पूनावालांची हात जोडून विनंती ; कच्च्या मालावरील निर्बंध हटवा !

    16-Apr-2021
Total Views |

adar poonawala_1 &nb


कोरोनावरील लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी


पुणे :
देशभरात कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. एकीकडे देशात कोरोनावरील लसीकरण सुरु झाले आहे मात्र आता लसीचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटच्यावतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना लस निर्मितीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवण्याची विनंती करणारे ट्विट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीइओ आदर पुनावाला यांनी केले आहे.





या ट्विटमध्ये पुनावाला म्हणतात,"अमेरिकेचे अध्यक्ष महोदय, जर आपल्याला या विषाणूचा सामना करण्यासाठी संघटित व्हायचे असेल तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावरील निर्बंध काढून टाकावे जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढविले जाईल. आपल्या प्रशासनाकडे याची संपूर्ण माहिती आहे." अशी विनंती आदर पुनावाला यांनी जो बायडन यांच्याकडे केली आहे.


सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशिल्ट लस बनवित आहे


ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अस्ट्रेझेनेका यांनी विकसित केलेल्या कोरोना लस कोविशिल्टचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट घेत आहे. कोविशिल्टच्या आपत्कालीन वापरास देशात प्रथम मान्यता देण्यात आली. तसेच ही लस अनेक देशांत निर्यात केली जात आहे. सिरम सद्यस्थितीत जगातील सर्वाधिक प्रमाणात लस उत्पादन घेत आहे . अलीकडेच काही राज्यांमध्ये कोरोना लस तुटवडा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोरोना लसीचा तुटवडा असल्याची तक्रार महाराष्ट्र, पंजाब, राजस्थानसह अनेक देशांनी केली आहे. कर्नाटक, ओडिशा आणि केरळमधील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग कमी होत असल्याचे म्हटले आहे. तथापि, केंद्राने असे स्पष्टीकरण दिले आहे की लसींची कमतरता नाही.