आपण आयुष्यात एखादी गोष्ट समाधानाने करत जाणं आवश्यक आहे. कारण, शेवट आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा मिळवायची आहे. एखादी गोष्ट उत्कृष्टतेकडे घेऊन जाण्यासाठी ध्यास लागतो, पण त्या ध्यासात सर्जनशीलता असावी, विधायकता असावी, ती आपल्याला आपसूक पूर्णत्वाकडे घेऊन जाते. कारण, त्या ध्यासात अंतर्गत ऊर्मी असते. आपण आतून झपाटलेले असतो. जगाने आपली क्षमता जोखावी इतके परावलंबी आपण का असावं? आपली क्षमता शेवटी आपली आहे.
‘परिपूर्णता’ या संकल्पनेविषयी बोलताना आपण जर असं गृहित धरलं की, परिपूर्ण व्यक्ती ही सामान्यत: व्यवस्थित असते, संघटित असते, त्यांना प्रत्येक गोष्ट आजच करायची असते, तरीसुद्धा सगळेच, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेले याच द़ृष्टिकोनाच्या वा आकलनाच्या धाग्यादोर्यात घडलेले असतात, असे म्हणता येणार नाही. मानसशास्त्रात परिपूर्ण लोक किंवा काटेकोरपणात अडकलेले लोक नकारात्मक, हवालदिल, दु:खी आणि अतिनियंत्रित करणारे असले, तरी सगळेच तसे नसतात. या लोकांच्या बाबतीत नाण्याच्या दोन बाजू आहेत. यामध्ये बरेच लोक त्यांच्या काटेकोर सवयीचेच गुलाम झाले आहेत आणि काही लोकं ही सवय असली तरी त्यांचा सर्वसामान्य दृष्टिकोन मुक्त आहे. थोडक्यात, काटेकोरपणाची सकारात्मक वा नकारात्मक अभिमुखता ही ते ज्या पद्धतीने प्रवाहित केली जाईल, त्यावर अवलंबून राहील. जसजशी व्यक्तीची जाणीव उंचावत जाईल किंवा त्यांच्यातील विधायकता वाढत जाईल, तसतशी त्याची काटेकोरपणाची प्रकृती त्या व्यक्तीला स्वत:ला परिपूर्णतेच्या विधायक शिखरावर घेऊन जाण्यास उपयुक्त ठरेल. शिवाय अशा व्यक्तीच्या हातून मानवी हितसंबंधांच्या उत्तम गोष्टीही घडत जातील.
आपण जर थोडासा विचार केला की, मानवी आयुष्यातून जर परिपूर्णता वा निखालस प्रवृत्ती आपण काढूनच टाकली तर काय होईल? याचा जगावर काय परिणाम होईल? विशेषत: परिपूर्णतेचा ध्यास नसेल, तर आधुनिक शास्त्राची प्रगती होईल की नाही? प्रश्न गहन आहे. पण, एखाद्या व्यक्तीने परिपूर्णतेच्या वेडातूनसुद्धा सकारात्मक दिशेने प्रवास करायचे ठरविले, तर परिपूर्णता जगाला सर्व दृष्टीने विकसित होण्यास मदतच करेल. परिपूर्णतेची परिमाणे ही उच्च दर्जाची असतात. आपल्या कामात पछाडून जाणे ही एक महत्त्वाची बाजू आपण या व्यक्तींमध्ये पाहतो. पण, काटेकोरपणाचा उत्कृष्ट दर्जा देण्याची प्रक्रिया केवळ व्यावसायिक व्यवहारापूर्ती मर्यादित न राहता, ती आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात झिरपलेली दिसते. मग ते घरात असो, कामात असो, दिसण्यात असो, आरोग्यात असो वा नैतिकतेत असो, अशा प्रकारचे उच्च आदर्श वा दर्जा अपेक्षित असणे यात तसे गैर काहीच नाही. आपण यशस्वी व्हायलाच हवं, ही ऊर्जा स्वयंप्रेरित गती आणण्यासाठी आवश्यक आहेच. पण, परिपूर्णतेच्या झपाटलेपणात चुका करण्यासाठी मानवी मर्यादेला परवानगी मिळत नाही. येथेच सगळ्यात मोठा घोळ आहे. शिवाय आपण कितीही कष्ट करून एखादी गोष्ट जरी प्राप्त केली, तरी अजूनही काही तसे अप्राप्य समोर असणार! कितीही मिळविले तरी अजून काहीतरी मिळवण्यासारखे राहणारच.
कारण, शेवटी ‘ये दिल मांगे मोअर...’ आयुष्याचं एक साधं सरळ सत्य आहे. ते म्हणजे जीवन आणि माणसं परिपूर्ण असत नाहीत. आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ताब्यात ठेवू शकणार नाहीत. जर आपण तसा प्रयत्न केला, तर आपण स्वतःला अपयशाच्या मार्गाने नेणयाचा कदाचित प्रयत्न करू. परिपूर्णतेचे दरवाजे ठोठावणारी माणसे मनात कुठेतरी रित्या घागरी बाळगून असतात. कारण, त्यांची यशाची परिभाषा बाह्य घटकावर अवलंबून असते. ते घटक आपल्या हातात नसतात. आपण माणसं आहोत. आपल्याकडून उत्कृष्ट घडावं, ही आपली नैसर्गिक इच्छा आहे. म्हणून स्वत:ला विकसित करत जाणं ही जरी प्रबळ आणि सकारात्मक बाब असली, तरी ती आपल्या हितापलीकडे महान नाही. कारण, आपण सतत आपली तुलना बाह्य परिस्थितीशी करत राहणार. त्यानुसार आपण आपल्या यशाची भाषा बदलणार. त्यानुसार आपल्या स्वत:च्या दबावात आणून बदलायचा प्रयत्न करणार. निराश होणार. नैतिकदृष्ट्या खच्ची होणार. अशा तर्हेने आपण आपली वास्तविक क्षमता आणि समाजाची मान्यता या द्वंद्वात गुंतणार. हे असं फार काळ आयुष्यात चालत राहिलं, तर आपली ऊर्जासुद्धा कमी पडत जाणार. आपली स्वयंप्रेरणा तोकडी पडणार. शेवटी हे दुष्टचक्र आहे.
यासाठी आपण आयुष्यात एखादी गोष्ट समाधानाने करत जाणं आवश्यक आहे. कारण, शेवट आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा मिळवायची आहे. एखादी गोष्ट उत्कृष्टतेकडे घेऊन जाण्यासाठी ध्यास लागतो, पण त्या ध्यासात सर्जनशीलता असावी, विधायकता असावी, ती आपल्याला आपसूक पूर्णत्वाकडे घेऊन जाते. कारण, त्या ध्यासात अंतर्गत ऊर्मी असते. आपण आतून झपाटलेले असतो. जगाने आपली क्षमता जोखावी इतके परावलंबी आपण का असावं? आपली क्षमता शेवटी आपली आहे. आपणच तिची उंची वाढवायला हवी. आपण वाहत न जाता स्वत:चा विकास स्वत: करण्यातच शहाणपण आहे.
- डॉ. शुभांगी पारकर