भिलई स्टील प्लांटमधून दररोज होणार पुरवठा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर टिका करण्यात व्यस्त असलेल्या ठाकरे सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
करोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याची परिस्थिती होती. मात्र, एकीकडे राज्य सरकार केंद्र सरकारवर टिका करण्यास मग्न असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात दररोज ऑक्सिजन पुरवठा होण्यास प्रारंभ झाला आहे.
ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष टँकर्सची संख्या देशभरात पाच ते सहा एवढी मर्यादित आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाहून न्यायचा कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी गडकरी यांनी भिलई स्टील प्लांटचे सज्जन जिंदाल यांच्याशी चर्चा केली आणि विशेष टँकर्सची उपलब्धता करून देणाऱ्या कंत्राटदारासोबत समन्वय साधला.
सदर कंत्राटदाराने टँकर्सची सोय करून दिल्यानंतर एक टँकर तातडीने भिलई येथे पाठविण्यात आला आणि १६ टन ऑक्सिजन नागपुरात दाखल झाला आहे. त्यानंतर सदर टँकर नागपुर येथे रिकामे करण्यात आले आणि तातडीने पुन्हा भिलई येथे पाठविण्यात आले, रात्रीपर्यंत आणखी ३६ टन ऑक्सिजन दाखल होणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सुटेपर्यंत दररोज म्हणजे सकाळी आणि रात्री नागपुरात भिलई येथून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे भिलई स्टील प्लांटकडूनही महाराष्ट्रास २० टन क्षमता असलेला टँकर प्राप्त होणार आहे, त्यामुळे राज्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
ऑक्सिजन साठविण्यासाठी १ हजार सिलेंडर्सचीही व्यवस्था
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह तो साठवून ठेवण्यासाठी सिलेंडर्सचीही आवश्यकता असते. त्यासाठी गडकरी यांच्या प्रयत्नातून १००० रिकाम्या सिलेंडर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सिलेंडर्स रिकामे झाल्यानंतर ते पुन्हा भरून आणण्यासाठीदेखील तातडीने भिलई येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.