देशाचे बाबासाहेब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2021   
Total Views |

dr ambedkar_1  


डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे कार्य म्हणजे मानवी कल्याणाच्या उत्थानाचे अमूल्य सत्य स्वरूप होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कुणा एका जातीशी किंवा समाजाशी बांधिल नाही, तर हे नाव आहे अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठणार्‍या सर्वच सत्शील मानवजातीचे.



बाबांनी लौकिक अर्थाने देह सोडला असला, तरी त्यांचे विचार आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सूर्य आजही जातीअंताची लढाई लढणार्‍या आणि मानवी मूल्य जपणार्‍या प्रत्येक व्यक्तीत प्रज्वलित आहे. बाबासाहेबांचे विचार जगत समाजासाठी आणि देशासाठीही कार्य करणारे अनेक जण मला भेटत असतात. बाबासाहेबांबद्दल विचार करणार्‍या लोकांचे वर्गीकरण करताना जाणवत राहते की, एक गट असे मानतो की, बाबासाहेब फक्तआमचेच! पण, हे खरे नाही. या देशात संविधानामुळे हक्क आणि अधिकार मिळवलेल्या सार्‍यांचेच बाबासाहेब आहेत. संविधानातून भारतीय जनतेबद्दलचे बाबासाहेबांचे प्रेम आणि भारत या जन्मभूमीबद्दलची निष्ठा ठायीठायी दिसते. महत्प्रयासांनी त्यांनी घेतलेले शिक्षण किंवा विविध विषयांवरील त्यांची पुस्तके पाहिली की जाणवते, ते बाबासाहेबांचे ज्ञान.

समाजाविषयी तळमळ, देशाविषयी कृतज्ञता. तसे पाहिले तर बाबासाहेबांनी कायद्याचा अर्थ मांडत संविधानाची निर्मिती केली. याचा संदर्भ सध्याच्या अखंडित भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण, या देशाला चालवणारे संविधान आमच्या बाबासाहेबांनी लिहिले, असे मानून आज देशातील बहुसंख्य समाज संविधानाच्या माध्यमातून देशाशी एकरूप झालेला आहे. आता कुणाला ही अतिशयोक्ती वाटू शकते. पण, सत्य हेच आहे. आजही विद्रोही आणि देशविघातक शक्ती बहुसंख्य असलेला आणि कधीकाळी अस्पृश्यतेचे चटके सोसलेल्या समाजाला चिथवत असतात की, ”हा देश तुमचा नाही, हे कायदे, हे राज्य सरकार, हे केंद्र सरकार तुमचे नाही.”
अशावेळी या देशाला स्थिर राखणारे संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. मग संविधाननिर्मित कायदे, संविधाननिर्मित केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आमच्या बाबासाहेबांच्या प्रेरणेचेच आहेत,असे मांडणारे लोकही मी पाहिले आहेत. ते म्हणतात, ‘कायदा भीमाचा, देश भीमाचा.’ असो, बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबरोबरच मला भावते ते बाबासाहेबांचे माता रमाईबद्दलचे प्रेम आणि आदरयुक्त भावना. बॅरिस्टर झाले, लोकनेते झाले, पण त्यांनी रमाईला कधीही अंतर दिले नाही. तिच्या त्यागाची आणि तिच्या विश्वासाची नेहमीच कदर केली. त्यांनी आपले महत्त्वाचे पुस्तक ‘रमू’ म्हणत रमाईला समर्पित केले. आज वस्तीपातळीवर भारतीय संस्कृतीबद्दल आणि भारतीय स्त्री भूमिकेबद्दल सांगितले जाते की, आपल्या देशात संस्कृतीने आणि समाजाने स्त्रियांना गुलाम बनवले. तोडा ते पाश, कुटुंब मुक्त व्हा. पण त्यांचे कुणीही ऐकत नाही. उलट वस्तीपातळीवरच्या आयाबाया सौभाग्याचे लेणे लेऊन गुणगुणत असतात. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं... ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ म्हणत समाज आणि देशाला, संस्कृतीला आपल्या विचारांनी, कृर्तृत्वाने एकसंध ठेवणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन...
@@AUTHORINFO_V1@@