
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन्यजीव छायाचित्रांच्या हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळरानावर अधिवास करणाऱ्या खोकड प्रजातीच्या (इंडियन फाॅक्स) जीवाशी खेळ होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे काही पिल्लांना आपल्या जीवाला मुकावे लागले असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रणाच्या नावाखाली काही अप्रशिक्षित गाईड्सकडून (मार्गदर्शक) सुरू असलेल्या या गैरप्रकाराला वन विभागाने थांबविणे आवश्यक आहे.
पुण्यातील पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भिगवणपासून काही किलोमीटर अंतरावर कळसचे माळरान आहे. या माळरानावर विविध जीवांचा अधिवास असून खोकड प्रजातीचा याठिकाणी प्रामुख्याने अधिवास आहे. त्यामुळे या माळरानावर आजूबाजूच्या गावातील गाईड्सकडून पर्यटकांना आणले जाते. खोकड आणि त्यांच्या पिल्लांची छायाचित्र टिपण्यासाठी हौशी वन्यजीव छायाचित्रकारांची याठिकाणी खास करुन वर्दळ असते. मात्र, खोकड आणि त्यांच्या पिल्लाचे छायाचित्र मिळवून देण्याच्या नादामध्ये अप्रक्षित गाईड्स कडून काही अनुसूचित प्रकार केले जातात. छायाचित्रकारांना खोकडांचे छायाचित्र मिळावे म्हणून त्यांच्या बिळांसमोर कोबंडीचे मांस टाकण्याचे प्रकार याठिकाणी केले जातात. अशा प्रकारामधून याठिकाणी खोकडाच्या पिल्लांचा जीवही गेल्याचे समजते आहे.
फेेब्रुवारी महिन्यात कळसच्या माळरानावर अशाच प्रकारे खोकडांना बिळाबाहेर काढण्यासाठी गणेश भोई आणि दत्ता कुंदारे या गाईड्सनी कोबंडीचे मांस टाकल्याची माहिती येथील एका गाईडने नाव न छापण्याच्या अटीवरुन दिली. हे दोघे बिळाबाहेर कोबंडीचे मांस टाकत असल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. हे कोबंडीचे मांस खाऊन खोकडाच्या पिल्लांचा मृत्यू झाला असून त्यांचे अवशेष अजूनही या परिसरात पडून असल्याचा दावा त्या गाईडने केला आहे. या गाईडने फेब्रुवारी महिन्यामध्येच याविषयीची तक्रार वन विभागाकडे केली होती. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे सरतेशेवटी दखल घेतली न गेल्याने त्या गाईडने हा प्रकार गुरुवारी समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यानंतर स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी काळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश वन कर्मचाऱ्यांना दिले असून शुक्रवारपर्यंत अहवाल प्राप्त होईल."