सा. ‘विवेक’ संचलित ‘विवेक साहित्य मंच’च्या वतीने शरणकुमार लिंबाळे यांची मुलाखत डॉ. अर्चना कुरतडकर यांनी नुकतीच घेतली. शरणकुमार लिंबाळे यांनी आतापर्यंत आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार हाताळले असून, समीक्षा आणि संपादनही केले आहे. अन्य प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले असून, ‘सनातन’ ही त्यांची तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीला मानाचा ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ नुकताच प्राप्त झाला.
“सुरुवातीच्या काळात मी माझ्या लेखनातून नकार, विद्रोहाची मांडणी केली आहे. पण, आता काळ बदलला असून ‘शिवीची ओवी’ होण्याचा काळ संपला आहे. आजच्या काळात समतोल विचाराने जगावे, लिहावे लागेल. समन्वयाची भूमिका घ्यावी लागेल. सर्व समाज जागा झाला आहे. त्यामुळे लेखकाची जबाबदारी वाढली आहे. दलित, पीडित, वंचितांमध्ये परिवर्तन घडवून आणायचे आहे. हे काम करताना आपली संवेदनशीलता जबाबदारीने व्यक्त करण्याचे भानही जपता आले पाहिजे. आपण सामाजिक बंडखोरी करत असलो तरी तिचे स्वरूप समतेच्या स्थापनेसाठी असावे,” असे उद्गार ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ विजेते लेखक शरणकुमार लिंबाळे यांनी काढले. सा. ‘विवेक’ संचलित ‘विवेक साहित्य मंच’च्या वतीने शरणकुमार लिंबाळे यांची मुलाखत डॉ. अर्चना कुरतडकर यांनी नुकतीच घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
शरणकुमार लिंबाळे यांनी आतापर्यंत आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार हाताळले असून, समीक्षा आणि संपादनही केले आहे. अन्य प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले असून, ‘सनातन’ ही त्यांची तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीला मानाचा ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ नुकताच प्राप्त झाला. या कादंबरीच्या लेखनामागची प्रेरणा, कथानक आणि लेखनशैली इत्यादी विषयांवरील प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीत शरणकुमार लिंबाळे यांनी अगदी मनमोकळेपणाने दिली. आपल्या कादंबरी लेखनाची प्रेरणा सांगताना ते म्हणाले की, “महार समाजावर कादंबरीतून इतिहास मांडावा. ज्यांच्या शौर्याची दखल इतिहासाने घेतली नाही, त्या समाजाला नायकाच्या रूपात साकार करावे, असे मला वाटत होते. अभ्यास करताना असे लक्षात आले की, वनवासी समाजाचीही नोंद इतिहासात नाही. मुघल आणि ब्रिटिश कालखंडातील सामाजिक संघर्ष आणि सामाजिक ताणाबाणा मांडताना समाजालाच नायक म्हणून साकार करावे, असे मला वाटत होते. ‘सनातन’ या कादंबरीतून मला मांडता आले.”
‘सनातन’ कादंबरीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे लेखकाचा अलिप्तपणा. या अलिप्तपणे लेखनाचे कारण समजावून सांगताना शरणकुमार लिंबाळे म्हणतात की, “लेखकाने वंचित, पीडितांची बाजू घेतली पाहिजे. त्यांच्या न्यायासाठी आग्रह धरला पाहिजे. ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे माझे आणि माझ्यासारख्या अनेकांचे मत आहे. पण, मी ‘सनातन’च्या माध्यमातून इतिहास लिहित होतो. इतिहास हा नेहमी तटस्थपणे बघावा लागतो. त्यात आपल्याला हवी तशी मोडतोड करता येत नाही. म्हणून मी माझ्या कादंबरीचा पट अलिप्तपणे मांडला आहे. कुठल्याही एका बाजूची भलावण केली नाही. सामाजिक वातावरणाचा परिचय करून दिला आहे. दलित, वनवासींची इतिहासात नोंद नाही. पण, पुराणकथा, रूपककथा, लोककथा यांच्या माध्यमातून महार आणि वनवासी समाजाविषयी मौखिक स्वरूपात खूप माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे मी माझ्या कादंबरीची रचना केली आहे. माझी कादंबरी ऐतिहासिक आहे. त्यामुळे मी ती तटस्थपणे लिहिली आहे. दलितांच्या वेदना, दुःख आणि सामाजिक वातावरण सर्वांना कळावे याच भूमिकेतून मी लिखाण केले आहे.”
‘सनातन’ कादंबरी सुमारे चार-पाचशे वर्षांचा कालखंड आपल्या समोर मांडते. या दीर्घकालखंडावर लिहिताना निवेदन आणि संवाद दोन्हीही प्रमाणभाषेत आहेत. प्रमाणभाषेच्या आग्रहाविषयी शरणकुमार लिंबाळे म्हणतात की, “मी स्वतः जेव्हा लिहू लागलो, तेव्हा आम्ही नकाराचा आग्रह धरला होता. प्रमाणभाषा आपली नाही, आपण आपल्या बोलीभाषेतच लिहिले पाहिजे, असा आम्ही आग्रह धरला होता. मी, ‘अक्करमाशी’ बोलीभाषेत लिहिले. ते अनुवाद होताना खूप अडचणी जाणवल्या होता. त्यानंतर मी प्रमाणभाषेत लिहू लागलो. प्रमाणभाषेत लिहिलेले जागतिक पातळीवर लवकर पोहोचते, असा माझा विश्वास आहे. म्हणून मी ‘सनातन’ कादंबरी लिहिताना दीर्घ कालपट असूनही प्रमाणभाषा वापरली आहे.”
‘सनातन’ कादंबरीत मुघल आणि ब्रिटिश राजवटीत झालेल्या धर्मांतराचे वर्णन केलेले आहे. धर्मांतरित झालेल्या समूहाची काय स्थिती झाली, यावर लेखक भाष्य करतो. याविषयी आपली भूमिका मांडताना शरणकुमार लिंबाळे म्हणतात की, “धर्मांतराने दलितांचे प्रश्न सुटतात असे म्हटले जाते. मात्र, वास्तवात ते तसे नाही. आपण धर्मांतराचा इतिहास समजून घेतला पाहिजे. परकीय आक्रमक या देशात आले. त्यांनी छळाबळाने धर्मांतर केले. जेते म्हणून त्यांनी धर्मांतरे केली. या धर्मांतरामध्ये केवळ दलितच नाही, तर समाजातील सर्वच घटक बळी पडले. धर्मांतराने भेदभाव संपला नाही. अस्पृश्यता संपली नाही. शोषण संपले नाही. जोपर्यंत जात संपत नाही, तोपर्यंत दलितांच्या समस्या आणि प्रश्न संपणार नाहीत. धर्मांतर हा समस्येवर उपाय नाही. हे मी ‘सनातन’ कादंबरीतून मांडले आहे.”
‘सनातन’ कादंबरीत एका प्रसंगात लेखक म्हणतो, “लोक राजे झाले पाहिजेत, याचा अर्थ लोकांना राज्यघटनेप्रमाणे जगता आले पाहिजे.” राज्यघटनेकडे अंगुलीनिर्देश करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना शरणकुमार लिंबाळे म्हणतात की, “ ‘सनातन’ कादंबरीचा कालखंड हा स्वातंत्र्यपूर्व आहे. त्यावेळी राजेशाही होती. राजा म्हणेल तो कायदा, राजा देईल तो न्याय, अशी स्थिती होती. सर्वसामान्य माणसाला कोणतीही दाद-फिर्याद करता येत नसे. या पार्श्वभूमीवर माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा अनुभव घेता यावा. हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आपल्या राज्यघटनेतून सर्वसामान्य माणसाच्या हक्काची पाठराखण केली आहे. हे लक्षात घेऊन मी अशी भविष्यवेधी भूमिका घेतली आहे.” शरणकुमार लिंबाळे केवळ सिद्धहस्त लेखक नाहीत. ‘दलित पँथर’च्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे ते आपल्या लिखाणातून कार्यकारणभाव व्यक्त करताना समूहभान प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतात. या मुलाखतीतूनही ‘सनातन’ कादंबरीचे अंतरंग उलघडताना सकारात्मक, समन्वयवादी भूमिकेतून कालसुसंगत विचार मांडला आहे.
- रवींद्र गोळे