विक्रोळी : विक्रोळीत नुरानी मशिदीच्या रस्त्यावर आदरणीय संत श्रीमान यति नरसिंहानंद सरस्वती यांचे फोटो चिकटवण्यात आले आहेत. पार्कसाईट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे फोटो अवमानकारकरित्या चिकटवून हिंदु संताचा अवमान करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे हिंदु समाजाच्या भावनाही दुखावल्या गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच बजरंग दलाचे संयोजक पंकज लाड आणि सहमंत्री सत्येन्द्र सिंह यांनी विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबद्दल 'दैनिक मुंबई तरुण भारत'शी बोलताना विहींपचे कोंकण प्रांत सहमंत्री मोहन सालेकर यांनी या घटनेचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला. पोलीस आयुक्तांनी यात तातडीने लक्ष घालून अशा प्रवृत्तीची नांगी वेळीच ठेचावी अन्यथा बजरंग दलाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
'यापूर्वी फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रान यांचे फोटो मुस्लिम बहुल वस्त्यांमधील रस्त्यावर चिकटवून त्यांचा अपमान करण्याची घटनाही ताजी आहे,त्यावेळी पोलीसांनी कठोर भूमिका न घेतल्यामुळे आज अशा धर्मांध शक्ती मुजोर होत आहेत. तरी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विहींपने केली आहे.' अशी माहिती विक्रोळी विहींपचे सहमंत्री संतोष यादव यांनी दिली.