मुंबई - भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माझी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंगळवारी रात्री लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना शिवभोजन थाळी मोफत मिळणार असल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राणे यांनी टिकास्त्र सोडलं आहे.
निलेश राणे यांनी टि्व्ट करुन म्हटलं आहे की, "शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार." यावेळी त्यांनी पार्सल सेवेवर देखील टीका केली. "घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही", असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी शिवभोजन थाळीचे केंद्र सुरू केली. या केंद्रामध्ये १० रुपयांमध्ये गरजूंना जेवण मिळत होते. गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊननंतर या थाळीची किमंत कमी करुन ती ५ रुपये करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या मिनी लाॅकडाऊनमध्ये ही थाळी मोफत देण्यात येणार आहे. यामाध्यमातून आपण गरजूंच्या रोटीचा प्रश्न सोडवतं असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंगळवारच्या भाषणात म्हटले होते.