ठाणे : बुधवारी २८ तारखेला मुंब्रामधील नॉन कोविड खाजगी प्राईम रुग्णालयाला आग लागली. यावेळी आग लागल्यानंतर आयसीयूतील रुग्ण दुसऱ्या जागी हलवताना ४ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटना ताज्या असतानाच या दुर्घटनेने राज्य सरकारवर टीका होत आहे. "ठाकरे सरकारला जाग येण्यासाठी आणखी किती अग्नीतांडवाची गरज आहे?" असा प्रश्न भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.
भाजपचे नेते मनोज कोटक यांनी ट्विट केले आहे की, "ठाण्यातील मुंब्रा येथे प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये आग लागल्याच्या दुर्घटनेबद्दल मी शोक व्यक्त करतो. मृतांच्या कुटूंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी रुग्ण त्वरित बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. महाविकास आघाडीला जागे करण्यासाठी आणखी किती बळी जाणार ? जबाबदारीची जाणीव होण्यासाठी आणखी किती अग्नीतांडवाची गरज आहे?" अशी टीका केली आहे.