नवी मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन दुप्पट, तिप्पट दरात बाजारात विक्री केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काळाबाजार करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई देखील सुरु आहे. अशाच एका कारवाईत पोलिसांनी खारघरमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडले आहे.
दोन रेमडेसीवीर इंजेक्शन घेवून आलेल्या हरपिंदर सिंग (वय ४१, रा. कळंबोली) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जवळपास ५ लाख १८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी खारघरमधील लिट्ल वर्ल्ड मॉल समोरील रस्त्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास ताब्यात घेतले. हरपिंदरला न्यायालयाने २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हरपिंदर सिंगच्या अटकेमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यताही आहे.
काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यांच्या समवेत आजून कोण कोण या रेमडेसीवर चा काळाबाजार करण्यात सहभागी आहे तसेच रेमडेसीवर कोठून आणले याबाबत गुन्हे शाखा कसून तपास करीत आहे. महाआघाडीतील बड्या नेत्यांसोबत त्याचे फोटो सोशल मिडीयावर आहेत, त्यामुळे बारामतीप्रमाणे पनवेल परिसरातील या प्रकाराने चर्चेला उधाण आणले आहे.