मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आतापर्यंत तब्बल वाझेविरोधातील कारवाईत आठशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. निलंबित अधिकारी सचिन वाझेविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत चाळीसहून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
आठ जणांना या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तपासातून एनआयएने वाझेंविरोधात ठोस पुरावे गोळा करत असल्याचे समजत आहे. या प्रकरणात आणखी कोणती बडी नावे येणार का याकडे एनआयएचे लक्ष्य आहे.
रियाजुद्दीन काझीचीही चौकशी
नुकतेच निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझी यांचीही चौकशी एनआयए करत आहे. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण गुन्ह्यामागचा हेतू काय हे एनआयएचे अधिकारी समजून घेत आहेत. काझींच्या चौकशीतून समोर येणाऱ्या गोष्टींची पडताळणी एनआयएचे अधिकारी करत आहेत.