मुंबई - दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी मृत डाॅल्फिन वाहून आलेला आढळला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डाॅल्फिनच्या मृत शरीराला ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली.
मुंबईतील सागरी परिक्षेत्रामध्ये डाॅल्फिन या सागरी सस्तन प्राण्याचा वावर आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवर इंडियन ओशन हम्पबॅक प्रजातीचे डाॅल्फिन सर्वसामान्यपणे आढळतात. या प्रजातीचा मृत डाॅल्फिन सोमवारी दुपारच्या सुमारास दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील समुद्रामध्ये आढळून आला. कफ परेड येथील मेकर टाॅवरच्या मागच्या बाजूस असलेल्या समुद्रामध्ये मृत डाॅल्फिनचे शव तरंगताना दिसले. ही माहिती वन विभागाच्या कांदळवन कक्षाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी समुद्रात तंरगणारे डाॅल्फिनचे शरीर किनाऱ्यावर आणण्यात आले. डाॅल्फिनचे शरीर मोठ्या प्रमाणात कुजलेले असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आली.