'कोरोना मृतांच्या आकडेवारीत ठाकरे सरकारची लपवाछपवी'

    15-Apr-2021
Total Views |

uddhav thackeray_1 &



मुंबई :
राज्यभरात कोरोना रुग्णाच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसून येते आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.



व्हिडीओ ट्विट करत सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारने आता कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत लपवा छपवी सुरु केली आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात १ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाले. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे, परंतू स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार ३०९ झाले असल्याची नोंद आहे." असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.



याविषयी अधिकची माहिती अशी की, १ जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे २९५ जणांचा बळी गेला असताना पालिकेने केवळ ५२ मृत्यूंची नोंद केली. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत पालिकेने २४३ करोनाबळी लपवल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगितले जात आहे. यावर, शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद पालिकेच्या दैनंदिन अहवालात केली जात नव्हती. या अहवालात केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद होते. मात्र, यापुढे खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही अहवालात करण्यात येईल, असे स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिली आहे.