विरारमधील रुग्णालयात अग्नितांडव ; 'त्या' अर्धा तासात काय घडले ?

    23-Apr-2021
Total Views |

vallabh_1  H x





विरार :
राज्यात एकीकडे कोविड रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे रुग्णालयातील दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येतंय. विरारमधील विजय वल्लभ कोविड केअर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र केवळ चौकशी करून काय साध्य होणार जर कारवाईच होत नसेल ? असा सवाल आता उपस्थित होतोय.


विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री ३ ते ३.३०च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे २४ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण १४  रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
इतकी गंभीर घटना घडूनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना संवेदनशील वक्तव्य केले. 'राज्य स्तरावर या घटनेची चौकशी केली जाईल ही घटना काही राष्ट्रीय बातमी नाही', असे विधान राजेश टोपे यांनी केले. रुग्णालयातील एसीचा स्फोट झाला. त्यावेळी आयसीयूत १७ रुग्ण होते. त्यातील १४  जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली. एकूण ९० रुग्ण होते. फायर ऑडिट वैगरे हा मुद्दा पुढचा आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का ? हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणं किंवा मदत करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आतमधील परिस्थिती वाईट आहे. एका स्फोटात १३ जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ दुसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला आहे, अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.