शिंगणेंचा घरचा आहेर! 'ते' रेमेडिसिवीर राज्य सरकारलाच मिळणार होते

    20-Apr-2021
Total Views |

dr shingane_1  



मुंबई :
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र याचकाळात रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी व पुरवठ्यातील कमतरता या प्रकरणावरुन राज्यात दोन दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यावर भाष्य केले आहे. भाजपने मध्यस्थी केलेली कंपनी रेमेडीसीवरचा साठा हा राज्य सरकारलाच देणार होती, अशी माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यामुळे आता भाजपने केलेल्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे.



दरम्यान, राज्यात ब्रूक फार्मा कंपनीने रेमडेसिवीर औषधांचा साठा केला यावरून मुंबई पोलिसांनी या कंपनीच्या प्रतिनिधीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यानंतर यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर विलेपार्ले पोलीस स्थानकात पोहोचले होते. त्यांनी स्पष्टही केले की हा साठा राज्य सरकारलाच देण्यात येणार याबाबत कंपनी आणि राज्य सरकारमध्ये बोलणं झालंय तरीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आरोपांच्या फेऱ्या सुरूच होत्या. अखेर आज अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीच याबाबत माध्यमांशी बोलताना कबुली दिलीय.



सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची मागणी महाविकास आघाडीतून होत होती. त्यानंतर राज्य विरुद्ध केंद्र सरकार असं वातावरण महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून निर्माण झाले होते.देशभरातील १६ निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पडून आहेत. पण ही इंजेक्शन्स महाराष्ट्राला विकू नयेत, अन्यथा तुमचे परवाने रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारकडून कंपन्यांना देण्यात आली आहे, असा आरोपही राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याचदवशी म्हणजे शनिवारी १७ एप्रिल रोजी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले. त्यानंतर ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ब्रूक फार्मा कंपनीकडे साठा पडून होता. भाजपच्या नेत्यांनी कायदेशीरपणे या इंजेक्शन्सची निर्यात महाराष्ट्रात व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.