मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल माफियाची निर्मिती झाली, आता ठाकरे सरकारच्या काळात ऑक्सिजन माफिया निर्माण झाले, असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दमण येथील रेमडेसिव्हीरची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीला भेट दिली होती. त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारची पिसे काढली.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्येत देखील झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. असे असताना राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. महाराष्ट्रात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जास्तीत जास्त पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी कंपनीला केली. ब्रूक फार्माने महाराष्ट्राला दिवसाला 20 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर ब्रूक फार्माच्या फॅक्टरीचे मालक, प्रवीण दरेकर यांच्या समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटले, त्यावर राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या परवानगीचे पत्र येत्या आठ तासांत ब्रूक फार्माला देऊ, असे आश्वासन दिले होते. पण २४ तास उलटून देखील अजून राज्य सरकारकडून कोणतेही पत्र ब्रुक फार्माला दिले गेलेले नाही, अशी माहिती प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्रुक फार्मा कंपनीमार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा महाराष्ट्रासाठी करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका संदिग्ध आहे. औषध विक्रेत्यांकडे रेमडेसिव्हीर साठा उपलब्ध नाही. प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यामार्फत जे शासनाचे पत्र आमदारांना पाठवले गेले ते आमदारांची दिशाभूल आहे, तुमचा खोटेपणा आहे की नाकर्तेपणा याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊन ९६५ रुपयाला मिळणारे औषध आज सामान्य जनतेला १५०० ते १६०० रुपयात विकले जात आहे. हा काळाबाजार राज्य सरकार आणि महानगरपलिकेच्या संमतीने होत आहे, यावर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली.
तसेच पुढे राज्यात परिस्थिती सुधारायची असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोरोना व्यवस्थापन समिती स्थापन करावी, अशी महत्त्वाची मागणी यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी केली. भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता सरकारबरोबर या समितीत असेल. माझ्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, हीच विनंती करतो, असे प्रसाद लाड म्हणाले.