बांगलादेशच्या विकासवाटा, पाकिस्तानच्या विनाशवाटा....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

PAK BAN_1  H x
 
 
पश्चिम पाकिस्तानच्या जाचाला कंटाळून अखेरीस १९७१ साली पूर्व पाकिस्तानचे रुपांतर स्वतंत्र ‘बांगलादेश’ या राष्ट्रात झाले. बांगलादेश स्थापनेला नुकतीच ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या दोन्ही देशांचा घेतलेला हा तुलनात्मक आढावा...
 
 
 
एका छद्म मुस्लीम राष्ट्रवादाच्या लाटेने (छद्म शब्द वापरण्याचे कारण म्हणजे, इस्लाममध्ये ‘राष्ट्र’ संकल्पनेचा अभाव असून तो जगभरात एका खलिफाच्या अधीनस्थ उम्मा वा मिल्लतची भूमिका मांडतो.) एका पृथक मुस्लीम मायभूमीच्या मागणीला प्रोत्साहन दिले आणि १९४७ साली ती प्राप्तही केली. पाकिस्ताननिर्मितीचा प्रारंभबिंदू १९१९-२०ची खिलाफत चळवळ, १९०६ मधील ‘मुस्लीम लीग’ची स्थापना, १८७५ साली अलिगढमध्ये इंग्रजी पद्धतीच्या इस्लामी विद्यालयाची स्थापना आणि १८५७च्या क्रांतीनंतरही आभासी रूपाने अस्तित्वात असलेल्या मुघल राजवंशाच्या उन्मुलनातही पाहायला मिळतो. परंतु, इस्लामच्या नावावर नव्या राष्ट्रासाठी ज्या जोरदारपणे इस्लामी उन्माद वाढवला आणि पाकिस्तानच्या स्थापनेसह त्याला एका पवित्र लक्ष्यप्राप्तीच्या रूपात सादर केले गेले, ते जास्त दिवस चालले नाही आणि डिसेंबर १९७१मध्ये भाषिक व जातीय ओळखीने इस्लामच्या नावावर बळजोरीने एकता स्थापन करण्याच्या प्रयत्नांना बाजूला सारले व पूर्व पाकिस्तानच्या जागी एक नवे राष्ट्र-बांगलादेशचा अभ्युदय झाला.
 
 
पाकिस्तान शोषण आणि उत्पीडनाची एक संघटित व्यवस्था आहे. आज ज्या प्रकारे पंजाब पाकिस्तानच्या उर्वरित क्षेत्राच्या जीवावर आपला विकास करतो, त्याच प्रकारे १९७१च्या आधी त्यात पूर्व पाकिस्तान सामील होता. कारण, इथल्या साधनसंपत्तीचा वापर पश्चिम पाकिस्तान आणि त्यातही विशेषत्वाने पंजाबच्या हितांसाठी केला जात होता. तथापि, पाकिस्तानने सातत्याने ते नाकारले. परंतु, आज बांगलादेश अस्तित्वात येऊन ४९ वर्षे झाली आहेत आणि त्याची आर्थिक व सामाजिक विकासाशी संबंधित आकडेवारी एक सर्वसमावेशक सरकार विकासाला नजरेत ठेवून कशी वाटचाल करते आणि एका धार्मिक कट्टरपंथ व दहशतवादालाच राष्ट्रधोरणांतर्गत पोसणार्‍या देशात ते कधीही शक्य होत नाही, हे दाखवते. तथापि, जनरल झिया उर रहमान, जनरल हुसैन मुहम्मद इरशाद आणि नंतर खालिदा झिया यांच्या कार्यकाळात कट्टरपंथाला ज्या प्रकारे प्रोत्साहन मिळाले, त्याने बांगलादेशाच्या विकासाच्या मार्गात अडचणी नक्कीच उभ्या केल्या.
 
 
उल्लेखनीय म्हणजे, १९७१ सालच्या ‘लिबरेशन वॉर’मुळे स्वतंत्र झालेल्या बांगलादेशाने आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची प्रगती केली आहे. दारिद्य्र निर्मूलन, सार्वजनिक आरोग्यसेवा आणि शिक्षणाची सार्वजनिक उपलब्धता यात त्या देशाची प्रगती पाहता येते. सोबतच अन्य महत्त्वपूर्ण सामाजिक निकषांतील कामगिरीही दिसून येते. पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवल्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांत बांगलादेशची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित होती. परंतु, लोकशाही व्यवस्थेचे सुदृढीकरण आणि लोकशाही संस्थांप्रति नोकरशाहीच्या वाढत्या उत्तरदायित्वामुळे व्यापक आर्थिक सुधारणांना बळ मिळाले आणि बांगलादेशने आर्थिक क्षेत्रापासून सामाजिक विकासापर्यंतच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली.
 
 
१९४७ पासून पाकिस्तान सातत्याने अन्य देशांच्या मेहरबानीवरच राहिला. सुरुवातीला आपल्या माजी वसाहतवादी शासक इंग्लंडच्या आणि नंतर शीतयुद्धकालीन गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या काही निकटवर्ती हितांच्या तुष्टीकरणासाठी तो अमेरिकेच्या गटात सामील झाला आणि आज तो चीनबरोबरील आपल्या घनिष्ठ मैत्रीचा ढिंढोरा पिटत फिरतो, जे या सर्वच काळात त्याच्या भीक मागणार्‍या अवस्थेला दर्शवते. तर बांगलादेश आपल्या स्थापनेच्या वेळी म्हणजे १९७१-७२ साली ८८ टक्के परकीय साहाय्यतेवर अवलंबून होता, हे प्रमाण सातत्याने कमी होत गेले आणि २०१० साली ते केवळ दोन टक्क्यांवर आले. २०१९ साली ‘जागतिक नाणेनिधी’ने २०२१ साली बांगलादेशची अर्थव्यवस्था ३२२ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याचे क्रयशक्ती समानतेच्या आधारावर प्रतिव्यक्ती सकल राष्ट्रीय उत्पन्न चार हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे. याचा अर्थ आजचा बांगलादेशी नागरिक सरासरी पाकिस्तानी नागरिकाच्या तुलनेत कितीतरी समृद्ध आहे. तथापि, पाकिस्तानच्या सातत्याने घसरत्या रुपयाचा वेग थांबला नाही, तर पाकिस्तानी नागरिकांची परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.
 
 
आज बांगलादेश निर्यातीचे मोठे केंद्र झाले आहे. त्याच्या आर्थिक वृद्धीचा बहुतांश भाग निर्यातीतूनच येतो, जो १९७१ साली शून्य होता आणि २०१८ साली ३५.८ अब्ज डॉलर्सच्या स्तरावर पोहोचला. याच समान कालावधीत पाकिस्तानची निर्यात केवळ २४.८ अब्ज डॉलर्सच राहिली. सोबतच बांगलादेशाने आपल्या नागरिकांसाठी आमूलाग्र व्यवस्थात्मक परिवर्तन केले आहे. १९५१च्या जनगणनेत पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या ४२ दशलक्ष होती, तर पश्चिम पाकिस्तानची लोकसंख्या ३३.७ दशलक्ष होती. परंतु, बांगलादेशाने लोकसंख्यावाढीवर प्रभावी नियंत्रण आणले आहे. आज बांगलादेशची लोकसंख्या १६५ दशलक्ष आहे, तर पाकिस्तानने २०० दशलक्षाचा टप्पा पार केला आहे. एका सातत्यपूर्ण लोकसंख्या नियंत्रण अभियानाने बांगलादेशात प्रजनन क्षमतेला कमी करण्यात मदत केली, तर कट्टरपंथाने प्रभावित पाकिस्तानमध्ये त्याचा पूर्ण अभाव आहे. उत्तम जीवन आणि आरोग्य सुविधांनी बांगलादेशातील सरासरी आयुर्मयादेत वृद्धी केली आहे. आज बांगलादेशीयांची सरासरी आयुर्मयादा ७२.५ वर्षं आहे, तर पाकिस्तानमध्ये ती केवळ ६६.५ वर्षं आहे. जागतिक कामगार संघटनेच्या मते बांगलादेशात महिलांचा रोजगारातील सहभाग ३३.२ टक्के आहे, तर पाकिस्तानच्या कट्टर रूढीवादी समाजात ते प्रमाण केवळ २५.१ टक्के आहे.
 
 
१९७१ साली बांगलादेशाच्या जन्मानंतर त्याच्याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव हेन्री किसिंजर यांनी तर बांगलादेशाची उपेक्षा करत त्याला ‘आधारहीन टोपली’सारखे अभद्र विशेषण दिले होते. परंतु, बांगलादेश हळूहळू पाकिस्तानच्या तुलनेत आपला वेग वाढवत गेला. २००६ मध्ये त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर पाकिस्तानच्या पुढे गेला आणि तेव्हापासून तो सातत्याने पाकिस्तानच्या पुढेच आहे. आश्चर्य म्हणजे, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांत बांगलादेशचा समावेश होतो. सोबतच डिसेंबर २०२० मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाद्वारे जारी केल्या जाणार्‍या मानव विकास सूचकांकात पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या विकासात मोठी दरी दिसून आली. त्यात बांगलादेश १३३व्या स्थानावर तर पाकिस्तान १५४व्या क्रमांकावर आहे. परंतु, कदाचित पाकिस्तानसाठी मानव विकास पहिले प्राधान्य नव्हतेच. स्थापनेनंतर पाकिस्तानने आपल्या वेळ आणि ऊर्जेचा वापर भारताविरोधात षड्यंत्र करण्यातच लावला. सोबतच त्याचे अन्य शेजारी देश जसे की, अफगाणिस्तान आणि इराणशी संबंध नेहमीच तणावाचे राहिले. त्याच वेळी बांगलादेश आर्थिक विकासाच्या आपल्या मार्गाने पुढे चालत राहिला आणि त्याने कासव व सशाच्या कथेला पुनरुज्जीवित केले.
 
 
(अनुवाद : महेश पुराणिक)
 
 
@@AUTHORINFO_V1@@