सामाजिक ऋण जपणारा समाजसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2021   
Total Views |

Kailas Bhor_1  
 
 
स्वयंप्रेरणेने सामाजिक गरज ओळखून समाजसेवा करणार्‍या कैलास भोर यांच्या कार्याविषयी...
 
 
 
सामाजिक जीवनात समाजातील मुख्य प्रवाहात नसलेल्या घटकांसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अनेक समाजसेवक करताना दिसून येतात. वनवासी बांधव, अनाथ मुले, निराधार नागरिक, किन्नर, सेवावस्तीतील नागरिक अशा अनेक नागरिकांसाठी समाजसेवेची उदाहरणे आपण पाहत असतो. सामाजिकदृष्ट्या ही सेवा नक्कीच महत्त्वाची आहे. मात्र, काही समाजसेवक समाजातील सर्वच नागरिकांना नेमके काय हवे आहे, हे लक्षात घेऊन आपल्या सेवेचे स्वरूप ठरवत असतात. नाशिक जवळील भगूर येथील कैलास भोर हे त्यापैकीच एक.
 
 
इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण झालेले, पूर्वी व्यवसायाने रिक्षाचालक असणारे आणि सध्या खानावळीचा व्यवसाय करत अनेकांची क्षुधातृप्ती करणारे भोर हे सध्या त्यांच्या वेगळ्याच सामाजिक कार्याने जिल्ह्यात चर्चेत आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अशावेळी अन्नदान, रक्तदान, आरोग्य साधन सामग्रीचे वाटप आदी सामाजिक सेवा करण्यात अनेक समाजसेवक अग्रेसर आहेत. त्यांचेही कार्य मोलाचे आहेच. मात्र, भोर यांनी यापलीकडे जात औषध फवारणीचे कार्य हाती घेतले. भगूरमधील गल्लीबोळात पाठीला फवारणी यंत्र लावून स्वखर्चाने भोर औषध फवारणी करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वतःहून भोर यांनी हा पुढाकार घेतला असून, रोज ते भगूरच्या विविध भागांत भरउन्हात पायी चालत औषध फवारणी करत आहेत.
 
 
हे काम करत असताना त्यांना ते उत्तम काम करत असल्याबद्दल काही नागरिकांचे अभिनंदन आणि कौतुकदेखील प्राप्त होते, तर काही नागरिक ‘इथे नीट औषध मारा, इकडे मारा’ असे सल्लेदेखील देतात. कौतुक आणि कटू अनुभव याकडे दुर्लक्ष करून भोर हे आपले काम नियमित करत आहेत. मनात एकच भाव आहे की कोणीतरी काहीतरी पाऊल उचलणे आता आवश्यक आहे. त्यांच्या या कार्याबाबत कोणताही उच्चार स्थानिक प्रशासनाच्या वतीने अजून झालेला नाही, हे विशेष. याशिवाय भोर यांच्या ‘१२ बलुतेदार, १८ पगड समाज संस्था’ या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीदेखील अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भगूर व परिसरातील गरीब व भीक मागणार्‍या नागरिकांची क्षुधातृप्ती व्हावी, यासाठी एक फ्रीज ठेवला आहे. या फ्रीजमध्ये पुरीभाजी व जेवण बनवून ठेवले जाते. परिसरातील गरजू येतात व स्वतःच्या हाताने फ्रीज उघडून जे हवे ते जितके हवे ते घेऊन जातात.
 
 
भगूर परिसरात नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या नागरिकांना विधी व हातपाय धुण्याकामी पाण्याच्या समस्येचा मोठा सामना करावा लागत होता. नागरिकांना यासाठी नदीत जावे लागत असे. ही अडचण ओळखून भोर यांनी स्मशानभूमीत बोअरवेल घेतले व त्यावर हातपंप बसविला. यामुळे नागरिकांची आता मोठी सोय झाली आहे. भोर यांना याकामी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली, हे वेगळे सांगणे नकोच. भटक्या पशुधनाची तहान भागविण्याकामी भोर यांनी भगूरच्या मुख्य चौकात स्वखर्चाने व संस्थेतील सदस्यांच्या मदतीने कुंड्या बसविल्या आहेत. सामाजिक कार्याच्या या विलक्षण कल्पना तुम्हाला कशा सुचतात, असे भोर यांना विचारले असतात ते सांगतात की, “समाजाला नेमके काय हवे आहे हे आपण जाणले, तर रिक्त जागा भरणे सहज शक्य होते.”
 
 
समाजसेवेचे हे व्रत आपणास का स्वीकारावे वाटले, असे विचारले असता, भोर यांच्या मुखातून अगदी सहज नाव उच्चारले गेले ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. भोर यांचे शालेय शिक्षण भगूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात झाले. या शाळेतील अनेक शिक्षक हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे संघसंस्कार माझ्या मनावर आपसूक रुजले. त्यामुळे संघाचे समाजकार्य, संघाची राष्ट्रनिष्ठ शिकवण यांचे बाळकडू मला शाळेपासूनच मिळाले असल्याचे भोर आवर्जून नमूद करतात. आगामी काळात ५०० वृक्षांचे रोपण करण्याचा भोर यांचा मानस आहे. मात्र, काम करताना प्रशासकीय स्तरावरून होणार्‍या दफ्तर दिरंगाईचा मोठा अडसर असल्याचे भोर सांगतात. भोर यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शाबासकीची थाप म्हणून अजून एकही पुरस्कार मिळालेला नाही. मात्र, त्याची खंतदेखील त्यांना नाही. जेमतेम शिक्षण असलेले भोर हे त्यांच्या सामाजिक जाणिवांनी खर्‍या अर्थाने सुशिक्षित ठरतात. समाजातील अडचणींचे नेमकेपण हेरले तर सामाजिक समस्या या सर्वांना मिळून सहज दूर करतात येतात, हेच भोर यांच्या कार्यातून दिसून येते. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत भोर यांनी हाती घेतलेली औषध फवारणीची मोहीम ही तर अनेकांसाठी पथदर्शक आहे. स्वतःची संपूर्ण सुरक्षा सांभाळून आवश्यक तिथे त्या परिसरातील नागरिकांनी औषध फवारणी करावी, हेच या कृतीतून दिसून येते. कैलास भोर यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@