समाजकार्य आणि राजकारणातील ‘वारे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021
Total Views |

Rajendra Ware_1 &nbs
 
 
 
घरात कोणताही राजकीय वारसा नसताना, वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र वारे यांनी राजकारण आणि सहकार क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. शेतकर्‍यांच्या समस्या त्यांनी अगदी जवळून पाहिल्या आणि अनुभल्याही. शेतकर्‍यांच्या याच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे काम राजेंद्र आज कसोशीने करीत आहेत. तेव्हा, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेल्या राजेंद्र वारे यांच्याविषयी कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
 
 
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या शेलारपाडा या गावात राजेंद्र यांचे बालपण गेले. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या चिरड येथील शाळेत झाले. मात्र, पुढील शिक्षणाची गावात सोय नसल्याने दररोज दहा किमींचे अंतर पायी कापून राजेंद्र यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गावात शिक्षणासाठी पोषक वातावरण नसतानाही राजेंद्र यांनी शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. कारण, गावात शैक्षणिक सुविधा नसल्या, तरी राजेंद्र यांच्याकडे शिकण्याची अपरिमित जिद्द होती. या जिद्दीच्या जोरावरच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ‘बिर्ला महाविद्यालया’तून पूर्ण केले आणि बी.कॉम झाले. त्यांचे आई-वडील शेती करीत असले, तरी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. शेती करून त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिकविले. राजेंद्र यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी. राजेंद्र यांचे दोन भाऊ आता व्यवसायात उतरले आहेत.
 
 
सध्या डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असलेल्या राजेंद्र यांच्या कुटुंबात राजकारणाशी तसा कुणाचाही फारसा संबंध नव्हता. मात्र, सामाजिक कार्याची ओढ मात्र होती. तोच समाजसेवेचा वारसा राजेंद्र यांनीही जपला. सहसा पदवी शिक्षणानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा नोकरीकडे असतो. पण, राजेंद्र यांनी नोकरीची पारंपरिक वाट न निवडता, समाजसेवेचा वसा घेतला.
 
 
 
वारे यांचे सर्व कुटुंबीय भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या संपर्कात होते. त्यांच्यामुळेच भाजपमध्ये काम करण्याची संधी वारे यांना मिळाली आणि राजेंद्र यांनी राजकारणातही पदार्पण केले. तसेच 1998 पासून राजेंद्र सहकार क्षेत्रातही कार्यरत आहेत. ब्राह्मण करवले गावात त्यांनी ‘जगन्नाथ सहकारी पतसंस्थे’ची सहकार्‍यांच्या मदतीने स्थापना केली. आज या संस्थेचा वटवृक्ष बहरला असून या पतसंस्थेच्या माध्यमातून किराणा व्यावसायिक, दुग्धव्यावसायिक अशा सर्वांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायवृद्धीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पतसंस्थेचा एकूण दहा हजार लोकांशी संपर्क असून ब्राह्मण करवले, डोंबिवली आणि मुरबाड या तीन ठिकाणी पतसंस्थेच्या शाखा आहेत. सुरुवातीच्या काळात ‘भिशी योजना’ लोकप्रिय होती. त्यावरुनच या ’भिशी योजने’ला कायदेशीर स्वरुप प्राप्त व्हावे, ही संकल्पना राजेंद्र यांना सुचली. पुढे त्या संकल्पनेतूनच ‘जगन्नाथ सहकारी पतसंस्थे’ची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. जे लोक पैशांची बचत करण्यासाठी ‘भिशी योजने’चा आधार घेत होते, त्यांची पावलं आपसुकच पतसंस्थेकडे वळली. ही मंडळी पतसंस्थेच्या माध्यमातून कायदेशीररीत्या पैशांची गुंतवणूक, बचत करू लागले. 1995 साली महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. त्यावेळी जगन्नाथ पाटील महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते. पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी राजेंद्र यांची सहकार क्षेत्राशी ओळख करुन दिली. खरंतर राजेंद्र हे जगन्नाथ पाटील यांच्याकडे नोकरीची विचारणा करण्यासाठी गेले होते. पण, सहकार क्षेत्राशी तोंडओळख झाल्यानंतर त्यांनाही हे क्षेत्र खुणावू लागले. सहकार क्षेत्रात पूर्ण जोमाने उतरण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. त्याकाळी गावाकडे फारसे सहकाराचे वातावरणही नव्हते. त्याच काळी ‘जगन्नाथ सहकारी पतसंस्थे’च्या माध्यमातून या भागात सहकाराचे पहिले पाऊल पडले. राजेंद्र यांच्या मनातील सहकारातून समाजहिताच्या विचाराला ‘जगन्नाथ सहकारी पतसंस्थे’च्या रूपाने मूर्तस्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर गावागावांत दुकानदार, मोठ्या व्यापार्‍यांना पतसंस्थेत बचत करा, पतसंस्थेतून कर्ज उपलब्ध होऊन होलसेलने माल खरेदी करा, हे समजून सांगण्यात राजेंद्र यांना यश आले. त्यांनी ही पतसंस्था केवळ स्थापनच केली नाही, तर तिच्या विकासासाठी तेवढीच पायपीटही केली. त्याचे फलित म्हणजे पतसंस्थेने आज यशाचे अनेक पल्ले गाठले आहेत.
 
 
 
तसेच जगन्नाथ पाटील यांनीही काही ठेवी पतसंस्थेसाठी मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर संस्थेचे खर्‍या अर्थाने काम सुरू झाले. सध्या राजेंद्र हे संस्थेचे सचिव म्हणून जबाबादारी सांभाळत आहेत. राजकीय क्षेत्रातही वारे यांची कारकिर्द तितकीच लोकाभिमुख राहिली. २०११ मध्ये पोसरी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते बिनविरोध निवडून आले. त्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषविले आणि त्यांची राजकारणात खर्‍या अर्थाने ‘एन्ट्री’ झाली. २०१५ मध्ये उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणूनही ते निवडून आले आणि २०२० पासून बाजार समितीच्या सभापतीपदी ते कार्यरत आहेत. बाजार समितीचा मुख्य उद्देश हा शेतकर्‍यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, हा असतो आणि तेच काम आपण करीत असल्याचे राजेंद्र सांगतात. बाजार समितीने ‘मार्केट यार्ड’साठी जागा खरेदी केली आहे. त्याठिकाणी प्रशस्त ‘मार्केट यार्ड’ उभे करण्याचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
 
 
बाजार समितीत विविध पदे भूषवित असताना, शेतकर्‍यांंच्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल, यासाठी राजेंद्र सदैव प्रयत्नशील असतात. तसेच आजवरच्या त्यांच्या राजकीय प्रवासातही त्यांना कुटुंबीयांची चांगलीच साथ लाभली. त्यांचे आई-वडील, पत्नी आणि भाऊ यांनी राजेंद्र यांना सहकार आणि राजकारणातही कायम प्रोत्साहन दिले. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, आ. किसन कथोरे, आ. गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे श्रीमलंग मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही राजेंद्र वारे सध्या काम पाहत आहेत. आपल्या राजकीय यशाचे श्रेय कार्यकर्त्यांना देताना राजेंद्र सांगतात की, “किसन भंडारी, रामदास म्हात्रे, अरूण बडेकर या भाजप कार्यकर्त्यांमुळे मी राजकारणाकडे वळलो. या कार्यकर्त्यांमुळे मी समाजकार्यातून राजकीय क्षेत्रातही आपली मोहोर उमटवू शकलो. खरंतर राजकारण हे क्षेत्रही याच मंडळींमुळे मला आवडू लागले होते.”
 
 
सहकार आणि राजकारणाबरोबच गावामध्ये सलोख्याचे वातावरण कसे कायम राहील, यासाठी राजेंद्र वारे सदैव प्रयत्नशील असतात. तसेच राजकीय क्षेत्रात राहून अधिकाधिक चांगले काम करण्याकडे कायमच त्यांचा ओढा असतो. राजेंद्र यांच्या गावात चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावात त्यांनी सरपंच पद भूषवित असताना विकासकामांना गतिमान केले. गावात अंतर्गत रस्ते तयार केले. कारण, जर रस्ते चांगले असतील, तरच त्या गावाच्या विकासात मोठा हातभार लागतो. ही दूरदृष्टी ठेवून वारे यांनी रस्त्यांच्या बांधकामाला प्राधन्य दिले. राजेंद्र यांनी प्रत्येक गावात अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने उभारली. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळवून दिला. राजेंद्र यांना स्वत:च्या शिक्षणासाठी पायपीट करावी लागली होती. तोच त्रास आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये, त्यांना चांगल्या शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, हाच राजेंद्र यांचा प्रमुख हेतू होता. त्यामुळे केवळ गावकर्‍यांचा विचार न करता, विद्यार्थ्यांचादेखील कसा सर्वांगीण विकास होईल, याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष केंद्रीत केले.
 
 
सध्याच्या ‘कोविड’काळात शेतकर्‍यांनी भाजीपाला लागवड काहीशी कमी केली. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाजार समितीतील आवक घटली आहे. मलंगगड परिसरात हवामानानुसार ज्या भाज्या पिकतात, त्या सर्व याठिकाणी शेतकरी पिकवितात. या शेतकर्‍यांनाही राजेंद्र वारे यांचा मोलाचे मार्गदर्शन लाभते. तेव्हा, सहकार, राजकारणातही विकासाचे वारे प्रवाहित करणार्‍या राजेंद्र वारे यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
 
 
यशाचा मूलमंत्र
 
 
आईवडिलांनी जे संस्कार केले, त्यामुळेच सहकार क्षेत्रात काम करू शकलो. सहकाराचे ब्रीदच आहे की ‘विना संस्कार, नही सहकार.’ या उक्तीप्रमाणे तुमच्यावर संस्कार असतील, तरच तुम्ही सहकार क्षेत्रात काम करू शकता. सहकार म्हणजे सेवाभाव. पण, आज या क्षेत्रात सेवाभाव कमी होताना दिसून येतो. म्हणूनच सहकार क्षेत्रात चांगली माणसे, चांगल्या संस्कारांत वाढलेल्या माणसांनी येणे गरजेचे आहे. तसेच चांगले संस्कार माझ्यावरही आई-वडिलांनी केले, त्यामुळेच यशोशिखर गाठता आले.
 
- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@