'ससून'मध्ये डॉक्टरांच्या संपाला सरकारच कारणीभूत!

    16-Apr-2021
Total Views |

sasoon _1  H x



पुणे :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे वाढत असलेली रूग्ण संख्या तर दुसरीकडे कमी पडत असलेली आरोग्य यंत्रणा यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या वर्षभरापासून ससूनमध्ये कोविड आणि नॉन कोविड रूग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आज रात्रीपासून संपावर जाऊ, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.


तातडीने बेड उपलब्ध करून देऊन मनुष्यबळ वाढवावे अशी प्रमुख मागणी या डॉक्टरांनी केली आहे. याचबरोबर मनुष्यबळ न वाढविताच ससून रुग्णालयात अचानक कोरोनाचे ३०० बेड वाढविण्यचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने शुक्रवारपासून तातडीच्या नसलेल्या वैद्यकीय सेवांचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे.



यावेळी काही प्रमुख मागण्या करताना ते म्हणाले, बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ, साधनसामुग्री प्रशासनाकडे आहेत का? तसेच दुसऱ्या लाटेची कल्पना डिसेंबर २०२० मध्येच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही. कोव्हिड ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्सला क्वारंटाईन किंवा आयसोलेशन ची सुविधा नाही त्यामुळे आमचे ८० निवासी डॉक्टर्स एका महिन्यात कोरोनाने बाधित झाले.आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून त्यावर कोणतेही उपाय केले गेले नाहीत असेही निवासी डॉक्टरांनी सांगितले.



मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आम्ही रुग्णसेवेचे काम करीत आहोत. सध्या ससूनमध्ये ५५० कोरोनाचे आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढविले तर किमान १०० डॉक्टरांची गरज लागणार आहे. तरच रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत कालच बैठक झाली. त्यांच्यापुढेही आम्ही आमची मागणी मांडली आहे.


आमची मनुष्यबळ वाढविण्याची मागणी आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कोरोना वार्ड, कॅॅज्युलिटी, आयसीयू, लेबर रूम, सर्व प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सेवा देणे बंद केले जाणार आहे.