'महिलांनी उपचारासाठी जावं कि घरीच मरावं' ; चित्रा वाघ आक्रमक

    14-Apr-2021
Total Views |

chitra wagh_1  


अंधेरीतील हॉटेलमध्ये विलगीकरणात असलेल्या महिलेसोबत छेडछाड झाल्याचा संतापजनक प्रकार



मुंबई :
मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात असलेल्या महिलेसोबत छेडछाड झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोग्यसेवक सरफराज मोहम्मद खान या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं ? याचं उत्तर सरकारने द्यावं, असा सवाल महाविकास आघाडी सरकारला केला आहे.


वाढत्या कोरोनामुळे मुंबईत शासकीय सोबतच हॉटेल्स मध्येही क्वारंटाईनसेंटर्स उभारले आहेत. अंधेरीतील अशाच क्वारंटाईन हॉटेलमध्ये तिथल्याच आरोग्यसेवकाने कोरोनाग्रस्त महिलेची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पनवेलच्या कामोठे येथील रहिवासी असलेली महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ही महिला अंधेरीतील एका हॉटेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाली होती. क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून घरी परतण्याच्या वेळी तिच्यासोबत आरोग्यसेवक असलेल्या सरफराज मोहम्मद खान या व्यक्तीने विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपी सरफराज मोहम्मद खान याच्या विरोधात अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


याघटनेवर संताप व्यक्त करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यसरकारवर जोरदार निशाणा साधलं आहे.दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना त्या म्हणाल्या,“मागील वर्षीपासुन आतापर्यंत राज्यातील कोविड सेंटरमध्ये विनयभंग़ाच्या १४ तर बलात्काराच्या ४ घटना घडल्या आहेत, जी बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार होणं हे संबंधित प्रशासकीय अधिकार्यांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणाचे लक्षण आहे. प्रत्येक वेळी या प्रशासकीय अधिकारी वर्गाला पाठिशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. अशा प्रकरणात जर एकदा कारवाई झाली तर त्यातून नक्कीच एक चांगला संदेश समाजात जाईल.अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी संबंधित आरोपींसोबतच जबाबदार प्रशासकीय अधिकार्यांवर देखील तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे."असेही त्या म्हणाल्या.
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये अनेक हॉटेल्स, शासनाच्या इमारतींचाही समावेश आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध भागांत अशा प्रकारे कोरोना बाधित महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.