समाजभूषण उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2021   
Total Views |

Bhushan Akolkar_1 &n
 
 
हस्ताक्षर विश्लेषण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे, त्याविषयी त्यांना अवगत करणे, या शास्त्राच्या साहाय्याने लोकांची समस्या सोडविणे हा भूषणचा मानस आहे. ‘भूषण अकोलकर ग्रॅफोलॉजी सर्व्हिसेस’ सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद आणू पाहत आहे, हे महत्त्वाचं आहे. सध्या टाळेबंदीच्या काळात मानसिकदृष्ट्या ढासळू पाहत असलेल्या समाजासाठी अशा संस्था आशेचा दिवा आहे.
 
 
 
आरोग्य क्षेत्रातील एका संशोधन कंपनीचा धनादेश घ्यायला भूषण गेला होता. एका महिला अधिकार्‍याने त्याला बोलावून धनादेश त्याच्या हाती सुपूर्द केला. आपण सगळेच पाहतो त्याप्रमाणे त्यानेदेखील धनादेशावरील स्वाक्षरी पाहिली. ती स्वाक्षरी पाहताच त्याने त्या महिला अधिकार्‍यास विचारले की, “या स्वाक्षरी केलेल्या महिलेस आपण व्यक्तिश: ओळखता का?” "माझीच स्वाक्षरी आहे ती,” असे त्या महिलेने म्हणताच भूषण चपापला. “तुम्हाला कर्करोग आहे का?” भूषणच्या या प्रश्नाने ती महिला अधिकारी स्तब्धच झाली. काहीच ओळखपाळख नसणार्‍या भूषणला हे कसं ठाऊक, हा प्रश्न तिला पडला, जो तिने त्याला विचारलादेखील. भूषण ते जाणू शकला. कारण, तो ’हस्ताक्षर विश्लेषण’ शिकला होता. या शास्त्राच्या अनुभवातूनच त्याने स्वत:ची कंपनी सुरू केली. ’भूषण अकोलकर ग्रॅफोलॉजी सर्व्हिसेस’ असे त्या कंपनीचे नाव.
 
 
 
सुरुवातीलाच हा किस्सा ऐकल्यानंतर कोणालाही या शास्त्राविषयी जाणून घ्यायला आवडेलच. अंदाजे १८९७च्या आसपास अ‍ॅब जीन हिप्पोलाइट मिशान याने पॅरिसमध्ये ‘ग्रॅफोलॉजी’ हा शब्द रुढ केला. मात्र, त्याच्याही आधी १६२२ मध्ये हस्ताक्षर विश्लेषण करण्याचे शास्त्र विकसित केले होते ते कॅमिलो बाल्दी याने. हस्ताक्षरामुळे माणसाचा स्वभाव, मानसिकता, त्याचे सामाजिक स्थान इत्यादी कळू शकते, हे नंतर निरनिराळ्या संशोधकांनी सिद्ध केले. हेच नेमकं भूषणला आवडलं. तो ‘ग्रॅफोलॉजी’ शिकला आणि त्याने स्वत:ची या क्षेत्रात सेवा देणारी संस्था सुरू केली. मात्र, भूषणचा मूळ व्यवसाय वेगळाच होता.
 
 
शशिकांत अकोलकर आणि कल्पना अकोलकर यांना एक मुलगा व एक मुलगी. शशिकांत अकोलकर ज्योतिषाचा व्यवसाय करत, तर कल्पना अकोलकर ‘महानगर टेलिफोन निगम’मध्ये व्यवस्थापकपदावर कार्यरत होत्या. भूषण त्यांचा मोठा मुलगा. त्याचं लहानपण बोरिवलीमध्ये गेलं. बारावीपर्यंत तो बोरिवलीच्याच गोखले हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकला. त्यानंतर ‘मायक्रोबायोलॉजी’ हा विषय घेऊन तो गिरगाव चौपाटीच्या विल्सन महाविद्यालयातून बीएस्सी झाला. भूषणचं संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. ज्यावेळेस तो विल्सनमध्ये जाऊ लागला त्यावेळेस तिथलं इंग्रजी वातावरण पाहून त्याला काहीसं दडपण आलं होतं. मात्र, त्याने मेहनत घेऊन इंग्रजीच्या दडपणावर मात केली. आज भूषण व्याकरणासहीत अस्खलित इंग्रजी भाषेतून संवाद साधतो. त्याचा लाभ त्यास पुढील आयुष्यात झाला.
 
 
बीएस्सीची परीक्षा दिल्यानंतर तो लगेच एका ‘कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’मध्ये नोकरीला लागला. जवळपास सव्वा वर्षे त्याने तिथे नोकरी केली. मात्र, शिकवण्यात जास्त कमाई नाही हे त्याला लवकरच उमजलं. जास्त पैसा हा विक्रीकलेत आहे, हे कळल्यानंतर त्याने आपला कल विक्रीकलेकडे वळवला. त्यावेळी नुकतंच ‘क्रेडिट कार्ड्स’चं पेव फुटलं होतं. शेअर बाजारात नोंदणीकृत असणार्‍या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना तर निव्वळ त्यांच्या ‘व्हिजिटींग कार्ड’वर हे ‘क्रेडिट कार्ड’ मिळायचं. त्यामुळे भूषण निरनिराळ्या कंपन्यांच्या बाहेर दुपारी हे ‘क्रेडिट कार्ड्स’ विकण्यासाठी उभा असे. दुपारचं जेवण झाल्यावर ‘कॉर्पोरेट्स’ कंपन्यांमध्ये काम करणारे हे कर्मचारी, अधिकारी पाय मोकळे करायला ऑफिसच्या बाहेर येत असत. त्यांना हेरुन ‘भूषण क्रेडिट कार्ड्स’चे लाभ त्यांना सांगत असे.
 
 
भूषणचे ते विक्रीकौशल्य पाहून एकाने त्याला ‘येल्लो पेजेस’ या कंपनीत विक्री अधिकारी पदासाठी बोलावले. तिथे जाहिरात आणण्याचं काम तो करू लागला. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर एका मोठ्या प्रकाशन संस्थेत त्याला नोकरीचा प्रस्ताव आला. तिथेसुद्धा जाहिराती आणण्याचीच कामे होती. मोठमोठ्या कॉर्पोरेट्स कंपन्या, बँका, वित्तीय संस्था यांच्यासोबत चांगला संपर्क निर्माण झाला होता. इथेसुद्धा तीन वर्षे त्याने नोकरी केली. त्यानंतर त्याने कोलकात्यातील एका वृत्तसमूहातील नोकरी स्वीकारली. काम तेच होतं, मात्र या आधीच्या नोकरीपेक्षा इथे जास्त पगार होता आणि कमिशनदेखील मिळत होतं. दोन वर्षे त्याने तिथे नोकरी केली.
 
 
भूषणला नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची ओढ असे. कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने वृत्तपत्रात फोटोग्राफी शिकण्याची जाहिरात पाहिली. निव्वळ ७०० रुपयांमध्ये १९९९ साली तो काळाचौकीला संतोष जैतापकरांकडे फोटोग्राफी शिकला. मात्र, २०११ साली त्याने स्वत:च्या कमाईतून कॅमेरा विकत घेतला आणि व्यावसायिक फोटोग्राफी करू लागला. ‘थर्ड आय क्रिएशन’ नावाची कंपनी त्याने स्थापन केली. लग्न समारंभ, वाढदिवस, मुंज, साखरपुडा असे घरगुती समारंभ असो वा कोणताही ‘कॉर्पोरेट’ कार्यक्रम भूषण अकोलकरांच्या फोटोग्राफीला दाद मिळत असे. ‘सायटेल’, ‘अरविंद डेनिम’ सारख्या अनेक ‘कॉर्पोरेट’ कंपन्या व घरगुती समारंभ असे जवळपास ६००च्यावर प्रकल्प त्यांनी आतापर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
 
 
पावसाळ्यामध्ये कार्यक्रम-समारंभ होत नसतात. त्यावेळेस फोटोग्राफर्सना एकप्रकारे विश्रांतीच असते. मात्र, भूषण निव्वळ बसून राहणार्‍यांपैकी नव्हता. काहीतरी नवीन शिकायची ऊर्मी त्याला शांत बसू देत नव्हती. त्याला असं काहीतरी शिकायचं होतं जे अनोखं असेल, जे ऐकण्यास कोणीही उत्सुक असेल आणि जगात खूप कमी लोक त्याविषयी जाणून असतील. असं त्याला शास्त्र सापडलं ते होतं ‘हस्ताक्षर विश्लेषण.’ एका मान्यताप्राप्त संस्थेतून त्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, त्यानंतर तब्बल तीन वर्षे अविरत त्याचा भूषणने सराव केला. अनेकजणांचे तो हस्ताक्षर तपासू लागला. अशाप्रकारे १२००च्यावर सशुल्क हस्ताक्षर तपासण्या त्याने केल्या. ६००च्या वर सह्यांचे सशुल्क विश्लेषण केलेले आहे. यातूनच त्याने ’भूषण अकोलकर ग्रॅफोलॉजी सर्व्हिसेस’ ही संस्था सुरू केली.
 
 
सन २०२० हे वर्ष जगातील प्रत्येकासाठी संस्मरणीय आहे. ‘कोविड-१९’ मुळे अवघ्या जगाला टाळेबंदीस सामोरे जावे लागले. कोट्यवधी लोकांना घरीच बसावे लागले. या टाळेबंदीत काय करायचं, हा अनेकांसमोर प्रश्न असताना भूषण अकोलकरने आपलं हस्ताक्षर विश्लेषणाचे ज्ञान इतरांना शिकवण्याचे ठरवले. त्याप्रमाणे गेले वर्षभर तो हस्ताक्षरशास्त्राचे ‘ऑनलाईन’ धडे देत आहेत. आतापर्यंत असंख्य जणांना त्याने हे शास्त्र शिकवले आहे. ‘भूषण अकोलकर ग्रॅफोलॉजी सर्व्हिसेस’ या संस्थेच्या माध्यमातून तो सल्लासमुपदेशन, प्रशिक्षण, सह्यांचे विश्लेषण अशा सेवा देतो. हस्ताक्षर विश्लेषणाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:चा व्यवसायदेखील करता येतो. आदर्श स्वाक्षरी कशी करावी, नातेसंबंध कसे सुधारावेत, आत्मविश्वास कसा वाढवावा, एकाग्रता कशी वाढवावी, याचे मार्गदर्शन करुन लोकांना अतिरिक्त पैसा कमावण्याची संधी मिळू शकते तेसुद्धा २४ ते २७ तासांत, असा दावा अकोलकर करतात.
 
 
“कोणत्याही व्यक्तीचे हस्ताक्षर हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. हस्ताक्षरातून त्या व्यक्तीची मानसिकता, त्याचा स्वभाव जाणून घेण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल तर तोदेखील त्याच्या हस्ताक्षरातून प्रतिबिंबीत होतो. एखाद्या नोकरीसाठी कोणता उमेदवार योग्य आहे, हे जाणून घेण्यासाठी अलीकडे अनेक कंपन्या हस्ताक्षरतज्ज्ञांची मदत घेतात. तसेच भावी वैवाहिक जोडीदार निवडण्यासाठीसुद्धा हे शास्त्र उपयुक्त ठरत आहे,” असे भूषण अकोलकर म्हणतो. हस्ताक्षर विश्लेषण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे, त्याविषयी त्यांना अवगत करणे, या शास्त्राच्या साहाय्याने लोकांची समस्या सोडविणे हा भूषणचा मानस आहे. ‘भूषण अकोलकर ग्रॅफोलॉजी सर्व्हिसेस’ सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद आणू पाहत आहे, हे महत्त्वाचं आहे. सध्या टाळेबंदीच्या काळात मानसिकदृष्ट्या ढासळू पाहत असलेल्या समाजासाठी अशा संस्था आशेचा दिवा आहे. किंबहुना अशा संस्था समाजास ‘भूषणा’वह आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@