‘अकल्पित’ सेवाकार्य

    19-Apr-2021   
Total Views |

Dr Akalpita Paranjape_1&n
 
वैज्ञानिक, ‘होमियोपॅथी मास्टर’ ते कोरोनाकाळात असंख्य लोकांना कोरोनाच्या लक्षणापासून वाचविणार्‍या डॉ. अकल्पिता परांजपे यांच्याविषयी...
“कडूनिंबाच्या पानाचा रस निरोगी माणसाने दररोज घेतला तर तो सहसा आजारी पडत नाही. अगदी कोरोनामध्ये एखाद्या रुग्णाचा ‘ऑक्सिजन’ स्तर कमी झाला, तर त्याला कडूनिंबाच्या पानाचा रस दर दोन तासांनी दिल्यास बराच फरक पडतो. कसे आहे की, ताप आल्यावर लगेच घाबरून न जाता एकच लक्षात ठेवायचे की, शरीरात बाहेरून आलेल्या विषाणूंशी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती लढत असते,” डॉ. अकल्पिता परांजपे सांगत होत्या. आपण प्रसारमाध्यमांवर सातत्याने कोरोनाचा हाहाकार आणि जनतेची दुर्बलता दाखवली जाते. हे सगळे पाहून माणसाचे मन खचून जाते. या अशा वेळी डॉ. अकल्पिता परांजपे यांनी गेल्या वर्षीपासून कोरोनावर लेख लिहिले आणि महाराष्ट्रभर कोरोनाबद्दलची अकल्पित बाजू समोर आली. कोरोनाची लक्षणं बरी होऊ शकतात, तेही कमी खर्चात आणि ‘होमिओपॅथी’च्या औषधांनी, असा प्रचार-प्रसार त्यांनी केला.
 
 
 
अकल्पिता यांचे खारघर येथे ‘भूमी चॅरिटेबल ट्रस्ट’ आहे. तिथे अगणित रुग्ण येत असतात किंवा दूरध्वनीद्वारेही उपचार करून घेतात. डॉ. अकल्पिता म्हणतात की, “भारतीयांनी दररोज कडूनिंबाच्या पाल्याचा रस प्यायला, तर भारतातून कोरोना हद्दपार होईल. औषध घेणे यापेक्षा औषध घेण्याची वेळच येऊ नये, अशी तयारी करायला हवी.” डॉ. अकल्पितांच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि तसे प्रत्यक्षात आचरण करणारे अनेक जण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा प्रसार कसा थांबवायचा, याबाबतची लोकजागृती करण्यासाठी १०० स्वयंसेवक आहेत. सगळे जग कोरोनाने हतबल झाले असताना डॉ. अकल्पिता आणि त्यांचे स्वयंसेवक लोकांना सांगत आहेत की, कोरोनाची लक्षणं बरी होतात. वनौषधी आजही उपयुक्त आहेत. दिवसातून अगणित दूरध्वनी डॉ. अकल्पितांना येत असतात. त्या आणि त्यांचे पती डॉ. श्रीनिवास परांजपे हे दोघेही या दूरध्वनीवरून संपर्क करणार्‍या लोकांना मार्गदर्शन करतात.
 
 
‘होमियोपॅथी’मध्ये अक्षरशः मास्टर असलेल्या डॉ. अकल्पिता यांनी रूढार्थाने फक्त ‘होमियोपॅथी’चे शिक्षण घेतले नाही, तर स्वसंशोधनातून आणि अनेक प्रात्यक्षिकांतून त्या शिकत गेल्या. त्या ‘बीएआरसी’मध्ये वैज्ञानिक. त्यांनी एकून ८० संशोधन पेपर्स लिहिले. तशा त्या मूळच्या होळकर स्टेटच्या म्हणजे सध्याच्या इंदौरच्या. त्यांचे वडील बाळकृष्ण वझे यांची ‘टायपिंग इन्स्टिट्यूट’. आई राधाबाई गृहिणी, अत्यंत कष्टाळू. या दाम्पत्यांचे कन्यारत्न म्हणजे अकल्पिता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे वर्ष, त्याच काळात अकल्पिता यांचा जन्म. त्यामुळेच जन्मापासून त्या स्वतंत्रवृत्तीच्या. आई-वडिलांचे सुसंस्कृत संस्कार त्यांच्यावर घडत होते. घरी आलेल्या भिकारणीला आई आधी पाणी आणि साबण देऊन अंघोळ करायला लावी. मग नावाला एखादे काम देई. काम झाले की, आई तिला जेवण आणि पैसे देई. कुणाचाही स्वाभिमान दुखवू नये, होता होईल तेवढे समाजासाठी करावे, हा वसा अकल्पिता यांनी आईकडून घेतला. ‘एमएस्सी’ झाल्यानंतर त्यांना ‘बीएआरसी’मधून नोकरीचा प्रस्ताव आला. नोकरीसाठी एकट्या मुंबईला आल्या. प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांचा विवाह डॉ. श्रीनिवास परांजपेंशी झाला. तेही ‘बीएआरसी’मध्येच होते. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू केले. अकल्पिता यांना मातृत्वाची चाहूल लागली. गरोदरपणात त्रास जाणवला. तेव्हा डॉक्टर म्हणाले, “तुम्हाला प्रोटिनचे औषध-गोळ्या जन्मभर खाव्या लागतील.”
 
 
अकल्पिता यांना वाटले हे तर औषधांच्या कुबड्या घेऊन जगणे, औषधाशिवाय जगता यायला हवे. मग त्या ‘होमियोपॅथी’कडे वळल्या. भाईंदरच्या उत्तन येथील केशवसृष्टीशी त्यांचे नाते जुळले. वनौषधी संशोधन आणि लागवडीसंदर्भात अभ्यास आणि कार्य त्या करू लागल्या. शहरातही असे वनौषधी उद्यान असावे, या विचारांनी त्यांनी शताब्दी हॉस्पिटल बायोगॅस प्रकल्पाच्या बाजूला वनौषधीचीं लागवड केली. या बायोगॅसचे अधिकारी त्यांचे व्याही. एके दिवशी महानगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितले की, “इथे केवळ बायोगॅस प्रकल्पच राहील.” त्यांनी कर्मचार्‍यांना आदेश दिले त्यांनी मुळासकट वनौषधी उपटून फेकून दिल्या. त्यामुळे डॉ. अकल्पितांनी ठरवले की, जागा विकत घेऊन तिथे वनौषधी लावायची. त्यांनी लाखो रुपयांची जागा विकत घेतली. १८ जणांच्या जमिनी होत्या. पण, नंतर त्यांना सांगण्यात आले की, पैसेही मिळणार नाही, जमिनीही मिळणार नाहीत, काय करायचे ते करा. डॉ. अकल्पितांनी या सगळ्यांविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अजूनही हा खटला सुरु आहे.
 
 
दरम्यान, ते १८ जण पुन्हा जमिनी खरेदी केली तर जमीन द्यायला तयार झाले. ही जमीन वनौषधीसाठी अत्यंत उपयुक्त होती. स्वतंत्र वनौषधी बाग करायची, संशोधन करायचे या ध्यासाने त्यांनी ती जमीन परत विकत घेतली. अशा या ध्येयवेड्या डॉ. अकल्पिता. भ्रष्टाचारविरोधात जागृती व्हावी म्हणून त्यांनी स्वेच्छिक निवृत्ती घेतली आणि एका ‘भारत उदय मिशन’ या पक्षातर्फे नगरसेवक आणि खासदारकीची निवडणूकही लढल्या. जिंकण्यासाठी नव्हे तर निवडणुकीत होणार्‍या भ्रष्टाचाराबाबत जागृती करण्यासाठी. तसेच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, भूजल पातळीची वाढ करणे, गुन्ह्यात अडकवलेल्या स्त्रियांना मदत, निराधार अल्पवयीन मुलींना मदत, सेंद्रिय शेती, होमियोपॅथीवर मूलभूत संशोधन अशा अनेकविध सेवाकार्यांतही अकल्पिता आजही तितक्याच अग्रेसर आहेत. तर असे हे डॉ. अकल्पिता यांचे बहुआयामी विद्वान आणि तितकेच सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आणि निरलस कार्य....
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.