चढवले जाते. माझा सध्या फोन रात्री-बेरात्री कधीही वाजत आहे. याचे कारण अशा रुग्णांना लागणारी रक्ताची तीव्र निकड होय.
कधी समोरून फोन करणारे एखाद्या चिमुकल्याचे आई-बाबा असतात, जे हुंदके अनावर होऊन फोनवर बोलत असतात. अशांना रक्तकोशिकादान हे जीवनदानच म्हणावे. रक्ताच्या कर्करोगामध्ये कधी कधी रक्तस्राव होतो, तो थांबविण्यासाठी रक्तकोशिका अत्यंत महत्त्वाच्या असतात. मी अशीही कुटुंबे पाहतो की, एकाच कुटुंबात एकाच वेळी एकापेक्षा अधिक कर्करोगी आहेत, ज्यांना रक्ताची तीव्र गरज आहे. मुंबईत परराज्यातून देशाच्या कानाकोपर्यातून रुग्ण उपचार घेण्यास येतात. मुंबई पहिल्यांदाच रुग्ण म्हणून ते पाहत असतात. यांचे येथे कोणीही सगेसोयरे नसतात. अशा रुग्णांना कर्करोग उपचारात जेव्हा रक्ताची गरज लागते, तेव्हा ही मंडळी हवालदिल होतात. यांना रक्तदान करून आपणच मदत करून एकात्मभावाचे जतन करू शकतो.
जी स्थिती ‘केमोथेरेपी’त, तीच स्थिती ‘रेडिएशन’चे उपचार घेणार्यांची असते. माझ्या अनुभवात अगदी पहाटे ३ वाजता रक्त चढवून रुग्णास स्थिर केलेले मी पाहिले आहे. मला अगदी अलीकडेच एका तरुण मुलाच्या वडिलांचा फोन आला. समोरून अगदी काळजीचा स्वर होता. हा तरुण मुलगा ‘थॅलेसिमिया’ग्रस्त होता. अभ्यासात हुशार असलेला हा मुलगा अभियांत्रिकी पदवीधर आहे. पण, दुर्दैवाने या आजारामुळे या तरुणास आयुष्यभर दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. सध्याच्या या कठीण काळात हे रक्त मिळविणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. आयुष्यात कधी कुणाला रक्त लागले तर ते कुटुंब हवालदिल होते. मग त्या कुटुंबात इकडे-तिकडे बोटे दाखविण्यास सुरुवात होते. ‘अमुक-तमुक आहे ना... तो रक्त देते वा देतो.’ मग हा समर्पित रक्तदाता पुढे येतो आणि निकड पूर्ण करतो. पण, जसे मतदान १८व्या वर्षीपासून करता येते, तसे रक्तदानदेखील १८व्या वर्षीपासून करता येते. रक्तदाता हा प्रत्येकाच्या घरात घडला पाहिजे, ही जागृती स्वत:पासून होणे गरजेचे आहे.
आज भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. इतक्या प्रचंड लोकसंख्या असणार्या देशात रक्ततुटवडा जाणवतो. हा प्रत्येकाच्या आत्मचिंतनाचा विषय ठरावा. रक्त जगातल्या कुठल्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही. परमेश्वराने ही देणगी केवळ मानवालाच दिली आहे आणि याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे.सध्याचे कोरोना संक्रमण हे आव्हानात्मक आहे. ज्यांनी कधी ‘प्लाझ्मा’ हा शब्द ऐकला नव्हता, त्यांना ‘प्लाझ्मा घेऊन या,’ असे सांगितले जाते. हा ‘कोविड प्लाझ्मा’ ‘कोविड’ होऊन गेलेल्यांचा द्यावा लागतो. कारण, यात ‘अॅण्टिबॉडी’ आहेत. मी या माध्यमातून सरकारला अशी विनंती करु इच्छितो की, आज भारतात लसीकरण प्रक्रिया अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे. आपण लसीकरण टप्पा तीन कोटींच्या पलीकडे पार केला आहे. यातील स्वस्थ नागरिक ज्यांच्यात ‘अॅण्टिबॉडी’ तयार झाल्या आहेत. ते ‘प्लाझ्मादाते’ होऊ शकतात का, याबाबत शास्त्रज्ञांकडून अभिप्राय घ्यावा. लसीकरण वयोगटानुसार सुरू आहे. आता ४५वरील स्वस्थ नागरिकही लस घेण्यास पात्र ठरले आहेत. आज प्रत्येकाचाच जीव महत्त्वाचा आहे. पण, याच वेळी या लसीकरणाचा रक्तदानावर परिणाम होणार नाही, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकदा लस घेतील की, तीन महिने रक्तदान करता येणार नाही, अशी मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. सध्या 45 वरील वयोगट मोठ्या प्रमाणात रक्तदान प्रकियेत सहभाग घेतो. तो साहजिकच लसीकरणाच्या रांगेत उभे राहण्यास प्राधान्य देईल. या वयोगटातील समर्पित रक्तदात्यांना गटागटाने लसीकरण मिळाले तर त्यांचे जीवन सुरक्षित होईलच, शिवाय रुग्णांचे जीवनही सुरक्षित राहील. रक्तदानाचे चक्र अखंडित सुरू राहील. आज समाजात पिढीजात रक्तदाते आहेत. ज्यांच्या कुटुंबातील संस्कारांनी त्यांना रक्तदाते बनविले आहे. रक्तदाते होणे सोपे नाही, त्यात उच्च कोटीचा समर्पण भाव आहे. केंद्र आणि राज्य सरकारने रक्तदानाचे महत्त्व विशद करण्यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात याचा अंतर्भाव करावा. महाविद्यालयात याबाबत प्रबोधन शिबिरे घ्यावी, जेणेकरून समाजात अधिकाधिक रक्तदाते घडतील. आज मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये रक्ताची साधारण गरज रोज अदमासे दोन हजार युनिट्स इतकी मोठी आहे. आपले आजारी बांधव आपली नजीकच्या रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी वाट पाहत आहेत. त्यांना आपली गरज आहे. मोठ्या मनाने ‘रक्तसैनिक’ बनून रक्तपेढ्यांवर धाव घ्यावी.सीमेवर आपले बहादूर जवान प्रत्यक्ष चिन्यांना चीत करीत आहेत. देशात आपण ‘अदृश्य चिन्यामुळे’ उद्भवलेल्या परिस्थितीवर ‘रक्तदान’ करून मात करूयात...!
-प्रसाद अग्निहोत्री