सामान्यांचा शिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |

 


rajesh joshte_1 &nbs



‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ या म्हणीनुसार आई संस्कारी असेल तर तिची मुलेही सुसंस्कारी असतात. राजश्री जोष्टे यांनी कठीण परिस्थितीतही दोन्ही मुलांना शिकवले, घडविले आणि सुसंस्कारांनी मढविलेदेखील. म्हणून त्यांचा मुलगा राजेश याने स्वकर्तृत्वाने दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरेल अशाच कामाचा वसा घेतला. ‘स्वतः जगा आणि दुसर्‍याला जगवा’ हा मंत्र त्यांनी आत्मसात केला. त्यामुळे दुसर्‍यांना जगण्याची दिशा मिळाली आहे. त्यांचे काम नक्कीच अनेकांना मार्गदर्शक आणि स्फूर्तिदायक ठरणारे आहे.



आई संस्कारी असेल, तर कठीण परिस्थितीतही ती मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यामुळे मुलांचा भाग्योदय होत असताना ती कृतकृत्य होते. अशा संस्कारी आईच्या उदरी जन्मलेला मुलगा म्हणजे राजेश परशुराम जोष्टे. मूळ गाव तवसाळ, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. तो लहान असतानाच वडील वारले. मग उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या तवसाळसारख्या खेडेगावात मुलांचे पालनपोषण कसे करणार, त्यांना शिक्षण कसे देणार, असा प्रश्न त्याच्या आईपुढे राजश्री जोष्टे यांच्यापुढे उभा राहिला. पती निधनाच्या दुःखाचे ओझे घेऊन त्या घराबाहेर पडल्या.



चिपळूण तालुक्यातील कोंडीवरे येथे त्यांनी अंगणवाडी शिक्षिकेची नोकरी पत्करली. तेथे त्यांनी मुलांना पाचवीपर्यंत शिक्षण दिले. पुढे दहावीपर्यंत आबलोली येथे शिक्षण दिले. या काळात राजेश घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम करीत असे. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण शृंगारतळी येथे त्यांनी घेतले. त्यानंतर मुलांनी शिक्षकी पेशा पत्करावा म्हणून त्यांच्या आईने आबलोली येथे डी.एड् विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. डी.एड्ची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर राजेशला शिक्षक होण्याची संधी मिळाली नाही. मात्र, नाउमेद न होता त्याने पत्रकारितेचा पेशा पत्करण्याचे ठरविले आणि दै. ‘सागर’मध्ये पत्रकारितेचा श्रीगणेशा सुरू केला. या काळात आईचे श्रम कमी करण्यासाठी झटत असताना, त्याने पाठच्या बहिणीला डी.एड् करून तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास समर्थ केले. पत्रकारितेत असताना समाजातल्या विविध स्तरांतल्या लोकांशी राजेशचा संबंध आला. गरीब लोकांच्या हालअपेष्टा तो बघत होता. स्वतः गरिबीचे चटके सहन केलेले असल्याने गरिबांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले. त्यासाठी त्याने ‘दिशांतर’ नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि जनसेवेचा श्रीगणेशा सुरू झाला. सुरुवातीला त्याने महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतला. त्यातून सेंद्रिय खतातून शेती करण्याचे सामान्य जनांना शिक्षण दिले.



‘अन्न सुरक्षितता आणि विषमुक्त अन्न’ या उद्दिष्टांसह आर्थिक सुरक्षिततेचे ध्येय ठेऊन ‘दिशांतर’ संस्थेने ‘अन्नपूर्णा’ प्रकल्पांतर्गत वेहेळे-राजवीरवाडीत दुर्बल घटकांतील भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक अशा महिलांसोबत सहकारातून सेंद्रिय शेतीची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या तीन वर्षांत येथील महिलांनी शेतीतून अक्षरशः लक्षावधीची उलाढाल केली. त्यासाठी ‘पॉवर टिलर’, ‘मोबाईल राईस मिल’, बी-बियाणे, जैविक खतनिर्मिती, ठिबक सिंचन अशी आधुनिक तसेच ‘वेल’वर्गीय भाज्यांसाठी पारंपरिक शेतीतंत्राची उभारणी करून दिली. महिलांनी सहकारातून 25 एकर क्षेत्र बारमाही शेतीखाली आणले. मुळा, पालक, माठ, चवळी, वाल, घेवडा, मिरची, भेंडी, कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी, झेंडू, कलिंगड अशी दर्जेदार शेती उत्पादनांची निर्मिती सुरू आहे. अन्नपूर्णा प्रकल्पातून ताज्या विषमुक्त भाज्या आणि फळे देण्याचा उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे. असेच काम इतर काही गावांतून सुरू आहे. विषमुक्त अन्न नि अन्न सुरक्षिततेचा हा ‘अन्नपूर्णा’ प्रकल्प आहे. तसेच देशाची भावी पिढी सुदृढ व्हावी, यासाठी ‘दिशांतर’तर्फे खेड्यापाड्यातील शालेय मुलांना प्रोटीन्सयुक्त अन्नाचे डबे पुरवले जातात.



पत्रकारितेसह ‘दिशांतर’ संस्थेच्या माध्यमातून वंचितांच्या वस्त्यांवर पाणी, आरोग्य, शिक्षण, सौरकंदील, सहकार्याचा स्नेहार्द हात, आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात काम सुरू आहे. याशिवाय आतबट्ट्याच्या शेतीवर उतारा मिळवून देताना सहकारातून सामुदायिक शेती, सेंद्रिय शेती, महिला शेतकर्‍यांनी केलेली शेती, तसेच ‘शेतकर्‍यांनीच पिकवायचं नि त्यांनीच विकायचं,’ अशी ‘दलालमुक्त शेती’ संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात ‘दिशांतर’ संस्थेला यश मिळालं आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतील २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत क्रमिक पुस्तकपेढीला लाभ मिळवून देण्यात आला आहे. अनेक बचतगटांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सक्षमीकरण साधण्यात सहकार्य व यंत्र, मंत्र व तंत्र देण्यात ‘दिशांतर’ संस्थेचे अध्यक्ष या नात्याने राजेश जोष्टे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.





राजेश यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरावरील ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ राजेश जोष्टे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वृत्तपत्रीय लिखाण व त्याच्याच जोडीने अपेक्षित सामाजिक काम अशा कृतियुक्त पत्रकारितेसाठी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वंचितांच्या वस्तीवरचे व ग्रामीण भागातील वृत्तांकन व त्या भागात संवेदनशील वृत्तीने केलेले काम यामुळे त्यांना भारत सरकारच्या ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ या स्वायत्त व घटनात्मक संस्थेचा देशपातळीवरचा अत्यंत प्रतिष्ठेचा पहिला राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. अरुण जेटली यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.



याशिवाय ‘महात्मा फुले दीनबंधू राष्ट्रीय पुरस्कार’, मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘कोकण वैभव’ सन्मान, ‘आदर्श बहुजन लोकसेवा गौरव’, ‘नॅशनल अ‍ॅमेस्टी अ‍ॅन्ड रिडम्शन ऑर्गनायझेशन’चा ‘राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार’, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा ‘पत्रकार भूषण’, समर्थनचा ‘मानव हक्क वार्ता’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. गतवर्षी दिल्ली येथे ‘लाडली’ व ग्रामीण पत्रकारितेसाठी दुसर्‍यांदा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला होता. महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि महिलांविषयी केलेल्या संवेदनशील लिखाणाची दखल घेऊन दिल्लीतील ‘पॉप्युलेशन फर्स्ट’ या नामांकित संस्थेने ‘लाडली मीडिया’ आणि ‘अ‍ॅडर्व्हटाईज अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले. नवी दिल्लीतील ‘युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या सभागृहात ‘मॅगसेसे’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. संपूर्ण देशातून सहभागी झालेल्या हजारो स्पर्धकांमधून विभागवार निवडण्यात आलेल्या निवडक पत्रकारांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये दीव-दमण, राजस्थान, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या देशाच्या पश्चिम विभागातून राजेश जोष्टे यांची निवड करण्यात आली. आयुष्यात सोसलेल्या गरिबीचे चटके इतरांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून सातत्याने झटणार्‍या या अवलियाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा.

यशाचा मूलमंत्र
राजेश जोष्टे यांची कामगिरी शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखी आहे. आईचे कष्ट आणि अनुभवलेली गरिबी त्यांनी कायम स्मरणात ठेवली आहे. त्यामुळे दुसर्‍यांचे दुःख हलके करण्याकडे त्यांचा कल असतो. समाजाचे निरीक्षण, थोरामोठ्यांचा मान आणि विनम्र वर्तन हाच त्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे.                                                                                                                                  
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              - अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@