नवी दिल्ली : भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवासी विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया - भारत प्रवासावर निर्बध आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट सध्या भारतामध्ये पसरली असून याचा फटका आता आयपीएल २०२१ला देखील बसणार असे चिन्ह सध्या दिसत आहे. सरकारने या बंदीची घोषणा करताच आता आयपीएलमध्ये असणारे ऑस्ट्रेलियन हे मायदेशी परतण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे आयपीएल नियोजित वेळेनुसार सुरू राहणार असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे काही ऑस्ट्रेलियन खेळाडू हे मायदेशी परतले आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे केन रिचर्डसनस आणि एडम झम्पा आणि राजस्थान रॉयल्सच्या अँड्रयू टायचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू मायदेशी परतण्याची शक्यता आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायदेशी परतण्याची चिन्ह आहेत. खेळाडू, त्याव्यतिरिक्त असणारा स्टाफ, प्रशिक्षक, समालोचक असे मिळून एकूण ३० जण ऑस्ट्रेलियात परत जाण्यास इच्छूक आहेत. भारतात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तरी देखील आयपीएल स्पर्धा सुरू असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे सर्व खेळाडू खाजगी विमानाने ऑस्ट्रेलियामध्ये परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका आयपीएलला, तसेच बीसीसीआयला देखील बसणार असे चित्र दिसत आहे.