परमवीर सिंह यांच्या अडचणीत वाढ ; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

    29-Apr-2021
Total Views |

Parambir Singh_1 &nb
 
 
 
मुंबई : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा हा गुन्हा नोंदवण्यात आला.


ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध २२ कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी २० एप्रिलला परमबीरसिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मध्यरात्री परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
 
 
 
 
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.



सचिन वाझे प्रकरणानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या सगळ्या घटनेनंतर परमवीर सिंह चांगलेच चर्चेत आले होते.