‘प्लाझ्मा’दानासाठीही नागरिकांना जागृत करण्याचे काम ‘समर्थ भारत पुनर्बांधणी योजने’ अंतर्गत कार्यकर्ते संपूर्ण पुणे शहरात करीत आहेत. या कार्याचा आणि एकूणच ‘प्लाझ्मादानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
भारतीय संस्कृतीमध्ये ‘दान’ ही संकल्पना अतिशय पवित्र मानली जाते. आपण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे मानतोच; पण सद्यःस्थितीत ‘प्लाझ्मा’दान अतिशय गरजेचे आणि जीवाला जीव देऊन प्राण वाचवणारे पवित्र दान आहे. काळाच्या ओघात होणारे बदल स्वीकारताना सर्व समज, गैरसमज दूर करून नागरिकांनी ‘प्लाझ्मा’दानासाठी पुढे येण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर आणि तज्ज्ञसुद्धा ‘प्लाझ्मा’दानासाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत. सध्या पुणेकरांवर असंच म्हणायची वेळ आली आहे की, ‘प्लाझ्मा’ देता का कुणी ‘प्लाझ्मा’? पुण्यात ‘प्लाझ्मा’साठीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून कोरोना रुग्णांचे नातेवाईक ‘प्लाझ्मा’ मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न व धावपळ करताना दिसत आहेत. एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे ‘प्लाझ्मा’ उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘समर्थ भारत पुनर्बांधणी अभियान’ अंतर्गत कार्यकर्ते कार्यरत आहेत. सध्या १०० एमएल ‘प्लाझ्मा’सुद्धा कोरोना अत्यवस्थ रुग्णासाठी एक वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.
‘प्लाझ्मा’ थेरपी म्हणजे काय?
कोरोनापासून बर्या झालेल्या व्यक्तीचा ‘प्लाझ्मा’ (रक्त द्रव) कोरोनाबाधित इतर गंभीर रुग्णाला देण्याच्या प्रक्रियेला ‘प्लाझ्मा’ थेरपी म्हणतात. ‘प्लाझ्मा’मध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे ‘प्लाझ्मा’दान हे रुग्णाला वरदान ठरत आहे. कोरोना होऊन गेलेला रुग्ण फक्त ‘प्लाझ्मा’दान करू शकतो. अॅन्टिबॉडीजचे प्रमाण जर योग्य असेल तर कितीही वेळा ‘प्लाझ्मा’दान करता येतो. जीव वाचविण्यासाठी ‘प्लाझ्मा’चा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. ‘प्लाझ्मा’मुळे रुग्णाच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अॅन्टिबॉडीज तयार होतात आणि रुग्ण दगावण्यापासून वाचतो. ‘आयसीएमआर’च्या निर्देशाप्रमाणे ‘प्लाझ्मा’ थेरपीबाबत काही मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु, याचा योग्य तो आदर ठेवून व पुढे विचार करता दृश्य स्वरूपात होणारा फायदा हा नक्की दिसत आहे. रुग्णाचा जीव वाचतोय, मृत्यूच्या दारातून रुग्ण परत येत आहेत आणि ज्यांना ही अनुभूती येते आहे ते तर दात्याचे खरंच खूप आभार मानतात. त्यामुळे दात्यांना रक्तदानासाठी जसे आवाहन करतो, तसेच ‘प्लाझ्मा’दानासाठीही त्यांना जागृत करणे जरुरीचे आहे आणि हे काम ‘समर्थ भारत पुनर्बांधणी योजने’ अंतर्गत कार्यकर्ते संपूर्ण पुणे शहरात करीत आहेत.
‘प्लाझ्मा’दात्याला या दानाने काहीही नुकसान होत नाही. ‘कोविड’ होऊन गेल्यानंतर त्याच्या शरीरात १४ ते २८ दिवसांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढवणार्या विषाणूंची वाढ होते आणि तो दान करण्यास सज्ज होतो. ज्याप्रमाणे रक्तदान करतानाचे नियम आहेत, त्याचप्रमाणे ‘प्लाझ्मा’दानाचेही नियम आहेत. ‘प्लाझ्मा’दान केल्यानंतर काही काळ थोडा थकवा जाणवतो. पण, शरीर तो थकवा, ती कमतरता १५ दिवसांतच भरून काढते आणि ‘प्लाझ्मा’दाता पुन्हा दान करण्यासाठी तयार होऊ शकतो. शरीराचे ‘मॅकॅनिझम’ समजून घेतले तर हे फार सोपे आहे. परंतु, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने ‘प्लाझ्मा’दाते पुढे येत नाहीत, ही शोकांतिका आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी ज्यांना कोरोना होऊन २८ दिवस झालेत, असे पुढील तीन महिन्यांच्या आत ‘प्लाझ्मा’दान करू शकतात (रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या तारखेपासून मोजावे.) इतर आजार ब्लडप्रेशर, मधुमेह, हृदयरोग नसावे. तसेच इतर काही औषधे चालू नसावीत. कोणताही वेगळा आजार नसावा. जे १८ ते ५५ वयोगटात आहेत, ज्यांचा अॅन्टिबॉडीचा काऊंट चांगला आहे, वजन ५५ किलोच्या पुढे आणि हिमोग्लोबिन १२.५० पुढे आणि जे तंदुरुस्त आहेत, असे फक्त पुरुषच ‘प्लाझ्मा’दान करू शकतात.
महिला ‘प्लाझ्मा’दान करू शकत नाहीत. वर्षभरात स्वतः रक्त अथवा रक्तघटक घेतले असतील, तर ‘प्लाझ्मा’दान करता येत नाही. ‘प्लाझ्मा’दान करण्याआधी कोरोना अॅन्टिबॉडी टेस्ट केली जाते. आपल्याकडे स्वतःसाठी पुरून इतरांना देता येतील, अशा अॅन्टिबॉडीज असतील तरच ‘प्लाझ्मा’ घेतला जातो. दर १५ दिवसांनी परत ‘प्लाझ्मा’दान करता येते. ‘प्लाझ्मा’दानामुळे वाचलेले रुग्ण अक्षरशः कृतज्ञता व्यक्त करताना भावनाविवश होतात. त्यांचा लाखमोलाचा जीव वाचलेला असतो, अशाच कुणाच्या दानातून. बाहेर इतका गैरसमज असतानादेखील देवदूतासारखे येऊन ‘प्लाझ्मा’दान करून जीव वाचवलेला असतो आणि याची जाणीव नक्कीच त्या रुग्णांना असतेच. असे ‘प्लाझ्मा’दान करणारे रुग्ण विरळच आहेत. एकाने तर अशा स्थितीतून वाचल्यावर ‘प्लाझ्मा’दानाचा विडाच उचलला आहे आणि त्यांनी जवळपास सात वेळा ‘प्लाझ्मा’दान केले आहे. एका रुग्णाला वेळेवर ‘प्लाझ्मा’ दिल्याने तो १२ दिवस ‘आयसीयु’मध्ये राहून बाहेर आला. त्याने, “मीही प्लाझ्मा देईन आणि रुग्णाचा जीव वाचवेन,” अशी प्रामाणिक इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच किशोरभाई शहा म्हणतात की, “मी आणि माझे कुटुंबीय कोरोनाबाधित असताना मला वेळेत ‘प्लाझ्मा’ मिळाल्याने आज मी जीवंत आहे. माझा मुलगा बरा होऊन आता त्यानेसुद्धा ‘प्लामा’दान केले आहे.”
‘प्लाझ्मा’ मिळून बरे झालेले रुग्ण ‘प्लाझ्मा’ वेळेवर मिळाल्याने ते आज त्यांच्या माणसांत आनंदाने परत आलेत. एक उत्फुल्लजीवन जगायला पुन्हा सज्ज झालेत आणि ‘प्लाझ्मा’ द्यायलाही आतुर आहेत. त्यांचा जो प्रतीक्षाकाळ आहे, तो संपला की, ते ‘प्लाझ्मा’ देणार आहेत. पण, फार थोडे रुग्ण असे आहेत की, जे त्याचे महत्त्व जाणून आहेत. त्यांच्या मदतीने आपण संपर्क अभियान राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचावेत, यासाठी धडपड चालू आहे.
काही जणांचे अनुभवही बोलके आहेत.
कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे, जो आपल्याला माणसांपासून एकट्याला बाजूला काढतो आणि विलगीकरणात ठेवतो. तेव्हा होणारी मनाची घालमेल काही जणांनी सांगितली की, माणूस हा समाजप्रिय आहे. पूर्वीपासून एक जमाव करून राहणारा प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. वाळीत टाकलेल्या माणसाची जी अवस्था होते तीच अवस्था या काळात अनुभवायला येते आहे आणि या परिस्थितीमध्ये खूप सकारात्मकता जोपासावी लागते. नाही तर व्यक्ती लवकर नैराश्याने घेरला जाऊ शकतो. मागील ऑगस्ट २०२० पासून यासाठी काम करण्यास सुरुवात करताना पुणे महानगरपालिका कार्यालयाकडून कोरोना झालेल्या रुग्णांची यादी प्राप्त करून घेणे, प्राप्तयादीवर १८ ते ६० वयोगटातील कोरोना झालेल्या रुग्णांना फोन करणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे जिकिरीचे काम सर्व कार्यकर्ते करीत आहेत.
पुणे महानगरपालिकेकडून यादी प्राप्त करून घेऊन ती नऊ भागांमध्ये भागशः विभागणी करून घेऊन वाटप करणे व पुढे त्यांनी नगर, वस्ती स्तरावरील प्रयत्नातून त्यावर कॉलिंग व ‘प्लाझ्मा’दानासाठी दात्याने रक्तपेढीत जाणे, अशी व्यवस्था उभी केली आहे. समितीच्या महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अनेक कार्यकर्त्यांना याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. महानगरातील ५० हजार नावे मिळाल्यास त्यातील इतर सहव्याधी आणि वैद्यकीयदृष्ट्या ‘प्लाझ्मा’दान करू शकणार्यांची यादी थेट १३ हजार झाली आणि त्यातून अंदाजे ३२५ दात्यांनी ‘प्लाझ्मा’दान केले, असे चित्र सध्या आहे. त्यासाठी १५० कार्यकर्ते प्रत्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते विविध माध्यमांतून प्रयत्नशील आहेत. त्यात अनेक विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचासुद्धा सहभाग आहे. या दानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
याबद्दल अनेक समज-गैरसमज असताना ‘सह्याद्री हॉस्पिटल’चे डॉ. चारुदत्त आपटे, ‘जनकल्याण रक्तपेढी’चे डॉ. अतुल कुलकर्णी यांनीसुद्धा ‘प्लाझ्मा’दानाचे महत्त्व आणि गरज अधोरेखित करून नागरिकांनी ‘प्लाझ्मा’दान करावे, असे आवाहन केले आहे. दुसर्याचा जीव आपल्या छोट्याशा कृतीतून आणि दानातून वाचवायला हवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘प्लाझ्मा’ची आवश्यकता भासत आहे, तशीच रक्ताचीदेखील गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
‘प्लाझ्मा’दानाची चळवळ खूप जोमाने कार्यरत व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मृत्युदर कमी व्हावा, हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नातील हा प्रयत्न आहे. ‘प्लाझ्मा’विषयी असणारे गैरसमज दूर करून प्रत्येक रुग्ण ‘प्लाझ्मा’दान करण्यासाठी पुढे यावा, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. आलेले संकट हरवूया आणि नव्याने जीवनाचा आनंद घेण्यास सज्ज होऊया.
- संतोष हिरवे
(लेखक पुणे महानगर
सहसेवा शिक्षणप्रमुख आहेत.)