सह्याद्रीतील 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाचे दर्शन; 'कॅमेरा ट्रॅप'ने टिपले छायाचित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2021   
Total Views |
 tiger _1  H x


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सह्याद्रीमधील एका 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) वाघाचे दर्शन घडले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री या वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या भागामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे.
 
 
 
 
 
गेल्यावर्षी राज्य सरकारने सह्याद्रीमधील आठ वनक्षेत्रांना 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'चे संरक्षण दिले होते. यामध्ये साताऱ्यातील जोर-जांभळी (६,५११ हे), कोल्हापूरमधील विशालगड (९,३२४ हे), पन्हाळा (७,२९१ हे), गगनबावडा (१०,५४८ हे), आजरा-भुदरगड (२४,६६३ हे), चंदगड (२२,५२३ हे) आणि सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग (५,६९२ हे) आणि तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हचा समावेश आहे. या वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव आणि खास करुन वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे. वन विभागाने संरक्षित केलेल्या या आठ 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'पैकी एका वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे.
 
 
 
वाघाच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी एका 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये कॅमेरा ट्रॅप लावले होते. या कॅमेरा ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री नर वाघाचे छायाचित्र आल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही बेन क्लेमंट यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. वाघाचे छायाचित्र हे त्याने केलेल्या शिकारीबरोबर टिपले गेल्याचे त्यांनी सांगितले. वाघाच्या सुरक्षित अधिवासाच्या दृष्टीने नेमक्या जागेबद्दल सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महत्त्वाचे म्हणजे सह्याद्रीत आठ 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन त्याठिकाणी वाघांचा संचार सुरू असल्याचे उघड झाल्याचे, बेन म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@