‘कोरोना’ लस आणि अर्थकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2021   
Total Views |

corona _1  H x


सन २०२० पासून जगात आणि सध्या तुलनेने भारतात सर्वात जास्त चर्चिलेला विषय म्हणजे कोरोना. कोरोनाला थोपविण्यासाठी मागील वर्षी जगभर ‘लॉकडाऊन’चा पर्याय अंमलात आणला गेला. त्यामुळे जागतिक अर्थकारणाशी संबंधित अनेक मुद्दे समोर आले.
 
 
 
जगाचे चलनवलन पुन्हा पूर्वीप्रमाणे व्हावे याकरिता जगभर कोरोना प्रतिबंधक लसीचे संशोधन सुरु झाले. 2020 च्या शेवटी व २०२१ च्या सुरुवातीला ही लस बाजारात आली आणि ती अनेकांना देण्यात आली. कोरोना लसीकरण जसे जसे वाढत आहे, तसे तसे जागतिक अर्थकारणदेखील वेगवान होताना दिसून येत आहे. कोरोनाची सुरुवात चीनपासून झाली. त्यावेळी जगातील अनेक राष्ट्रांचे लक्ष अमेरिकेकडे होते. सध्या चीन आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.
 
 
अमेरिकेत नागरिक खर्च करण्यासाठी बाहेर पडत असल्याने तेथील बँकांच्या नफ्यात सध्या तिपटीने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे चीननेदेखील आपल्या व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील विविध वित्त संस्थांमध्ये १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे परिणाम विविध वृत्तांच्या आधारे समोर येत आहेत. कोरोना सर्व देशभर (किंवा खंडभर) सुरू होण्यापूर्वी अमेरिकेची अर्थव्यवस्था जशी होती त्याच पातळीर येत असल्याचे दिसून येते. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेन बँकांना झालेला भक्कम नफा या गोष्टीचा मजबूत संकेत आहे.
 
 
 
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत वाढत्या बँकिंग व्यवसायाचा वापर थेट वाढीत गणला जातो. म्हणजेच, बाजारात वाढलेले क्रियाकलाप अर्थवृद्धीचे संकेत आहेत. ‘बँक ऑफ अमेरिके’चा नफा वर्षाकाठी वाढत जात आहे आणि जानेवारी ते मार्च या तिमाहीत ‘सिटी ग्रुप’चा नफा दुपटीने वाढला आहे. भांडवलनिहाय ‘रिटर्न ऑन इक्विटी’ (आरओई)च्या बाबतीत, ‘सिटी ग्रुप’च्या गुंतवणूकदारांनी २० टक्के, ‘जेपी मॉर्गन’च्या गुंतवणूकदारांनी २९ टक्के आणि ‘गोल्डमन सॅक्स’च्या गुंतवणूकदारांनी ३३ टक्के वाढ साध्य केली आहे.
 
वास्तविक, अमेरिकेत आतापर्यंत कोरोना लसीचे सुमारे २०० दशलक्ष डोसच देण्यात आलेले आहेत. याचा परिणाम असा झाला की बार, रेस्टॉरंट्स, किरकोळ स्टोअर्स आणि मॉल्समध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे वस्तू खरेदी तसेच इतर अनुषंगिक जिन्नस यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे बँकिंग दृश्यमानता नवीन उंचीवर पोहोचली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अमेरिकेत रोखीपेक्षा क्रेडिट कार्ड जास्त वापरली जातात. यामुळे बँकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच बँकांचा वाढणारा व्यवसाय वाढत्या खर्चाचे लक्षण आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत नागरिकांच्या वाढत्या खरेदीमुळे अमेरिकेच्या बँक व्यवसायाला मोठा आधार मिळाला.
 
 
तसेच, शेअर बाजारातदेखील व्यापार मोठ्या प्रमाणात झाल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. ‘स्टॉक मार्केट’ आणि ‘बॉन्ड मार्केट’मध्ये ‘रिटेल ट्रेडिंग’ वाढल्याने जेपी मॉर्गनच्या ‘इनव्हेस्टमेंट बँकिंग यु{नट’चा नफा विक्रमी स्तरावर पोहोचला. त्याचप्रमाणे २०२०च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत २०२१च्या पहिल्या तिमाहीत ‘गोल्डमन सॅक्स’चा ‘इक्विटी-अंडररायटिंग रिव्हेन्यू’ ४० टक्क्यांनी वाढला. याचदरम्यान खास अधिग्रहण उद्देशाने तयार केलेल्या कंपन्यांच्या वाढत्या ट्रेन्डमुळे ‘सिटी ग्रुप’च्या ‘इन्व्हेस्टमेंट’ बँकेच्या कमाईतही वाढ झाली.
 
 
कोरोना काळात चीनने जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपीची १८.३ टक्के वाढ नोंदविली. तेथे निर्यातीत आणि देशांतर्गत बाजारात चांगली मागणी असण्याबरोबरच छोट्या व्यापार्‍यांना सातत्याने पाठबळ मिळाल्यामुळे ही कामगिरी गाठली गेली. तथापि, ही वाढदेखील बेस इफेक्टचा एक परिणाम आहे. कारण, उर्वरित देशांपूर्वी चीनने काही शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’सारखे उपाय केले होते आणि ते कोरोनाशी सामोरे जाण्यात अग्रेसर होते.
 
 
गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे चीन आणि भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मंदावल्या होत्या. तथापि, चीन केवळ दोन तिमाहीत या संकटातून सावरला आहे. या सर्व तुलनेत भारतही आगामी काळात मागे नसेल. भारतात किंवा भारताच्या काही भागात आज जरी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले, तरी भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. त्यामुळे या संकटातून भारतदेखील लवकर बाहेर पडेल. संकटांवर उपाय आणि आत्मविश्वास निर्माण करणारे साधन म्हणून कोरोना लस अर्थकारणाला चालना देत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@