नवोदितांच्या मार्गदर्शक ‘माई’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |

Sanjivani jadhav_1 &
 
 


गेली कित्येक वर्षं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये संजीवनी जाधव-खानविलकर यांनी अनेक संस्मरणीय कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर कधी हसतहसत त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवावरून संजीवनी जाधव यांनी नवीन पिढी घडवण्याचेदेखील काम केले. त्यांच्या ३० हून अधिक वर्षांच्या कलासंपन्न अनुभवाने अनेक तरुणांना कलाक्षेत्रात योग्य मार्ग दाखवला. अशा या नवोदितांच्या मार्गदर्शक ‘माईं’चा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...

 
 
मराठी अभिनयसृष्टीतील ‘स्ट्रगल’ हा कोणालाच चुकलेला नाही. पण, त्यातून जे कलाकार तावूनसुलाखून निघाले, त्यांनी या क्षेत्रात आपल्या अभिनयातून एक कायमचा ठसा उमटवला. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे.’ परंतु, अभिनय क्षेत्रात असे चित्र अभावानेच आढळते. पण, या स्पर्धात्मक क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर खरं तर मार्गदर्शन हे मोलाचे. असेच भावी कलाकारांना मार्गदर्शनाचे बहुमूल्य कार्य करणार्‍या मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणजे संजीवनी जाधव-खानविलकर.

 
 
 
संजीवनी यांनी आपल्या आयुष्यातील ३० वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात अगदी समर्पणवृत्तीने काम केले. या प्रवासातून गाठीशी बांधलेले बरेवाईट अनुभव केवळ स्वत:पुरते मर्यादित न ठेवता, त्याचा फायदा या क्षेत्रातील पुढची पिढी उभारण्यासाठी त्यांनी केला. जे नवीन कलाकार अभिनयक्षेत्रामध्ये काही तरी करू पाहण्याचे स्वप्न उराशी घेऊन त्यांच्याजवळ येतात, त्यांना त्या कधीही निराश करत नाहीत. त्यामुळे त्यांचे सर्व शिष्य त्यांना प्रेमाने ‘माई’ म्हणूनच हाक मारतात. अशा या माईंचे ३० वर्षांच्या अभिनयक्षेत्रातील अनेक किस्से आणि ‘स्ट्रगल’ कलाकारांनाच नाही, तर समाजापेक्षा काहीतरी वेगळं करू पाहणार्‍या तरुणांनादेखील प्रेरणा देऊन जाते.



माईंचा जन्म दि. १७ जानेवारीला मुंबईतील वाडिया रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव चिपळूण असले तरी त्यांचे बालपण मुंबईतच गेले. त्यांच्या वडिलांनीदेखील अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात काम केले. त्यामुळे ‘अभिनय’ हा माईंच्या रक्तातच रुजलेला होता. माईंचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर काही कारणास्तव एक वर्ष त्यांनी गावी शिक्षण घेतले. त्यांचा अभिनयाचा प्रवास हा त्या सातवीला असताना सुरू झाला. ‘चला आळंदीला’ या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले. या नाटकात १३ वर्षीय माईंनी एका ४०-५० वर्षीय दृष्टिहीन महिलेचे पात्र साकारले होते. माईंचे वाचन आणि पाठांतर चांगले असल्यामुळे त्यांना हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. पुढे आठवीपासूनचे त्यांचे शिक्षण महात्मा फुले हायस्कूलमध्ये झाले. यावेळीही त्यांनी नाटकाची तालीम सांभाळतच अभ्यासही केला. याचदरम्यान ‘लावणीसम्राज्ञी’ माया जाधव यांच्याकडे त्यांनी नृत्यशिक्षणाचे धडेही घेतले. माया जाधव यांना त्यादरम्यान एका साहाय्यक नर्तकीची गरज होती. मग माईंनीही सलग तीन वर्षे माया जाधव यांच्यासमवेत काम करून लावणी हा नृत्यप्रकार अवगत केला.
 
 
 
 
 
माई सांगतात की, “मला लहानपणापासून कधी कलाकार व्हायचे नव्हतेच. आई नेहमी मला म्हणायची की, तू मोठी होऊन उत्तम कलाकार होणार. खरंतर मी मोठं होऊन डॉक्टर व्हावे, अशी इच्छा होती. पण, परिस्थितीमुळे माझे हे स्वप्न अपूर्णच राहिले.” माईंच्या घरामध्ये त्या मिळून एकूण चार बहिणी आणि तीन भाऊ अशी एकूण सात भावंडं. त्यांचे वडील ‘बेस्ट’मध्ये कामाला होते. नोकरी करता करता नाटकांमध्येही ते अगदी हौशीने काम करायचे. त्यावेळी त्यांना नाटकामध्ये काम करताना खूप कमी पैसे मिळायचे. त्या तुटपुंज्या पैशात या कुटुंबाचा खर्च मात्र भागत नव्हता. एकदा माईंच्या वडिलांचे मित्र भालचंद्र कान्हडे त्यांच्या घरी आले असताना, त्यांनी माईंचे वाचन घेतले. योगायोगाने माईंचे वाचन आवडल्याने कान्हडे यांनी माईंना एका नाटकामध्ये भूमिका करण्याची संधी दिली. त्या नाटकाचे कार्यक्रम गणेशोत्सव, जत्रेमध्ये करायचे आणि त्याचे पैसेही बरे मिळायचे. त्यावेळचे नाटकांचे कार्यक्रम हे रात्री १२ वाजता सुरू होत आणि पहाटे ५ वाजता संपत. त्यानंतर पुन्हा सकाळी ११ वाजता शाळेत हजर. नाटकाच्या या नादात बरेदचा झोपही पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांचा ओरडा ऐकावे लागल्याचे आजही माईंनी आठवते. पण, दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्यांना मात्र हे चक्र असेच चालू ठेवावे लागले. त्यावेळेस कसेबसे नववीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पण, दहावीत असताना त्यांनी शिक्षण सोडून नाट्यकलेला वाहून घ्यायचे ठरवले. विशेष म्हणजे, एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठातून ‘बीए’चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. तसेच कथ्थकचेही शिक्षण घेतले.
 
 
  
 
  
एका नाटकामध्ये काम करताना त्यांना मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय खानविलकर यांच्या ‘औंदा लगीन करायचं’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याचदरम्यान त्या मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकामध्येही झळकल्या. अवघ्या १६ वर्षांच्या असताना त्यांना या नाटकात काम करण्याची संधी चालून आली. हे नाटक त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. माईंनी या नाटकाचे तब्बल ४,९४० प्रयोग केले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे मच्छिंद्र कांबळी यांनी ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ सुरू केल्यानंतर त्यांच्यासोबत ‘चाकरमानी’चे ५५० प्रयोग, ‘पांडगो इलो रे बाबा इलो’चे ९०० प्रयोग, ‘पती माझे छत्रपती’चे 400 प्रयोग, तर ‘केला तुका आणि झाला माका’चे 800 प्रयोग केले. याचसोबत त्यांनी अन्य काही नाटकांमध्येही काम केले. ‘वस्त्रहरण’ दरम्यान त्यांनी मालवणी भाषा अवगत केली आणि मालवणी भाषेतील त्यांची अनेक नाटके खूप गाजली. ‘सावळा गोंधळ’ या नाटकासाठी त्यांना नाट्य परिषदेच्या ‘शांता आपटे पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले.
 
 
 
 
 
अशा शेकडो नाटकांच्या अनुभवातूनच माईंनी त्यांचे अभिनयाचे शिक्षण घेतले. यावेळी त्यांना चित्रपटांसाठी देखील अनेक ‘ऑफर’ आल्या. मात्र, नाटकप्रेमापोटी त्यांनी त्यावेळेस चित्रपटांना साफ नकार दिला. कालांतराने त्यांना दूरदर्शनवरील ‘गजरा’ ही मालिका मिळाली आणि संजीवनी जाधव हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले. आतापर्यंत माईंनी २५ हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे, ज्यामध्ये ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘सव्वा शेर’ असे अनेक चित्रपट आहेत. ‘सावट’ आणि ‘आमची मुंबई’ या चित्रपटांसाठी त्यांना नामांकनही मिळाली आहेत. त्यांनी ३५ हून अधिक मालिकांमध्ये काम केले असून, त्यामध्ये अनेक मोठ्या मालिकांचा समावेश आहे. तसेच, रंगभूमीवर त्यांनी ३० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला असून, जवळजवळ २२०० हजारांहून अधिक प्रयोग रंगभूमीवर केले आहेत.
 
  
 
 
  
‘ज्ञान दिल्याने वाढते’ या विचाराला मानणार्‍या माईंनी अनेक तरुण आणि नवोदित कलाकारांना स्वानुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला. प्रारंभी तरुण मुला-मुलींना घरातूनच अभिनयाबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचसोबत अनेक अभिनय कार्यशाळांतून नवोदित कलाकारांना मार्गदर्शनही केले. सध्याच्या घडीला काही तरुणांना सोबत घेऊन ‘नाट्यलंकार’ नावाने संस्था चालू करत नवोदितांचे वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. नाट्यक्षेत्रामध्ये कसे वावरावे? कॅमेरासमोर कसा अभिनय करावा? याविषयी ते नवोदितांना मार्गदर्शन करतात. सध्याच्या घडीला त्यांच्याकडून शिक्षण घेऊन अनेक नवोदित कलाकार मालिका, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या ‘वैजू नं. वन’ या मालिकेमध्ये काम करत आहेत. तसेच, त्यांचे काही नाटकांचे प्रयोगदेखील सुरू आहेतच. त्यांच्या या कार्यामुळे अनेक नवोदितांना या एक आशेचा किरण, मायेचे पाठबळ मिळाले आहे. माईंच्या या कार्याला सलाम आणि शुभेच्छा!
 
 
यशाचा मूलमंत्र
कलेला मरण नाही. एक कलाकार म्हणून आपण कसे आहोत, हे कळणे गरजेचे असते. जेव्हा एखादा नवोदित कलाकार मनोरंजन क्षेत्रात येतो, तेव्हा त्याला त्या कलेबद्दल आदर हवाच. शिवाय, त्याच्यामध्ये नम्रता आणि संयमही हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ ही एखाद्या कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या सर्व गोष्टी असल्या तरच तुम्ही कलाकार म्हणून ओळखले जाऊ शकता.

                                                                                                                                   - अभिजीत जाधव
@@AUTHORINFO_V1@@