पुण्यात रुग्णांवर उपचार करतोय बोगस 'डॉ. महमूद शेख'!

    13-Apr-2021
Total Views |

dor _1  H x W:


पुणे : राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता देवदूत मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची बाजी लावून परिस्थिती हाताळली आहे. मात्र, अशातच काही समाजकंटक या परिस्थितीचा फायदा घेत लोकांना लुबाडण्याची कामे करत आहेत. पुण्यात शिरूर तालुक्यात कारेगाव भागात एका बोगस डॉक्टराचा खेळ पोलीसांनी उघड केला आहे. बारावी पास असलेल्या या बोगस डॉक्टराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
 
 
 
या बोगस डॉक्टराचे नाव महमूद शेख असे आहे. तो कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी रुग्णालय चालवत होता. स्वत:चे नाव तो डॉ. महेश पाटील, असे सांगत होता. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला त्याच्याबद्दल आलेल्या संशयानंतर केलेल्या कारवाईत त्याचा पर्दाफार्श झाला. बोगस डॉक्टर केवळ बारावीच पास असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन ते तीन वर्षांपासून हे रुग्णालय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
 
 
रुग्णाच्या नातेवाईकांनी दिला बेदम चोप
 
 
२२ कोरोनाबाधित रुग्णांवर हा डॉक्टर उपचार करत होता. पोलीसांनी सोमवारी १२ एप्रिल रोजी रुग्णालयात छापा टाकला. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याची बोबडी वळली. हा प्रकार उघड झाल्यावर नातेवाईकांना प्रचंड मोठा धक्काबसला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे. पोलिसांच्या मध्यस्तीने भांडण सोडवण्यात आलं. बोगस डॉक्टरवर रांजणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या सर्व कोरोनाबाधितांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे.
 
 
पाटील आडनाव वापरून घरच्यांशी हिंदीत बोलायचा!
 
स्वतःला महेश पाटील, असे म्हणवणारा हा डॉक्टर दोन वर्षांपासून लोकांना लुबाडत होता. कोरोनाची साथ वाढू लागल्यावर रुग्णही वाढू लागले. या महमूद शेखला घरातून फोन येत त्यावेळी त्यांच्याशी हिंदीत बोलायचा. बोलताना फूफा, अम्मी, अब्बू, असे उच्चार करत असल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांना संशय येऊ लागला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयावर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे.