चीनची ‘लसवणूक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
  
 
जगभरातील इतर लसींपेक्षा चीनच्या लसी या तितक्याशा प्रभावी ठरत नसल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. त्यामुळे जगाला मदतीचा हात देण्याचा दृष्टिकोन न ठेवता, केवळ व्यापारीकरणाच्या उद्देशाने चीनने लसींच्या नावाखाली केलेली ही ‘लसवणूक’ निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल.


‘चला तो चांद तक, वरना शाम तक’ हीच चिनी मालाची जागतिक ख्याती! असा हा स्वस्तात उपलब्ध होणारा चिनी माल तरीही जागतिक बाजारपेठा व्यापून आहेच. पण, कोरोना महामारीपश्चात चिनी मालाकडे बघण्याच्या जागतिक दृष्टिकोनातही काहीसा फरक पडला. भारताबद्दलच बोलायचे झाल्यास, चीनची भारताला होणारी निर्यात १३ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. पण, जगाला कोरोनाच्या काळ्याकुट्ट अंधारात ढकलून थांबेल तो चीन कसला! कोरोनाचा उगम चीनचाच, त्यामुळे या विषाणूला रोखण्याचे तंत्रही चीनने इतर देशांपूर्वीच म्हणा अवगत केले. मग मास्क, ‘पीपीई किट’ यांच्या उत्पादनाचा वेग एकाएकी वाढला आणि जगभरातील देशांमध्ये चीनने मास्क आणि ‘पीपीई किट’चा जणू पाऊसच पाडला. पण, कमी किमतीत निकृष्ट दर्जाच्या या चिनी मास्कचीही नंतर पोलखोल झाली आणि काही देशांनी हा माल चीनला परत पाठवला, तर काहींनी त्यांची न वापरताच विल्हेवाट लावली. या सगळ्या घडामोडींनंतरही चीनने आपली लस जगाच्या गळ्यात मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तुर्की, ब्राझील, पाकिस्तानसह काही आफ्रिकन देशांना चिनी लसींचा साठा पुरवण्यात आला. परंतु, जगभरातील इतर लसींपेक्षा चीनच्या लसी या तितक्याशा प्रभावी ठरत नसल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. त्यामुळे जगाला मदतीचा हात देण्याचा दृष्टिकोन न ठेवता, केवळ व्यापारीकरणाच्या उद्देशाने चीनने लसींच्या नावाखाली केलेली ही ‘लसवणूक’ निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल.
 
 
  
चीनची सरकारी औषधनिर्माण करणारी कंपनी असलेल्या ‘सिनोवॅक’ आणि ‘सिनोफार्म’ या दोन कंपन्यांनी लसींची निर्मिती केली. २ एप्रिलपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, ३४ दशलक्ष चिनी नागरिकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर ६५ दशलक्ष नागरिकांना लसीचा एक डोस प्राप्त झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यापक लसीकरण मोहिमेबरोबरच जागतिक लसींच्या बाजारातही चीनने अपेक्षेप्रमाणे उडी घेतली. तब्बल २२ देशांना चीननिर्मित या वरील दोन्ही कंपन्यांच्या लसींची निर्यात केली गेली. पण, जागतिक पातळीवर उपलब्ध असलेल्या इतर लसींच्या तुलनेत या दोन्ही चिनी लसींच्या परिणामकारकतेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले दिसते आणि महत्त्वाचे म्हणजे, चिनी लस कार्यक्षम नाही, हे म्हणणे अमेरिका, भारत किंवा रशियाचे नाही, तर खुद्द एका महत्त्वाच्या चिनी अधिकार्‍यानेच यासंबंधी भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘चायना सेंटर्स फॉर डिसीस कंट्रोल’चे संचालक गाओ फू यांनी नुकत्याच चेंगडू येथे पार पडलेल्या परिषदेला संबोधित करताना यासंदर्भात स्पष्ट कबुलीच दिली. फू म्हणतात की, “चिनी लसींचा ‘कोविड’पासून बचावात्मक दर हा फारसा चांगला नाही. त्यामुळे आता वेगवेगळ्या लसींचा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
 
 
 
पण, यावर ‘सिनोवॅक’ या लसनिर्मिती करणार्‍या कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, लसींचा ज्यांच्यावर प्रयोग करण्यात आला, त्यांचे वय, कोरोनाचा प्रकार आणि म्हणे इतर घटकांवर लसीची परिणामकारकता अवलंबून असते. तसे कदाचित असेलही. पण, मग आपल्या देशानेच तयार केलेली लस इतर देशांनी घ्यावी, असा अट्टाहास चीनने का बरं करावा? एवढेच नाही तर चीनमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला चिनी लस टोचणे बंधनकारक करणारा निर्णयही त्याच पठडीतला! म्हणजे, एकतर घाईघाईत, पुरेसे प्रयोग न करता लसीची निर्मिती करायची आणि मग त्या असुरक्षित लसींचे दबाव आणून व्यापारीकरण करायचे, अशी ही चिनी चापलुसी!
 
 
 
 
पण, चीनची ही ‘लसवणूक’ ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनीही उघडी पाडली. संसर्गापासून बचाव करण्यासाठी कुठलीही लस ही किमान ५० टक्के सुरक्षित हवी, असा जागतिक नियम. त्यात चीनची ही लस केवळ ५०.४ टक्केच संसर्ग रोखू शकते, याउलट ‘पिफझर-बायोएनटेक’ची लस ९७ टक्के सुरक्षित असल्याचे प्रयोगाअंती समोर आले. म्हणजे चीनच्या लसी या केवळ काठावर पास झालेल्या किंवा केलेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. तेव्हा, चीनने ‘पिफझर’ आणि इतर लसी सुरक्षित नाहीत, असा वारंवार अप्रचार करण्यापेक्षा आपल्या देशातील लसींच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देणे उत्तम. कारण, चीनची ही लसींच्या नावाखाली फसवणूक आणि अडवणूक अनेकांच्या जीवावरही बेतू शकते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@