गृहिणीसम जबाबदारी पेलणारी सभापती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021   
Total Views |

Suvarna Jagtap_1 &nb
 
 
‘गृहकर्तव्यदक्षता’ हा तर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य गुण. अशी सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेचा कारभार हाती घेते, तेव्हा घडणारे बदल हे निश्चितच नेत्रदीपक असेच असतात. याचीच अनुभूती येते, ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत. कारण, येथील कारभार आहे अशाच एका कर्तव्यदक्ष महिला सभापतीच्या हाती.सुवर्णा जगताप त्यांचे नाव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
सुवर्णा जगताप लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडत आहेत. ७२ वर्षांच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सुवर्णा जगताप यांच्या रूपाने बाजार समितीत सभापतिपदी महिला विराजमान झाली आहे, हे विशेष. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समितीचा लौकिक आहे. अशा या बाजार समितीच्या कारभाराची धुरा दि. २९ ऑगस्ट, २०१९ मध्ये सुवर्णा जगताप यांनी सभापतिपदाच्या रूपाने हाती घेतली. बाजार समिती म्हणजे शेतकरी, व्यापारी अशा सर्वच पुरुष मंडळींचा वावर असणारे ठिकाण. अशा पुरुषसत्ताक संस्थेत महिला सभापती म्हणून कार्य करताना निश्चितच काही आव्हाने सुवर्णा जगताप यांच्या समोर उभी ठाकली. मात्र, स्वतःच्या व्यवसायात निभावलेली प्रशासकीय कार्याच्या अनुभवाची शिदोरी,कर्मचारीवर्ग व्यवस्थापनाची हातोटी यांचा अनुभव जगताप यांना लासलगाव बाजार समितीत कार्य करताना कामी आला. कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजार समितीत ‘पेपरलेस’ कामकाजाच्या माध्यमातून बाजार समितीच्या नावलौकिकात भर पाडण्याचे कार्य हाती घेण्यास त्यांचे प्राधान्य असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
 
 
नियमितपणे चार कोटी रुपयांची उलाढाल ही लासलगाव बाजार समितीत कांदा, धान्य, इतर भाजीपाला यांच्या रूपाने होत असते. अशा या कृषी उत्पन्न बाजार समितीत पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा, यासाठी सुवर्णा जगताप या विशेषत्वाने लक्ष ठेवून असतात. शेतकरी हित लक्षात घेऊन जमापावतीची पद्धत त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद केली. यासाठी केंद्र सरकारशी वारंवार पत्रव्यवहार करणे, केंद्र सरकारला शेतकरीहिताचे नेमकेपण लक्षात आणून देणे, यासाठी सुवर्णा जगताप या कायमच प्रयत्नशील असतात. त्यासाठी ‘पीएमओ’सह संबंधित मंत्रालयांशी पत्रव्यवहार करणे, संसदेत संबंधित प्रश्नांवर अभ्यासपूर्णरीत्या लक्ष वेधले जावे, यासाठी खासदारांशी संपर्क साधून त्यांना विषयाचे महत्त्व पटवून देणे, त्याची नेमकी मांडणी करणे आदी कार्य जगताप यांच्या माध्यमातून होत आहे. या कामाची पावती म्हणून की काय, “ताई, यापूर्वी असे काही होत नव्हते. मात्र, आता होत आहे. हे सगळे तर आमच्यासाठी नवीनच आहे. जे होत आहे ते खरंच खूप चांगले आहे,” अशा जगताप यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या प्रतिक्रिया बाजार समितीच्या आवारात आपल्या सहज कानावर पडतात. आज शेतकरीहित डोळ्यांसमोर ठेवून शेतमाल विकल्यानंतर २४ तासांत ‘एनईएफटी’द्वारे शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे चित्र आपणास येथे पाहावयास मिळते. ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी बाजार समितीच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे.
 
 
केंद्र शासनाच्या ‘महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास’ प्रकल्पांतर्गत संगणीकृत लिलाव पद्धतीसाठी राज्यात लासलगाव बाजार समितीची निवड ही अभिमानाची बाब आहे. जगताप या सभापतिपदी विराजमान होण्यापूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळावर होत्या. त्यावेळचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असताना शेतकर्‍यांना भविष्यात कोणकोणत्या अडचणी भेडसावू शकतात, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे गृहिणीची जशी घरातीलप्रत्येक बाबींत दूरदृष्टी असते, त्याचप्रमाणे बाजार समिती आवार हे आपले घर आहे आणि तेथील प्रत्येक घटक हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे, या भावनेतून जगताप यांनी बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम, शौचालये, शेतकरी विश्रामगृह, शेतकर्‍यांना उपयोगी असलेले पोकलेन मशीन ‘डिझेल टाका व वापरा’ या तत्त्वावर उपलब्ध करून दिले आहे. माती व पाणीपरीक्षण केंद्राची उभारणी बाजार समितीच्या आवारात आगामी काळात करण्यात येणार असून लासलगाव, निफाड-विंचूर बाजार उपसमिती आवरात शेतकर्‍यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
 
लासलगाव हे प्रामुख्याने कांद्याची मोठी बाजारपेठ. या ठिकाणी अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत असतात. मात्र, कांद्याचे भाव आणि निर्यातीसंदर्भात धोरण निश्चित नसते. त्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. शेतमालास योग्य बाजारभाव न मिळणे, शेतमाल विक्री व्यवस्थेतील अडचणी या बाजार समिती आवरात घडणार्‍या नियमित क्रिया आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासाठी शेतकरी वर्गाचे नेमके म्हणणे काय आहे व शासकीय धोरण हे ग्राहककेंद्री असण्याबरोबरच शेतकरीहिताचे कसे असावे, याबाबत जगताप यांचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ असल्याचे आपणास जाणवतात. मध्यंतरी कांदाभावात वाढ झाली असता शेतकरी फायद्यात आहे. मात्र, ग्राहक संकटात आहे, अशी चर्चा होती. याबाबत मत मांडताना जगताप सांगतात की, “कांद्याला जरी भाव असला तरी, त्यावेळी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांमुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पीक कमी होते. त्यामुळे भावात जरी वृद्धी दिसून येत असली तरी, पीक कमी आल्याने शेतकरी फार फायद्यात वगैरे होता, असे समजणे चुकीचे आहे.”
 
 
बाजार समिती आवार म्हणजे कचरा आणि शेतमालाची दुर्गंधी यांचे आगार अशी स्थिती. मात्र, लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती याला अपवाद म्हणावी. हे येथे पाऊल टाकताक्षणीच जाणवते. सामान्यपणे असणारा कचरा येथे जरी दिसत असला तरी, तो स्वच्छ केला जातो. कृषिमालाची नासाडी होताना येथे दिसून येत नाही, हे विशेष. बाजार समितीच्या लासलगाव, विंचूर निफाड, आवारामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ मशीन बसविण्यात आले आहेत. येथे पाणी पिणार्‍या शेतकरीवर्गाला ‘आरओ’ पाण्याची सोय कोणी उपलब्ध करून दिली असे विचारले असता ते ताईंनी आणि बाजार समितीने असे सहज उत्तर आपल्याला देताना दिसून येतात. बाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर कचरा मोठ्या प्रमाणावर होतो, त्यासाठी नवीन ट्रॅक्टर ‘हायड्रोलिक ट्रॉली’च्या साहाय्याने कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजनदेखील हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात बाजार समिती आवारातील लिलाव ठप्प होतात. अशा वेळी लिलाव प्रक्रिया सुरू राहावी, यासाठी दाखल होणार्‍या ट्रॅक्टर्सच्या निवार्‍यासाठी नवीन शेडच्या कामावरही भर देण्यात येत आहे. तसेच बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न केले जातात. सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात बाजार समितीत ७६,९२,५८० क्विंटल शेतमालाची आवक झाली असून, ६,४३,५९,९१,९९७ रुपयांची उलाढाल झाली आहे.
 
 
 
जगताप या संगणक अभियंता आहेत. त्यामुळे गतिमान प्रशासन व पारदर्शक कामकाजासाठी ‘पेपरलेस’ काम करण्याकडे त्यांचा कल असल्याचे जाणवते. बाजार समिती कर्मचारीवर्गासाठी ‘बायोमेट्रिक’ पद्धती त्यांनी अमलात आणली आहे. तसेच आगामी काळात सर्व मापारी यांना ‘टॅब’ आणि कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर यासाठी त्यांनी करून हाती घेतले आहे. बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, मापारी कामगार व बाजार समितीच्या सर्व संबंधित घटकांचे सहकार्य आवश्यक असते. यासाठी या सर्व घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि वेळेत निर्णय घेणे ही जगताप यांच्या कार्याची हातोटी आहे. २०१४च्या दुष्काळाच्या वेळी लासलगाव-पिंपळगाव नजीक, शास्त्रीनगर, टाकळी (विंचूर), थेटाळे येथे पाण्याचे टँकर देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याचे स्मरण आजही नागरिकांना असल्याचे लासलगावात फेरफटका मारताना सहज जाणवते.
 
 
गृहिणीसम काळजी घेणारी आणि नियोजन करणारी महिला सभापती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस लाभली असल्याचे येथे सहज दृष्टिपथास पडते. मूलत: संगणक अभियंता असणार्‍या सुवर्णा जगताप यांचे माहेर पुण्याचे. त्यांनी संगणक अभियंताची पदवी प्राप्त केल्यावार काही काळ पुण्यात एका प्रथितयश कंपनीत नोकरीही केली. विवाहपश्चात त्या लासलगाव येथे आल्या. पुण्यासारख्या महानगरातून लासलगावसारख्या ग्रामीण भागात दाखल झालेल्या जगताप यांनी ग्रामीण भागातील जनतेचे दु:ख मनोमन जाणले व तसे कार्यदेखील केले असल्याचे त्यांच्या आजवरच्या कार्यातून दिसून येते.
 
 
 
२०१४च्या दुष्काळाच्या वेळी लासलगाव पिंपळगाव नजीक, शास्त्रीनगर टाकळी (विंचूर) थेटाळे येथे पाण्याचे टँकर देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. विटावे, तळेगाव, रोही, सोनी सांगवी, काजी सांगवी येथे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, तसेच ‘श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे दरवर्षी आठ ते दहा हजार लोकांसाठी महाप्रसाद तसेच लोकोपयोगी कामे केली आहेत त्या ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून लासलगाव परिसरातील लोकांना ‘आरो फिल्टर’ पाणी पिण्यासाठी सेवाभावी शुल्कावर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटले आहेत. लासलगाव व परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले आहे. लासलगाव व परिसरातील गरजू लोकांना वेळोवेळी वैद्यकीय मदत केली आहे. सामाजिक कर्तव्य दृष्टिकोनातून लासलगाव व परिसरात मुरुम टाकून रस्ते बनवून दिले आहेत. सामाजिक कर्तव्य या भावनेतून वेळोवेळी लोकांची आर्थिक मदत केली आहे.
 
 
तसेच त्या लासलगाव येथील ‘गणेश चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सचिव आहेत. आपले पती जि. प. सदस्य डी. के. जगताप यांच्या ‘दीप कन्स्ट्रक्शन’ व ‘ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन’, तसेच ‘ऐश्वर्या वॉश सॅडक्रेशर प्लॅट’चे काम समर्थपणे बघत आहेत. बाजार समितीचे कार्य करत असताना त्यांच्या पतीची त्यांना आजवर लाभलेली साथ आणि पती व घरातील सदस्यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास हे जगताप यांचे बलस्थान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
 
समस्या सर्वत्र असतात. मात्र, परिस्थितीचे योग्य आकलन आणि कामाचे नियोजन केल्यास त्यावर सहज मात करता येते. स्थिती कायम एकसारखी राहत नसते. मात्र, ती तशी राहू नये, यासाठी कायम प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. सातत्याने प्रयत्न करणे, समस्येचे मूळ शोधणे, पाठपुरावा करणे आणि सकारात्मक विचार करणे, यातच यशाचे गमक सामावलेले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@