फार्मा कंपनीच्या प्रमुखांना मुंबईत संशयास्पद अटक

    18-Apr-2021
Total Views |


DF in police station_1&nb

फार्मा कंपनीच्या प्रमुखांना मुंबईत संशयास्पद अटक
 
मुंबई : राज्यातील वाढती कोरोनास्थिती आणि रुग्णसंख्येच्या प्रमाणात कमी संख्येत उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन यावर उपाय म्हणून दमन येथील एका फार्मा कंपनीने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी तयारी दर्शवली होती आणि त्याच कंपनीच्या प्रमुखांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान, याच कंपनीला केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची परवानगी दिली आहे, ज्याचा पाठपुरावा महाराष्ट्र प्रदेश भाजपने केला होता.

राज्यातील कोरोनाची एकंदर परिस्थिती आणि औषधांची कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपने दमन येथील फार्मा कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी विनंती केली होती. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत संबंधित कंपनीने राज्याला पुरवठा करण्याची हमी दिली होती. मात्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या बाबतीत कसलाही सहभाग नोंदवला नाही, उलटपक्षी संबंधित कंपनीवर दबाव टाकण्याचे काम सरकारने केले अशी चर्चा माध्यमांत होती. फार्मा कंपनीच्या प्रमुखांना झालेल्या या "संशयास्पद" अटकेमुळे त्या चर्चेला आता कुठे तरी दुजोरा मिळतोय.

या संशयास्पद अटकेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठूण सदरील प्रकरणाबाबत पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली असता केवळ संशयाच्या आधारे त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली..
एखाद्या प्रतिष्ठित कंपनीच्या मालकाला अशा संशयास्पद पद्धतीने अटक करण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा काय हेतू असावा ? सरकार विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपण्याचे काम राज्यातील सरकार करत आहे का ? असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत, ज्याची उत्तरे राज्य सरकारला द्यावी लागणार आहेत.