भाजपने प.बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे का ?
कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी लादली आहे. याविरोधात दीदी स्वतः महात्मा गांधींच्या पुतळ्यापुढे आंदोलनासाठी बसल्या आहेत. त्यांनी केलेल्या मुस्लीम मतदारांसंदर्भातील वक्तव्यामुळे त्यांच्यावर बंदी आली आहे. मात्र, याला त्यांनी मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार यांनीही ममतांना पाठींबा दिला आहे. मात्र, प्रश्न असा पडतो की, बंगालमध्ये खरंच लोकशाही धोक्यात आली आहे का ? आज हे बंगाली बाबू, लेखक ममतांची बाजू घेतायतं ते भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा कुठे होती लोकशाही ?
देशावर कोरोनाचे संकट असले तरीही निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक सुरू आहे. सध्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही कारकिर्द पणाला लागली आहे. भाजपने आपला कस लावत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. केंद्रातील महत्वाचे भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीसाठी उतरले याला काय कारण असावे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या निवडणूकीत ममतांवर शरसंधान साधण्याची एकही वेळ सोडलेली नाही. भाजपला ही निवडणूक इतकी का महत्वाची वाटते हा देखील एक प्रश्न आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या गेल्या काही वर्षांच्या इतिहासात डोकावून पाहीले तर याचे उत्तर सहज मिळते.
ममता बॅनर्जी या २ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा घणाघात भाजप नेते अमित शाह यांनी केला आहे. तृणमुल काँग्रेस आपल्या जागा गमावत असल्याचे पाहूनच ममता बॅनर्जी या केंद्र सरकारवर बेछुट आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याउलट ममतांनी मोदी-शाह-नड्डा या बड्या नेत्यांचा उल्लेख करत असताना बाहेरचे (बंगालचे भूमिपुत्र नाहीत) असा उल्लेख केला आहे. मोदींनी यालाही उत्तर देत आम्ही तुम्हाला बाहेरचे वाटतो. मात्र, रोहिंग्या, बांग्लादेशी घुसखोर तुम्हाला जवळचे वाटतात का, असाही प्रश्न विचारला आहे.
गोष्ट आहे थोडी मागची निवडणूकीच्या रणधुमाळीला काहीसा अवकाश होता. भाजपचा युवा चेहरा असलेले खासदार तेजस्वी सुर्या यांनी बंगालमध्ये रॅली काढली होती. मात्र, भाजप कार्यकर्त्यांवर त्यावेळेस रॉकेलच्या गोळ्यांचा वर्षाव केला होता. जाळपोळ करण्यात आली होती. पोलीसांनी बेछुटपणे भाजप कार्यकर्त्यांवर हात टाकला होता. भाजपने थेट तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले होते. तृणमुलच्या गुंडांनीच आमच्यावर हल्लाबोल केला, असा आरोप करत ममतांच्या राज्याला फॅसिस्टवाद म्हटले होते.
भाजपच्या रॅलीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर दोनवेळा हल्ले झाले आहेत. १० डिसेंबर २०२० रोजी नड्डा यांच्या वाहनावर जोरदार हल्ला चढवण्यात आला होता. नड्डा यांचा ताफा जात असताना त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. वाहनाच्या काचेवर दगडफेक करण्यात आली होती. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यांच्या मोटारीच्या काचांचा चुराडा झाला होता. पुढे पक्षाच्या कार्यालयात नड्डा गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी २०० लोक लाठ्या काठ्या घेऊन जमले होते. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आली. तसेच वाहनांवर चढून नासधुस करण्यात आली.
आत्तापर्यंत भाजपच्या १३० कार्यकर्त्यांची हत्या झाली
गृहमंत्री अमित शाह यांनी एका रॅलीत ममतांवर हल्लाबोल चढवत असताना एक आठवण करून दिली. आत्तापर्यंत ममताशासित बंगालमध्ये भाजपच्या १३० कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यावर त्यांचे दोषी जे कुणी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. या हत्या प्रकरणात एकावरही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
ममतांची राजकीय कारकिर्द पणाला
ममता बॅनर्जी यांनी दहा वर्षांपूर्वी ज्या प्रकारे कम्युनिस्टांचे सरकार उलथवून लावत एका नव्या अध्यायाला सुरुवात केली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात गेल्या १० वर्षात बंगालचे राजकारण हे रक्तरंजित बनत चालले. त्याबद्दल ममता काहीच बोलत नाहीत. ममतांना 'जय श्री राम' या नाऱ्याचाही तिटकारा आहे. 'जय श्री राम' म्हणणाऱ्यांना ममतांनी अक्षरशः दमदाटी केली. मात्र, काही काळानंतर तिथल्या हिंदूंचा आक्रमकपणा पाहून त्या मवाळ झाल्या. दुर्गापूजा आदी सणांमध्ये सहभागी होऊ लागल्या. येत्या २ मे रोजी बंगालची जनता कोणाच्या पारड्यात मते टाकणार हे कळेलच परंतू, भाजपने ज्या प्रमाणात बंगालच्या निवडणूकीत लक्ष घातलं आहे, त्यावरून ममतांची संपूर्ण राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे.
भाजपसाठी बंगाल प्रतिष्ठेचा
ज्या राज्यात किड्यामुंग्यांप्रमाणे कार्यकर्त्यांची हत्या होत असेल. जिथे पक्षाच्या बड्या नेत्यांवर दिवसाढवळ्या हल्ले केले जातात. तेही स्वामी विवेकानंदांच्या भूमीत ही गोष्ट जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या वर्मी लागणारी ही गोष्ट असल्याने भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. येत्या काळात बंगालची जनता कुणाला कौल देते हे २ मे नंतर समजणार आहे.