राजकीय क्षेत्रात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणे हे साहजिक आहे. यात काही नवीन नाही. राजकीय नेते हे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकमेकांवर निशाणा साधतच असतात. राजकीय क्षेत्रात असे घडणे स्वाभाविक आहे. मात्र, क्रीडाविश्वात असे प्रकार घडल्यानंतर याची चर्चा सर्वत्र होते. सध्या क्रीडा विश्वात असेच काही घडत आहे. कुंभमेळाच्या आयोजनावरून काही क्रीडापटूंमध्येही चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. देशामध्ये कुंभमेळ्याच्या आयोजनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले असतानाच, भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने कुंभमेळ्याच्या आयोजनाचे समर्थन केले. योगेश्वर दत्तने कुंभमेळा आयोजनाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता शूटर अभिनव बिंद्राने त्याला प्रत्युत्तर दिले आणि क्रीडाविश्वातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले. “योगेश्वर दत्त हा भाजपचा सदस्य असल्याने त्याने कुंभमेळाच्या आयोजनाचे समर्थन केले आहे. मुळात देशात कोरोना संकट असताना कुंभमेळ्याचे आयोजन करण्याची गरज होती का? व्हायरस धर्मांमध्ये भेदभाव करत नाही. एखाद्या खेळाडूने, तू संपूर्ण क्रीडा क्षेत्राला यामुळे मान खाली घालायला लावली,” अशी टीका योगेश्वर दत्तवर करण्यात आली. कुंभमेळ्याच्या आयोजनावरून टीका करण्यापर्यंत ठीक होते. मात्र, केवळ याचे समर्थन केल्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वाला मान खाली घालायला लावण्याइतपत योगेश्वरने काय केले, असा प्रश्न काही क्रीडा समीक्षकांनी उपस्थित केला आहे. तो केवळ भाजपचा समर्थक आहे आणि त्याने कुंभमेळ्याच्या आयोजनाचे समर्थन केले म्हणून त्याला या शब्दांमध्ये फटकारणे हे अयोग्य असल्याच्या मुद्द्यावर क्रीडा समीक्षकांनी बोट ठेवले. राजकीय क्षेत्रातील अनेक बाबींवर अनेक खेळाडू आणि सिनेविश्वातील कलाकार आपली मते मनमोकळेपणाने मांडताना दिसतात. अनेकदा यावरून मतमतांतरे झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, त्या क्षेत्राला मान खाली घालायला लावण्याइतपत कधीच काही घडलेले नाही. त्यामुळे केवळ कुंभमेळ्याच्या आयोजनावरून योगेश्वरला असे बोलणे योग्य नसल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. किमान ऑलिम्पिक विजेत्या नेमबाजपटूने तरी योग्य ‘निशाणा’ साधणे अपेक्षित आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
‘हे’ काही नवीन नाही...
राजकीय क्षेत्राशी संबंधित विषयावर क्रीडा आणि सिनेक्षेत्रातील व्यक्तींनी बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राजकारणाशी संबंधित असणार्या अनेक मुद्द्यांवर क्रीडा आणि सिनेक्षेत्रातील कलाकार नेहमीच आपले मत व्यक्त करत आले आहेत. बर्याचदा या मुद्द्यावरून वादंगदेखील झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. मात्र, एखाद्याच्या विधानानंतर त्या संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण क्षेत्राला मान खाली घालायला लागली, अशी खालच्या पातळीची टीका कधीही कुणी केली नव्हती. उदाहरण घ्यायचेच झाले तर अलीकडच्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्याचे घेता येईल. दिल्लीच्या वेशीवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर काही परदेशी कलाकारांनी आवाज उठविण्यास सुरुवात केल्यानंतर भारतातीलही काही कलाकारांनी या मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिले होते. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह दिग्गज कलाकारांनी यात उडी घेतल्यानंतर हा मुद्दा सर्वत्र चर्चेत आला होता. काही कलाकारांनी सरकारच्या बाजूने, तर काही कलाकारांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला. मात्र, कुणीही वैयक्तिकरीत्या कलाकार आणि खेळाडूविरोधात ट्रोल केले नव्हते. परंतु, योगेश्वर दत्त याने मात्र कुंभमेळ्याचे समर्थन केल्यानंतरच संपूर्ण क्रीडाक्षेत्राला मान खाली घालावी लागते, असे म्हणणे चुकीचे आहे. याआधीही अनेक मुद्द्यांवरून क्रीडा आणि सिनेक्षेत्रातील कलाकारांनी आपापली मते मांडली आहेत. यावरून मोठा वादंग माजला असला, तरी कुणीही वैयक्तिक पातळीवर जाऊन कधीच टीका केलेली नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या कलाकाराला त्याच्या क्षेत्राशी संबंधित मुद्द्यावरून फटकारणे हे अयोग्य आहे. टीका करण्याआधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तो केवळ भाजपचा सदस्य असल्याने योगेश्वरने कुंभमेळ्याच्या समर्थनार्थ ट्विट केले हे म्हणणेदेखील चुकीचे आहे. कारण, कुंभमेळा हा एक धार्मिक मुद्दा आहे. धार्मिक श्रद्धा आणि आस्थेचा विषय असल्याने त्याने याबाबत समर्थन केले होते. मात्र, टीका करताना इतर खेळाडूंनी ही बाब लक्षात न घेताच त्याला सुनावण्यास सुरुवात केली. त्यामुळे असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे समीक्षकांचे म्हणणे आहे.
- रामचंद्र नाईक