लोकशाहीला घाबरणारा चीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2021   
Total Views |

CHina_1  H x W:
 
संपूर्ण जगात कोरोना विषाणूची निर्यात केल्यानंतर चीन अगदी निर्धास्त आहे. त्यामुळेच एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसर्‍या-तिसर्‍या लाटेचा सामना करण्यात व्यस्त असताना कम्युनिस्ट चीन मात्र हाँगकाँमध्ये लोकशाहीचा गळा कसा आवळता येईल, याचा विचार करण्यात व्यस्त आहे. त्यात हाँगकाँगमधील लोकशाही चळवळ चिरडून टाकणे आणि तेथील लोकशाहीवादी कार्यकर्ते, उद्योजक, पत्रकार, वकील, प्राध्यापक यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांवर लाल वरवंटा अतिशय निर्दयीपणे चालविला जात आहे. त्याचाचा एक भाग म्हणून हाँगकाँगच्या लोकशाही चळवळीतील एक प्रमुख चेहरा असलेल्या जिमी लाय यांना शिक्षा ठोठावण्यात आली.
 
 
जिमी लाय यांचा जन्म चीनच्या कँटनमधल्या एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांच्या जन्माच्या काही वर्षांनंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष जन्माला आला आणि त्यांच्या हुकूमशाहीला प्रारंभ झाला. कम्युनिस्ट राजवटीचा वरवंटा साहजिकच लाय यांच्या कुटुंबावरही पडला, कारण शेवटी ते पडले भांडवलदार. कम्युनिस्ट राजवटीला कंटाळून वयाच्या 12व्या वर्षीच जिमी लाय हाँगकाँगला पळून गेले. तिथेच त्यांनी मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर मग त्यांनी आपल्या व्यवसायाचा व्याप वाढविला आणि ‘जियोर्डानो’ हा कपड्यांचा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड जन्माला घातला. विशेष म्हणजे, कम्युनिस्ट राजवटीला भीक न घालता, आपली तत्त्वे कायम ठेवणार्‍या बोटावर मोजता येतील एवढ्या उद्योजकांमध्ये लाय यांचा समावेश होतो.
 
 
 
त्यामुळे कम्युनिस्ट चीनने लाय यांच्यावर दीर्घकाळपासून नजर ठेवली होती. हाँगकाँगच्या स्वातंत्र्यास लाय यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नेहमीच पाठिंबा दिला आहे. चीनच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा त्यांनी अगदी सुरुवातीपासून विरोध केला. 1998 साली चीनने तियानमेन चौकात लोकशाहीवादी आंदोलनकर्त्यांवर रणगाडे चालविल्याच्या घटनेपासून तर ते प्रखर चीनविरोधी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी चीनने बीजिंगमध्ये असलेल्या लाय यांच्या व्यवसायावर बंदी घालण्याची धमकी दिली होती. मात्र, तरीदेखील कम्युनिस्टांच्या दहशतीला ते बधले नाहीत. त्यानंतर त्यांनी स्वत:चे प्रकाशन सुरू केले आणि चिनी कम्युनिस्टांच्या नरसंहाराविरोधात लिखाणही करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून हाँगकाँगच्या लोकशाही चळवळीचा एक प्रमुख चेहरा म्हणून लाय यांची जगाला ओळख झाली. जागतिक समुदायाचे लक्ष हाँगकाँगकडे आकर्षित करण्यातही लाय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
गतवर्षी जूनमध्ये चिनी राजवटीने हाँगकाँगसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादला. तेव्हा त्यांनी हा कायदा म्हणजे हाँगकाँगसाठी मृत्युदंड असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्याचप्रमाणे या कायद्यामुळे हाँगकाँगची ‘जागतिक वित्त केंद्र’ असलेली ओळख पुसली जाण्याचाही धोका त्यांनी व्यक्त केला होता. हाँगकाँगला वाचविण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही आवाहन केले होते. तेव्हापासून लाय यांच्याविरोधात चिनी राजवट संधी शोधत होती.
 
 
अखेर यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या नावाखाली लाय यांना कम्युनिस्ट राजवटीने ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्यांच्यावर रीतसर खटला चालविला, हे भाग्यच म्हणायचे. कारण, आपल्याविरोधात बोलणार्‍याचा काटा काढण्याची प्रथा कम्युनिस्टांमध्ये असते. तर लाय यांच्यावर सत्तापालट करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आणि फुटीरतावादी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच सर्व आरोप सिद्ध झाले आणि अखेर आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, तुरुंगातही लाय हे जीवंत राहतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारण, यापूर्वी अनेकदा त्यांच्या हत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यांच्या घरावर आणि कंपनी मुख्यालयावरही बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत.
 
 
त्यामुळे खरे तर लाय यांच्या जीवाला आता खरा धोका निर्माण झाला आहे. कारण, तुरुंगात कम्युनिस्ट राजवट कशाप्रकारचे अत्याचार करते, याच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध आहेतच. लाय यांनी तर कम्युनिस्ट राजवटीला केवळ आव्हानच दिले नव्हते, तर त्यांच्या मनात धडकीदेखील भरविली होती. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट राजवट कोणत्याही थराला जाऊ शकते, यात कोणतीही शंका नाही. मात्र, लाय यांच्या उदाहरणावरून कम्युनिस्टांना लोकशाहीची किती भीती वाटते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@