राऊतांच्या कोलांटउड्या

    02-Apr-2021
Total Views |

sanjay raut _1  



कायमच वादग्रस्त वक्तव्ये करून, नंतर कोलांटउड्या मारणारे संजय राऊत पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आले आहेत. चर्चेत राहण्यासाठी कायम अशी वक्तव्ये करायची आणि त्यावरून वादंग निर्माण झाला की, सपशेल माघार घ्यायची, हे म्हणा राऊतांसाठी अजिबात नवीन नाही. काही दिवसांपूर्वी संपुआच्या अध्यक्षपदासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राऊतांची आता चांगलीच कोंडी झाली. राऊत म्हणाले होते, “मला वाटत नाही की, देशातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाला पवारांनी संपुआचे नेतृत्व करण्यास आक्षेप आहे. आम्ही सर्वजण या क्षणी भाजपला विरोध करीत आहोत.“ असं राऊतांचं वक्तव्य होतं. यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलंच वाक्युद्ध रंगलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर काही काँग्रेस नेत्यांनी राऊतांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ”संजय राऊत हे फक्त शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना संपुआचा घटकपक्ष नाही. राऊतांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचं असून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे, असे विधान चुकीचे आहे आणि त्यांनी तसे सांगायला हवे,“ असे नाना पटोले म्हणाले. या वक्तव्यावरुन वादंग निर्माण होतोय हे लक्षात येताच, संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यावरून कोलांटउडी मारली आहे.
“सोनिया गांधींच्या जागी शरद पवार संपुआचे अध्यक्ष व्हावेत असं मी म्हणालो नाही. देशहितासाठी संपुआचे सक्षमीकरण होणे व विरोधी आघाडी मजबूत होणे गरजेचे आहे, असं माझं मत आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधींवर टीका करण्याचा माझा हेतू नव्हता,“ असं म्हणत राऊतांनी सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वक्तव्य परत घ्यायची राऊतांची ही काही पहिलीच वेळ नाही. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘अंडरवर्ल्ड डॉन’ करिम लालाची भेट घेतली होती, असंही राऊत म्हणाले होते, ज्यावरून नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये बराच गोंधळ उडाला होता. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे यांच्याविषयीदेखील राऊत असेच बरळले होते. “उदयनराजेंनी छत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा द्यावा“ असं राऊतांनी म्हटल्यानंतर राज्यभरात प्रतिक्रिया तीव्र उमटल्या होत्या. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यं करून आधी प्रसिद्धीझोतात यायचं आणि वाद निर्माण झाले की, वक्तव्यं परत घ्यायचं, ही जणू राऊतांची खोडच झाली आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.


आंदोलनाच्या आडून...


काल पंजाबमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडली. अपेक्षेप्रमाणे हिंदी अथवा मराठीतील माध्यमांनी त्याची फारशी दखल घेतली नाहीच. पंजाबमधील गुरुद्वारांवर नियंत्रण करणार्‍या ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध एक ठराव संमत केला. त्या ठरावानुसार “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारताला हिंदूराष्ट्र बनवण्याचा अजेंडा असून आमचा त्याला विरोध आहे. अशा धर्मांध कृतीला विरोध म्हणून आम्ही हा ठराव संमत करत आहोत,“ असे ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’कडून जाहीर करण्यात आले. शीख समुदायाच्या एका महत्त्वपूर्ण संघटनेतर्फे मांडला गेलेला असा ठराव आणि त्या ठरावाचं ‘टायमिंग’ यातच अनेक बाबी दडलेल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून पंजाबमधील काही तथाकथित शेतकरी(२६ जानेवारीला लालकिल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामुळे ते शेतकरी आहेत का, हा सवाल आहेच)दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धार आता हळूहळू कमी झालेली दिसते. अनेक संघटनांनी एकामागोमाग एक या आंदोलनातून काढता पाय घेतला. त्यामुळे अचानक आकाराला आलेल्या या ठरावाचा शेतकरी आंदोलनाशी काही परस्पर संबंध आहे का? राजकीयदृष्ट्या फसलेलं आंदोलन नव्याने उभं करण्यासाठी धार्मिक कट्टरतावादाचा आधार घेतला जातोय का? असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. त्याचबरोबर खलिस्तानचे गाडलेले भूत जीवंत करण्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने झालेले प्रयत्नही लपून राहिलेले नाही. पण, आता यामध्ये संघालाही मुद्दाम ओढून हिंदू आणि शीख धर्मीयांमध्ये फूट पाडण्याचा, दोन्ही धर्मांमध्ये नाहक तणाव निर्माण करण्याचा तर हा सगळा खलिस्तानी अजेंडा तर नाही ना, अशी संशयाची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. तसेच इतक्या वर्षांनी ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ला अचानक संघाचा हिंदूराष्ट्राचा अजेंडा पटलावर आणून त्याला एकाएकी विरोध का करावासा वाटला? तेव्हा, शेतकरी आंदोलनाच्या पडद्याआड या राष्ट्रदोही शक्तींचे ज्यांना काँग्रेसचाही पाठिंबा आहे, त्यांनी अशाप्रकारे समाजात दुही माजवण्याचे नाहक उद्योग करु नये, एवढीच अपेक्षा!


- ओम देशमुख